Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
· नव्या कृषी कायद्यांसंदर्भात
चर्चेसाठी केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांना पुन्हा आमंत्रण.
· मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास
राज्य सरकार जबाबदार - खासदार संभाजीराजे छत्रपती.
· आर्थिक दुर्बल गटाचा लाभ
मराठा समाजाला देण्याच्या निर्णयावर राजकारण होत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप.
· औरंगाबादच्या साई केंद्रात
क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची केंद्रीय
क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा.
· गंगाखेड शुगर आणि एनर्जी
लिमिटेडची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त.
· राज्यात तीन हजार ५८० नवे
कोविडग्रस्त; मराठवाड्यातनव्या २३७ रुग्णांची नोंद.
आणि
· माजी पंतप्रधान अटल बिहारी
वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भाजपचा ‘सुशासन दिवस’.
****
नव्या
कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांना केंद्र सरकारनं
पुन्हा एकदा चर्चेसाठी पत्र पाठवून आमंत्रित केलं असल्याची माहिती केंद्रीय कृषी विभागाचे
सचिव विवेक अग्रवाल यांनी दिली आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पत्र लिहून सरकार
मोकळ्या मनानं शेतकऱ्यांसोबत चर्चेला आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवर समाधानकारक उत्तरं
द्यायला तयार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
आर्थिक
मागास प्रवर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागला तर त्याला पूर्णपणे राज्य
सरकार जबाबदार असेल, अशी टीका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते काल पुण्यात
पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी
आर्थिक मागास वर्गाची सवलत देण्यात आली आहे. मराठा समाजाला केंद्रीय आरक्षणानुसार हे
१० टक्के आरक्षण मिळत होतं, यामध्ये इतरही अनेक समाजांचा समावेश असल्यामुळे फक्त मराठा
समाजासाठीच हे आरक्षण दिलं, असं म्हणता येत नसल्याचं संभाजीराजे यांनी नमूद केलं.
****
मराठा
समाजाला आर्थिक दुर्बल गटाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर काही
मंडळी राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
केला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती
दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - ईडब्ल्यूएसचे लाभ
देण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. या याचिकांवर
मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र
देण्याचे आदेश देवून राज्य सरकारनं यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असं सांगितलं होतं,
त्यानुसार संबंधित निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
****
आज
नाताळचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाताळानिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचं
आचरण करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता
नागरिकांनी गर्दी न करता साधेपणानं नाताळ साजरा करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे
यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात यांनीही जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन नांदेडचे
ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी केलं आहे.
****
राज्याच्या
सांस्कृतिक विभागाच्या वतीनं यंदाच्या घोषित पुरस्कारांच्या मानकऱ्यांची पुरस्काराची
रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य
मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. कोविड-19 चा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर, शासनाच्या
नियमांचं पालन करून पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करुन मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि
श्रीफळ मानकऱ्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
****
भारतीय
क्रीडा प्राधिकरणाच्या औरंगाबाद इथल्या केंद्रात विविध क्रीडा प्रकाराच्या साहित्यासाठी
पाच कोटी रूपये तसंच ३०० खाटांचं वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री
किरेन रिजिजू यांनी केली आहे, काल औरंगाबाद इथं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात जलतरण
तलाव आणि सिंथेटिक हॉकी मैदानाचं उद्घाटन तसंच तलवारबाजी सभागृहाचं कोनशिला अनावरण
रिजिजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या खेळाडूंमध्ये असलेली
क्षमता वृद्धींगत करण्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना
अधिक प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत
प्राधिकरणातील जवळपास २० खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करतील, असा विश्वासही रिजिजू
यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं क्रीडा मंत्रालयाकडे
केलेल्या मागण्यांबाबतही आपण सकारात्मक असून विद्यापीठास ‘खेलो इंडिया’तून निधी देणार
असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान,
भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये कबड्डी या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी करणारं
निवेदन जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी सादर करण्यात
आलं. बीड वळण रस्त्यावर वाल्मी नाका ते झाल्टा फाटा या अकरा किलोमीटर मार्गावर सायकल
ट्रॅक तयार करण्यात यावा, अशी मागणी करणारं एक निवेदनही औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी देण्यात आलं.
****
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय
जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी काल राळेगणसिद्धी इथं अण्णांची भेट घेतली. हजारे
यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी
पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता. यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे
आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची
विनंती केली होती.
****
शेतकऱ्यांच्या
नावावर परस्पर कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं परभणी जिल्ह्यातल्या
गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याची परभणी, बीड आणि धुळे इथली २५५
कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं काल या प्रकरणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन
कोठडी सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्यानं
२९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर सहा बँकाकडून जवळपास ३२८ कोटी रुपयांचे कर्ज परस्पर घेतलं
होतं. गुट्टे यांनी ही रक्कम योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये
गुंतवली. याप्रकरणी आता सक्तवसुली संचालनालयानं गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची
२४७ कोटी रुपये किंमतीची यंत्रं, पाच कोटी रुपयांची जमीन, तसंच योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड
सोलर पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे इथल्या बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड
कोटी रुपयांचे समभाग आदी संपत्ती जप्त केली आहे.
****
राज्यात
काल तीन हजार ५८० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१९ लाख नऊ हजार ९५१ झाली आहे. काल ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार ५८ झाली असून, मृत्यू
दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल तीन हजार १७१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख चार हजार ८७१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात
५४ हजार ८९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३७ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड
जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू
झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल ६६ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३८, बीड ३५, नांदेड २९, जालना ३०,
उस्मानाबाद १४, परभणी १३, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले १२ नवीन रुग्ण
आढळले.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच
धार्मिक स्थळावर गर्दी करु नये, असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे. कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती
दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी
या आजाराच्या साथीचा प्रादुर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना
विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
माजी
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
‘सुशासन दिवस’ पाळण्यात येणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या
शेतकऱ्यांना दुपारी बारा वाजता संबोधित करणार आहेत. भाजपच्या सर्व जिल्हा शाखांमध्ये
पंतप्रधानांचं भाषण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं, प्रदेश उपाध्यक्ष माधव
भंडारी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री किसान
सन्मान योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपये निधी देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद
इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत. औरंगाबाद इथं
वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालती करंदीकर, कोविडग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारे उस्मानाबाद
इथले विलास गोरे आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे
सौदागर साठे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोलीचे
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.
****
कापूस पणन महासंघामार्फत परभणी जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या कापूस खरेदी केंद्रात नोंदणी करण्यासाठी उद्या २६ डिसेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. परभणी बाजार समिती अंतर्गत काही शेतकऱ्यांची नोंदणी
अद्याप झाली नसल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान,
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात येत्या २८ तारखेपासून तूर खरेदीसाठी नोंदणी
करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, चालू
वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा, पिकपेरा, बँकेचे पासबुक ही कागदपत्रे स्कॅन करुन नोंदणी करता येणार
आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ११ केंद्रांवर ही नोंदणी
करता येणार आहे.
****
नाताळचा सण तसंच नववर्षाच्या
पार्श्वभूमीवर लातूर महापालिका हद्दीत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात
आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषण होऊ नये यासाठी फटाके वाजवण्यास
घातलेली बंदी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रात लागू असलेली
रात्रीची संचारबंदी या दोन्ही बाबींचा विचार करुन लातूर महापालिकेने फटाकेबंदीचा निर्णय
घेतला आहे. शहरातील नागरिकांनी फटाके न वाजवता सहकार्य करावे, असं आवाहन महापलिका आयुक्त देविदास
टेकाळे यांनी केलं आहे.
****
बीडच्या
खासदार प्रीतम मुंडे यांनी काल परळी शहरातील मोंढा
मार्केट भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून नव्या कृषी कायद्याचं
महत्त्व आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याची माहिती दिली.
हा कायदा शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचं स्वातंत्र्य
प्रदान करणारा असून नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची मक्तेदारी संपुष्टात
येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेत रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५१ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी
सेवेत सामावून घेण्यात आलं आहे. या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते
नियुक्ती पत्रं काल प्रदान करण्यात आले. महानगरपालिकेत रोजंदारी
कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ८३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव होता,
या पैकी ५१ कर्मचारी पात्र ठरल्यानं सेवेत सामावून घेण्यात आलं.
****
हिंगोली शहरात राबवल्या गेलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत १५ बालकामगांची
सुटका करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण
कक्षानं ही मोहीम राबवली गेली.
या बाल कामगारांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात येऊन बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं.
****
दहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक
डॉ. राजन गवस यांची निवड झाली आहे. शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील
यांनी ही माहिती दिली. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हे
संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
****
परभणी पोलिसांच्या विशेष पथकानं काल बलसा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर
धाड टाकत तीन लाख नऊ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात
घेण्यात आलं आहे.
****
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करुन
चोरलेली १५ लाख रुपये किंमतीची वाहनं जप्त केली आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले
तीन आणि आखाडा बाळापूर इथला एक अशा या चार चोरांनी २३ दुचाकी
चोरल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यात घडलेल्या साधू तिहेरी हत्याकांड
प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी २६ आरोपींना अटक केली आहे. यामुळं या प्रकरणात
आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या ही जवळपास २५५ इतकी झाली आहे.
****
No comments:
Post a Comment