Friday, 23 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.01.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 23 January 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

केरळमधल्या थिरुअनंतपुरमला देशातलं एक प्रमुख स्टार्ट अप केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज थिरुवनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरातल्या गरीब नागरिकांच्या कल्याणासाठीची एक नवी सुरुवात केरळमधून करण्यात येत असल्याचं सांगत, केंद्र सरकारनं आजपासून पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड सुरू केलं असून, याचा देशभरातल्या टपरी किंवा छोट्या दुकानदारांना तसंच पदपथांवर काम करणाऱ्या नागरिकांना लाभ होईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी तीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि एका प्रवासी रेल्वेचं उद्घाटन झालं.

****

येत्या दीड वर्षात भारत आपला स्वत:चा मोबाईल ब्रँड सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतील एका सत्रात ते बोलत होते. भारतात एक मजबूत इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्था असून, मोबाईल फोन क्षेत्रात भारताचा स्वत:चा ब्रँड आणण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान वर्ल्ड बँकेसोबत शहरी पायाभूत सुविधांबाबत चर्चा झाली असून, निधी पुरवठ्यासंदर्भात विविध पर्याय खुले करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईसाठी सर्क्युलर इकॉनॉमीची घोषणा करण्यात आली असून, यामुळे मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातून गुंतवणूक येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटीची उभारणी करण्यात येणार असून, टाटा सन्सने एआय डेटा सेंटरसाठी कोट्यवधींच्या गुंतवणुकीची घोषणा केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

****

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणा-या परेडची आज रंगीत तालीम होत आहे. सकाळी साडेदहाला विजय चौकातून सुरू झालेली ही परेड लाल किल्ल्यापर्यंत जाणार आहे. यात सैन्यदलाच्या विविध तुकड्या आणि राज्यांचे चित्ररथ देशाच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवत असून, वायु दलाची लढाऊ विमानं आकाशात शक्ति प्रदर्शन करणार आहेत. दरम्यान, यंदा महाराष्ट्राच्या वतीनं ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे.

****

राष्ट्रीय कृषी तथा ग्रामीण विकास बँक-नाबार्ड आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्यांच्या सेवारत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्यालाही सरकारनं मंजुरी दिली आहे. विमा कंपन्यांची वेतनवाढ सुमारे बारा टक्के इतकी असून, ती एक ऑगस्ट २०२२ पासून लागू राहील. नाबार्डची वेतनवाढ सुमारे वीस टक्के आणि रिझर्व्ह बँकेची निवृत्तीवेतनवाढ सुमारे दहा टक्के इतकी असून ही एक नोव्हेंबर २०२२ या तारखेपासून लागू राहील.

****

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची काल छाननी करण्यात आली. यात जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी आठ तालुक्यातून प्राप्त झालेल्या नऊशे सदुसष्ट अर्जांपैकी नऊशे अडोतीस अर्ज वैध तर सत्तावीस अर्ज अवैध ठरले आहेत. दोन अर्जांवर हरकती आल्यानं त्यावर सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या एकशे दहा पंचायत समिती गणांसाठी आलेल्या तेराशे साठ अर्जांपैकी एक हजार तीनशे एकवीस अर्ज वैध, तर अडोतीस अवैध ठरले आहेत, एका अर्जावर आक्षेप नोंदवला गेला असल्यानं त्याचा निर्णय सुनावणीनंतर होणार आहे. येत्या २७ तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार असून, या सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं, असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.

****

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघेही उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळणार आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा सामना चीनच्या चेन युफेई हिच्याशी होणार आहे, तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन ची लढत थायलंडच्या पानिचाफोन याच्यासोबत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...