Friday, 23 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.01.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 January 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमधल्या थिरुवनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते तीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि एका प्रवासी रेल्वेचंही उद्घाटन यावेळी होणार आहे.

****

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला आकार दिला, त्यांच्या तीक्ष्ण बुद्धि, अमोघ वक्तृत्व आणि अढळ विश्वास या गुणांसाठी ते ओळखले जात, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रेरणा घ्यावी आणि ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावं, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी आज मुंबईत ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनीही कुलाबा इथल्या या स्मारकावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

****

२०२७ च्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या ३३ प्रश्नांची यादी सरकारनं जाहीर केली आहे. हा पहिला टप्पा १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात घरांची यादी तयार केली जाणार असून यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ३० दिवसांचं विशेष अभियान राबवलं जाणार आहे. हा पहिला टप्पा ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

****

देशाच्या विविध भागांमध्ये आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेचा उत्साह आहे. या दिवशी देशभरात सरस्वती देवीची पूजा केली जाते. हा सण वसंत ऋतुच्या आगमनाचा सण म्हणूनही ओळखला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा दिवस देशभरात पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो.

****

दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारनं आतापर्यंत ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या गुंतवणुकीतून सुमारे ४० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, यापैकी ८३ टक्के करार थेट परदेशी गुंतवणुकीचे असून १६ टक्के परदेशी तंत्रज्ञान भागीदारीचे आहेत. एकूण १८ देश महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहेत. गेल्या वर्षी जाहीर झालेल्या गुंतवणुकीपैकी ७५ टक्के गुंतवणूक प्रत्यक्षात उतरली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. यावर्षीची गुंतवणूक तिसरी मुंबई म्हणजेच रायगड-पेन ग्रोथ सेंटर तसंच छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या उदयोन्मुख औद्योगिक केंद्रांच्या विकासाला चालना देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

बीड तालुक्यातील मुर्शदपूर आणि तिप्पटवाडी गावांच्या हद्दीतील वर्षानुवर्षे बंद असलेला सुमारे एक किलोमीटरचा ग्रामीण गाडी रस्ता काल खुला करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या समन्वयातून हा प्रश्न मार्गी लागला. या रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

**

नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक काल पार पडली. या बैठकीत महेश कनकदंडे यांची भाजपच्या मनपा गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.

**

जालना इथं जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली काल विशेष संवाद बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेच्या नवनर्विाचित सदस्यांनी पायाभूत सुविधांसह इतर समस्यांबाबत चर्चा करत त्या सोडवण्यासाठी समन्वयाने काम करण्याची ग्वाही दिली.

**

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या सायगाव इथं विनापरवाना पिस्तुल वापरून  गोळीबार करणाऱ्या एकाला बर्दापूर पोलिसांनी काल अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन पिस्तुलं, जिवंत काडतुसं आणि एक दुचाकी असा सुमारे एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

**

नांदेड जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेंतर्गत, ७३२ कोटी २६ लाखांच्या प्रारूप आराखडयाला मान्यता देण्यात आली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

चोविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल एका दिमाखदार सोहळ्यानं समारोप झाला. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते विश्वजीत,अभिनेत्री फरीदा जलाल आणि आशा काळे यांना यावेळी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हळदीपूर यांना एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय संगीत पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं. "द एलिसियन फील्ड"या चित्रपटानं सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा तर बाप्या या चित्रपटानं सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...