Wednesday, 23 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं, मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन वेळेपूर्वी संपवण्याचा निर्णय घेतल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्ही मुरलीधरन यांनी आज राज्यसभेत सांगितलं. लोकसभेनं मंजूर केलेली महत्त्वाची काही विधेयकं आज मंजुरीसाठी राज्यसभेसमोर ठेवली जाणार आहेत, यापैकी परकीय अंशदान नियामक सुधारणा विधेयक राज्यसभेनं मंजूर केलं आहे.

****

देशात आज कोविड बाधितांच्या संख्येत ८३ हजार तीनशे ४७ ने वाढ झाली. त्यामुळे कोविडग्रस्तांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार १० झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात एक हजार ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९० हजार २० झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ४४३ झाली आहे. आजपर्यंत एकूण ८८६ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, २४ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ६ हजार ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

पालघर जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा आज शुभारंभ झाला. जिल्ह्यात दोन टप्प्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातल्या ४ लाख ९५ हजार कुटुंबांची तपासणी करण्यात येणार आहे.

****

मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली. मुंबई शहर परिसरात २६७ पूर्णांक ६२ मिलीमीटर, पूर्व उपनगरात १७१ पूर्णांक २२ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात २५१ पूर्णांक ४८ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. हवामान खात्यानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यानं, मुंबई महापालिका क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयं आणि आस्थापना आज बंद राहणार आहेत.

****

No comments: