आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
नाताळचा सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणाच्या निमित्तानं शांतता, सदिच्छा
आणि दयाभावनेनं लोकांचं आयुष्य भरून जाऊ दे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. येशू ख्रिस्तानं
दाखवलेल्या मार्गामुळे नागरीकांना न्याय आणि समग्र समाजाच्या निर्माणासाठी दिशा मिळेल,
अशी अपेक्षा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
****
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून साजरी करण्यात
येत आहे. नवी दिल्लीतल्या सदैव अटल, या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा
अध्यक्ष ओम बिरला यांच्यासह केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते.
****
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करणार आहेत. देशातल्या नऊ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना
१८ हजार कोटींहून अधिक रक्कम वितरीत केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान सहा राज्यांमधल्या
शेतकऱ्यांसोबत संवादही साधणार आहेत. शेतकरीही त्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून
झालेल्या लाभाबाबतचा अनुभव सांगणार आहेत.
****
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देशातल्या सर्वच क्षेत्रात
नव्या संशोधनाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर
इथं आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन करताना ते काल बोलते. विकासाच्या दृष्टीनं
मागास असलेल्या भागात कोणत्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे, याचा अभ्यास करून नवीन
संशोधन व्हावं, त्यामुळेच अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत मिळेल आणि मागास भागातील
सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
ज्येष्ठ दाम्पत्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत
असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं
फेटाळला आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनीही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला
होता. जाधव यांच्या विरोधात बारा गुन्हे दाखल असून, एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याचा
युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकीलांनी या संदर्भात केला.
****
No comments:
Post a Comment