आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून गुजरातच्या राजकोट येथे अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्था - एम्सची पायाभरणी करणार आहेत. या वेळी गुजरातचे राज्यपाल, गुजरातचे
मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि केंद्रीय आरोग्यमंत्री देखील उपस्थित राहणार
आहेत. या प्रकल्पासाठी २०१ एकर जागा देण्यात आली आहे. अंदाजे एक हजार १९५ कोटी रुपये
खर्चून ते बांधण्यात येईल आणि २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. अत्याधुनिक
७५० खाटांच्या रुग्णालयात ३० बेडचा आयुष विभाग असेल. त्यात १२५ एमबीबीएस जागा आणि नर्सिंगसाठी
६० जागा असतील.
****
अन्नधान्यापासून
इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी एका नव्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल
मंजूरी दिली आहे. धान, गहू, मका, ऊस यापासून उच्च दर्जाच्या इथेनॉलची निर्मिती केली
जाईल, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. या साठी चार हजार
५७३ कोटी रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. भारताला २०३० पर्यंत एक हजार कोटी लिटर इथेनॉलची
गरज भासणार आहे. सध्या देशात ६८४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली जात असून, भविष्यकाळात
इथेनॉलची आयात पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातील. यासाठी दिल्या
जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर एक वर्षासाठी माफी मिळणार असून याचा खर्च सरकार उचलणार
आहे.
****
आकाश या देशी
बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे.
आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन
आणि विकास संस्थेनं केली आहे. आकाश ची मारक क्षमता २५ किलोमीटर इतकी आहे. या माध्यमातून
मित्र देशांशी सामरिक संबंध सुधारण्याचेही केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.
****
नांदेड विभागानं दक्षिण मध्य
रेल्वे क्षेत्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बदल या वर्षी तीन पुरस्कार मिळवले
आहेत. दरम्यान, नांदेड
दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयात काल रेल्वे सप्ताह निमित्त झालेल्या
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
आले.
****
हिंगोली शहरात
रिसालाबाजार भागात दगड लागण्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची
घटना काल रात्री घडली. या दगडफेकीत पाच ते सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
//*********//
No comments:
Post a Comment