Wednesday, 30 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञान आणि अभिनव उपक्रमांचा उपयोग आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

** ब्रिटनसोबतच्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध येत्या सात जानेवारीपर्यंत कायम

** कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत या पूर्वी जारी मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारीपर्यंत लागू

आणि

** ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांची मोठी गर्दी

****

देशाच्या दुर्गम भागात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी तंत्रज्ञान आणि अभिनव उपक्रमांचा उपयोग आवश्यक असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. राष्ट्रपतींनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल इंडिया पुरस्कार प्रदान केले, त्यावेळी ते बोलत होते. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असून, डिजिटल समावेशाने आपलं जीवन अधिक सोपं झालं असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी यंत्रणेत डिजिटल बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.

****

ब्रिटनसोबतच्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली होती, ही स्थगिती आता आणखी आठवडाभर वाढवण्यात आली आहे. दरम्यान, देशात २० रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. 

****

कोविडवर विकसित होत असलेली लस, रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही प्रभावी ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे. मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार के. विजय राघवन यांनी हा दिलासा दिला आहे

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध साहित्यिक डॉ छाया महाजन यांनी केलं आहे. 

****

कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबतचे नियम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलं आहे. यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं आज जारी केली.

दरम्यान, कोरोना विषाणूचं संकट संपलेलं नसून राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार रात्री ११ पर्यंतच खुले राहणार असून त्यानंतर सर्व आस्थापना बंद होतील असं ते म्हणाले. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून औषधं आणणं, जेवण आणणं, यावर बंधन नसून सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर मात्र बंधन असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यभरातल्या सर्व पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना दिल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही उद्या ३१ डिसेंबर आणि परवा एक जानेवारी असे दोन दिवस रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन, कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज आठ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. तर चार जणांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार ४८४ झाली आहे. आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४३ हजार ८३१ झाली असून सध्या ४५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या विषाणू संसर्गानं जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

****

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. आज अखेरच्या दिवशी, लातूर जिल्ह्यातल्या तहसील कार्यालयामध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असल्यामुळे, राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची सवलत दिली होती, त्यामुळे इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येक ठिकाणी महसूल मंडळ निहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये केली होती. अर्ज भरण्याऱ्या आणि दाखल करण्याऱ्या इच्छुकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. 

****

नांदेड जिल्ह्यातही आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.

****

देशात पंजाब आणि हरयाणा सोडता कुठेही शेतकऱ्यांचा उद्रेक दिसत नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलनाला देशातल्या कोणत्या राज्यात, कितपत जन समर्थन आहे, असा सवाल कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात कोणताही शेतकरी रस्त्यावर आलेला नाही, असं सांगून या विधेयकाबद्दल शेतकऱ्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला असल्याचं पटेल म्हणाले. खासदार शरद पवार यांचा विधेयकाला विरोध नसून, विधेयक मांडण्याच्या पद्धतीला विरोध असल्याकडे पाशा पटेल यांनी लक्ष वेधलं. पवार कृषी मंत्री असताना त्यांनी या विधेयकासाठी समिती तयार केली होती, या कायद्याचा मसूदाही तयार झाला होता. मात्र ते राज्यसभेचे सदस्य असूनही या विधेयकावर चर्चा होत असताना गैरहजर का राहिले याचं उत्तर शोधावं, असंही पटेल म्हणाले.

****

अंमलबजावणी संचालनालय - ईडीच्या आडून भाजप सूडाचं राजकारण करत आहे, ही गंभीर बाब असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते, असं सांगून ईडीचा ज्या पध्दतीने राजकारणासाठी वापर होतोय ते पाहून अशा प्रकारचं राजकारण देशात कधी पाहण्यात आलं नाही,  असं मतही देशमुख यांनी व्यक्त केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगर पालिकेचा कार्यालयीन अधीक्षक सुरेश सत्यनायारण मणियार याला नगर पालिका कार्यालयात दीड हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडलं. प्लॉटची नोंद नगर पालिकेच्या मालमत्ता पुस्तिकेत करण्यासाठी मणियार यांनी दीड हजार रुपयांची मागणी केली होती.

****

सशस्त्रसेना ध्वजनिधीसाठी नांदेड जिल्ह्यातून १ कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार करण्यात आला असून देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीनं देणगी देता यावी यासाठी क्युआर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने अशा प्रकारे हा कोड तयार केला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातल्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातल्या तसंच सामान्य नागरिकांनी देणगी जमा करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसर आणि सुधाकरनगर इथं वीजचोरी करणाऱ्या ५ ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. या ग्राहकांनी ४ हजार ९८५ युनिटची वीजचोरी करून महावितरणचं ७० हजार रुपयांचं नुकसान केल्याचं उघडकीस आल्यावर या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांना अनुमानित देयकं देण्यात आली. देयकं न भरल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी दिली आहे.

****

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्रसिंग बलवंतसिंग गाडीवाले यांची आज बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी गाडीवाले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात वीज चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पूरवठा खंडित करण्यात आला आहे, त्याठिकाणी जाऊन चौकशी करावी, वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षीसं द्यावीत, त्याचबरोबर वीजचोरीला अभय देणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही राऊत यांनी दिले आहेत.

****

 

 

No comments: