Saturday, 24 January 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 January 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      देशभरात आज अठरावा रोजगार मेळावा- ६१ हजार तरुणांना मिळणार नियुक्तीपत्रं

·      पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

·      केंद्र सरकारचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना जाहीर

·      एसटी महामंडळाची ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-एसटी संगे तीर्थाटन’ योजना

आणि

·      गुरू तेगबहादूर यांच्या स्मरणार्थ नांदेड इथं आजपासून हौतात्म्य सत्संग सोहळ्याचं आयोजन

****

देशभरात आज अठराव्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ४५ ठिकाणी होणाऱ्या या मेळाव्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ६१ हजाराहून अधिक तरुणांना विविध शासकीय विभागातल्या पदांची नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांनी काल केरळमध्ये तिरुवअनंतपुरम् इथं “प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना‘ अर्थात पी एम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजनेचा शुभारंभ केला. छत्रपती संभाजीनगर इथले निवडक अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी आभासी पद्धतीनं या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पाचशे बत्तीस पथविक्रेत्यांना कर्जाचं वितरण करण्यात आलं.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२९व्या जयंती निमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्र सरकारच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन वैयक्तिक पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. यंदा या पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या रहिवासी, लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची निवड झाली आहे. केरळमधे वायनाड इथं २०२४ मधे भूस्खलनामुळे ओढवलेल्या आपत्तीत शेळके यांनी बचावकार्यात लक्षणीय योगदान दिलं होतं. पाच लाख रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सीता शेळके यांचे वडील अशोक शेळके यांनी आकाशवाणीशी बोलतांना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले…

बाईट – अशोक शेळके

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शतकपूर्ती जयंतीनिमित्त राज्य परिवहन महामंडळानं कालपासून, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ ही योजना सुरू केली आहे. राज्यातल्या २५१ आगारांत एकाच वेळी राबवण्यात येणारी ही योजना, ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित आहे. परवडणाऱ्या दरात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

**

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरे यांना अभिवादन केलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्यातल्या २९ महापालिका आणि ३९४ नगर परिषदांमध्ये ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबवण्यासाठी नगर परिषदांना एक कोटी आणि महापालिकांना ३ कोटी रुपये निधी देणार असल्याचं, शिंदे यांनी सांगितलं.

****

महानगरपालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त करण्याचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. या बाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील महापौर आरक्षण सोडत प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि कॅमेऱ्यांच्या निगराणीत पार पडली आहे, या प्रक्रियेवर आक्षेप घेणं योग्य नसल्याचं, बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

****

दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारातून महाराष्ट्रात ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या परिषदेत राज्य शासनाने सुमारे ३७ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे ५१ करार केले आहेत.

****

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या PMLA न्यायालयानं दोषमुक्त ठरवलं आहे. महाराष्ट्र सदन बांधकामाच्या खर्चाचा अंदाज चौपट वाढवल्याचा, आणि संबंधित कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप सक्तवसूली संचालनालय-ईडीने भुजबळांवर केला होता. २००५-६ मधल्या व्यवहाराचं हे प्रकरण आहे.

****

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यंदा ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ सादर होणार आहे. या पथसंचलनाची काल रंगीत तालीम झाली. २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित होणाऱ्या 'भारत पर्व'मध्ये महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशेतिसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या हौतात्म्य सत्संग वर्षाचं औचित्य साधून, आज नांदेड इथं दोन दिवसीय विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदी मैदानावर आज आणि उद्या, दोन दिवस हा हौतात्म्य सत्संग सोहळा होणार असून, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातल्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी नांदेड इथं येणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यातल्या सगळ्या शाळांना आज, चोवीस तारखेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना केलं आहे. ते म्हणाले…

बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

दरम्यान, या सोहळ्यासाठी रेल्वे प्रशासनानं आज मुंबई, चंदीगड आणि दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकांवरून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काल नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा इथं विशेष कीर्तन सोहळा पार पडला. ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेलं, श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 'शबद गुरबानी'चं गायन, हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेटी क्रिकेट मालिकेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाहुण्या संघाला सात गडी राखून पराभूत करत, दुसरा सामना जिंकला. नाणेफेक जिंकून भारताने पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. न्यूझीलंड संघाने २० षटकांत सहा बाद २०८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळायला उतरलेले भारताचे सलामीवीर झटपट तंबूत परतले. मात्र ईशान किशनने ३२ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांची झंझावाती खेळी करत ७६ धावा करून भारताच्या धावसंख्येला आकार दिला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद ब्याऐंशी आणि शिवम् दुबेच्या नाबाद ३६ धावांच्या बळावर भारतानं सोळाव्या षटकातच हे आव्हान पार केलं. ईशान किशन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेत पुढचा सामना उद्या गुवाहाटी इथं होणार आहे.

****

ओमान मध्ये मस्कत इथं झालेल्या जागतिक टेबलटेनिस कंटेंडर स्पर्धेत भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे जोडीने मिश्र दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात शाह चितळे जोडीने चीनच्या जोडीचा तीन दोन असा पराभव केला.

****

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी प्राप्त ९६७ अर्जांपैकी ९३८ अर्ज वैध ठरले आहेत. दोन अर्जावर हरकती आल्याने सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार आहे. दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांपैकी तेरा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. जिल्ह्यातील पंचायत समितीच्या ११० गणांसाठी तेराशे साठ अर्ज आले होते. त्यापैकी तेराशे एकवीस अर्ज वैध ठरले, यापैकी १२ उमेदवारांनी आपले अर्ज काल मागे घेतले. एका अर्जावर आक्षेप असल्याने त्याचा निर्णय सुनावणीनंतर होणार आहे.

****

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त परभणी इथं ‘बोलींचा जागर’ विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात शोभायात्रेनं सुरू झालेल्या या कार्यक्रमात जागर, गवळण, भारूड, गोंधळ तसंच कीर्तन सादर करण्यात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...