Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 March 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि.
****




आणि

****
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन
वर्तमान यांना आज मुक्त करणार असल्याचं, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर
केलं आहे. पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सत्रात इम्रान खान यांनी काल ही घोषणा केली,
दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
परवा सकाळी पाकिस्ताननं काश्मीरमध्ये केलेला हवाई
हल्ला परतवून लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये
कोसळलं, त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेऊन, त्यांची दृश्यफीत जारी
केली होती. भारतानं यावर कठोर शब्दांत आक्षेप घेत, अभिनंदन यांना तात्काळ बिनशर्त,
भारतात सुरक्षित परत पाठवण्यास सांगितलं होतं.
****
आमची लढाई दहशतवादाशी असून पाकव्याप्त काश्मीरसह
पाकिस्तानमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील, तोपर्यंत त्यांच्या विरूद्ध
आमची कारवाई सुरू राहील, असा इशारा भारतीय सैन्य दलानं दिला आहे. वायु दलानं नुकत्याचं
केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा काल तिन्ही दलाच्या प्रमुखांनी
आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारताचं सैन्य दल कोणत्याही परिस्थितीचा
सामना करण्यास सज्ज असल्याचं मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सांगितलं. देशात शांतता,
स्थैर्य कायम ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले.
****
साखर कारखान्यांना जवळपास ८ हजार ते साडे दहा हजार कोटी रुपयांचं अल्प व्याजदराचं कर्ज
उपल्ब्ध करुन देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं
मान्यता दिली आहे. यामुळे, साखर उद्योगाला सध्याच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची
थकित देणी अदा करता येईल. या कर्जावरच्या सात ते आठ टक्के व्याजाची भरपाई सरकार करणार
आहे. शेतकऱ्यांना त्यांची थकित देणी मिळण्यासाठी हा निधी बँकामार्फत थेट शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा करण्यात येणार आहे.
****
राज्य विधीमंडळाचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन काल सुरक्षेच्या कारणास्तव संस्थगित झालं. हे अधिवेशन शनिवारपर्यंत
चालणार होतं, मात्र भारत आणि पाकिस्तान सीमेवर वाढता तणाव पाहता, सुरक्षा यंत्रणांवरचा
तणाव कमी करण्यासाठी, अधिवेशन दोन दिवस लवकर संपवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, यांनी विधानसभेत मांडला, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला.
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, अर्थसंकल्पीय
अधिवेशन संस्थगित होत असल्याची घोषणा केली. चार बैठका झालेल्या या अधिवेशनात, तेरा
तास वीस मिनिटं कामकाज झालं, पाच विधेयकं या अधिवेशनात विधानसभेनं संमत केली.
पावसाळी अधिवेशन येत्या १७ जूनपासून मुंबईत होणार
आहे. त्यापूर्वी विधानसभेनं आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही
चर्चेशिवाय मंजूर केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपली लेखी भाषणं पटलावर ठेवणार असल्याचं
सांगितलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. नियंत्रक आणि महालेखापाल
- कॅग तसंच लोकलेखा समितीचा अहवालही सदनाच्या पटलावर ठेवण्यात आला.
विधान परिषदेतही अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर
करण्यात आला. ज्या सदस्यांना, अर्थसंकल्प, दुष्काळी उपाययोजना, तसंच इतर विषयांवर सूचना
मांडायच्या असतील, त्यांनी त्या लेखी स्वरुपात पटलावर ठेवाव्यात, असं सभापती रामराजे
नाईक निंबाळकर यांनी सांगितलं.
त्यानंतर विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन
लवकर संस्थगित करण्यामागची भूमिका मांडली, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व
विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.
****
राज्यात शिक्षकांची १० हजार पदं भरण्यासाठीची जाहिराती
पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या
उपस्थितीत काल प्रदर्शित करण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत अशी
ही पहिलीच शिक्षक भरती होणार असल्याचा दावा, शालेय शिक्षण विभागानं केला आहे. शिक्षक
भरतीची जाहिराती सध्या पोर्टलवर संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना बघता येऊ शकते,
उद्या शनिवारी भरतीची जाहिराती वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल आणि त्याचवेळी, उमेदवारांना
पवित्र पोर्टलवर ही जाहिराती बघता येईल असं विभागाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
****
राज्य
सरकारच्यावतीनं देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार लोकशाहीर बशीर कमरोद्दिन मोमीन यांना सांस्कृतिक
मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, मानपत्र
आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १२ जणांना
राज्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यामध्ये
संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबादच्या माधुरी ओक यांचा समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत
आहे. या परीक्षेसाठी नऊ मंडळातून १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
****
राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जैस्वाल
यांनी काल पदभार स्विकारला. पोलीस महासंचालनालयात झालेल्या समारंभात मावळते महासंचालक
दत्ता पडसलगीकर यांनी जैस्वाल यांच्याकडे पदाची सूत्रं सोपवली. तर जैस्वाल यांच्या
पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या
निवडणूकीत काँग्रेसच्या राजश्री निकम विजयी झाल्या आहेत. या नगरपालिकेच्या निवडणुकीची
काल मतमोजणी झाली. यामध्ये एकूण १३ प्रभागातल्या २६ जागांपैकी २४ जागा काँग्रेसनं जिंकल्या
. तर दोन जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथल्या संत श्री गोरा
कुंभारांचा वारसा सांगणाऱ्या, जिल्ह्यातल्या कुंभार समाजातल्या व्यावसायिकांना केंद्र
सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगानं फिरत्या विद्युत चाकांचं वाटप करून कौशल्य प्रशिक्षण
दिलं आहे. त्यामुळे कुंभार समाजातल्या पारंपारिक कारागिरांसह, महिला आणि नव तरूणांच्या
आयुष्यात नवी उमेद निर्माण झाली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे उस्मानाबादचे
वार्ताहर…
कुंभार व्यवसायीकांना केंद्रसरकारच्या खादी ग्रॉमद्योग आयोगानं
फिरत्या विद्यूत चाकाचं वाटप करून कौशल्य प्रशिक्षण दिलं. केवळ मातीचे राझन, चुली यासारख्या
ठरावीक वस्तू बनवणारे हात आता मातीच्या सुरया,
समया, चहाचे कप आणि शोभेच्या वस्तू, मातीचे संसांर उपयोगी भांडी तयार करू लागली आहेत.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या संकल्पनेतून पारंपारीक कला जोपासत त्याला कौशल्याची
जोड देऊन नव निर्मितीची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्ह्यातील कुंभार
समाजातील पारंपारीक कारागीरासह महिला आणि नव तरूणाच्या आयूष्यात नवि उमेद जागवत आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहार, उस्मानाबाद.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या आणि परवा
राज्यभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव
नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात बुधवारी सकाळी
विमान दुर्घटनेत शहीद झालेले वायु दलाचे स्क्वाडर्न लीडर निनाद मांडवगणे यांच्यावर
नाशिक इथं आज सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
जालन्याच्या यशवंतराव चव्हाण साहित्यिक आणि सांस्कृतिक
प्रतिष्ठानच्यावतीनं दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार यवतमाळचे
प्रसिध्द कवी, लेखक प्राध्यापक डॉक्टर अनंता सूर यांच्या ’आधुनिक कवी’ या समीक्षा ग्रंथास
जाहीर झाला आहे. पुरस्काराचं हे तेराव वर्ष आहे
****
केंद्र शासनाच्या पुणे इथल्या रिजनल आऊटरिच
ब्युरोतर्फे औरंगाबाद इथं आज स्वच्छता आणि एकता या विषयावर बहुमाध्यम चित्रप्रदर्शनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या प्रोझोन मॉल इथं सकाळी दहावाजेपासून हे प्रदर्शन
सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment