Thursday, 24 December 2020

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय ग्राहक दिवस आज साजरा होत आहे. प्रत्येक ग्राहकाला आपले अधिकार आणि जबाबदारीसंबंधी योग्य माहिती असली पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण - साई अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव आणि हॅाकी मैदानाचं उद्घाटन, त्यांच्या हस्ते होणार आहे. तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे.

****

राज्य सरकारनं सुरु केलेल्या धान खरेदी केंद्रांवर परराज्यातलं धान विक्रीसाठी येऊ नये, यासाठी राज्यांच्या सीमांवरच्या नाक्यांवर कडक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ही खरेदी केंद्र फक्त राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीचं आहेत, त्यामुळे परराज्यातून धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, त्यांची वाहनं जप्त करावीत, असे निर्देश पवार यांनी दिले आहेत.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता आणि दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षांना निकाल काल जाहीर झाला. दहावीचा निकाल ३२ पूर्णांक ६० टक्के, तर बारावीचा निकाल १८ पूर्णांक ४१ टक्के इतका आहे. 

****

बीड जिल्ह्यात परळी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या वैद्यनाथ सहकारी औद्योगीक वसाहतमधल्या साई कुलर्स या कारखान्याला काल आग लागली. या आगीत पुर्ण उद्योग जळून खाक झाला असून, सुमारे ४० लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. परळी नगर परिषद, परळी औष्णिक विद्युत केंद्र तसचं गंगाखेड इथल्या अग्निशामकच्या बंबानं रात्री ही आग अटोक्यात आणली.

****

बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीनं येत्या शनिवारी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हा महोत्सव घेण्यात येणार आहे. १५ ते २९ वयोगटातल्या स्पर्धकांनी त्यांचे प्रवेश अर्ज उद्यापर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावे असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केलं आहे. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन आणि वाद्य, शास्त्रीय नृत्य या कलांचा समावेश असणार आहे.

//*******//****//

 

 

No comments: