Saturday, 26 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात काल नव्या २२ हजार २०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी एक लाख ६९ हजार ७६० इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख २७ हजार ३४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते ९५ पूर्णांक ७८ शतांश टक्के झालं आहे. काल २२ हजार २०० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९७ लाख ४० हजार १०८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ८१ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

राज्यात सध्या ५६ हजार ८२३ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख तेरा हजार ३८२ झाली आहे. त्यापेकी १८ लाख सहा हजार २९८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका झाला आहे. राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार १२९ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्या सध्या कोरोना विषाणूचे ५४१ सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात काल नव्या ८९ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ४५ हजार २८९ झाली आहे. त्यापैकी ४३ हजार ५५२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा दुसऱ्या सत्रातला हा एकोणिसावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातलं म्हैसमाळ हे गाव पाणी टंचाईनं अत्यंत ग्रासलेलं होतं, त्यामुळे पाणी आणण्यासाठी महिलांना भ्रमंती करावी लागत होती. नाशिकच्या सोशल नेटवर्किंग फोरम या समाज माध्यमातून विधायक कामासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांच्या संस्थेनं स्थानिक ग्रामस्थांच्या श्रमदानातून याच गावाजवळच्या एका धरणातून चर खोदून पाणी गावात आणलं. त्यामुळे पाण्याअभावी अनेक संकटामुळे चर्चेत असलेलं हे गाव आता गावात पाणी आल्यामुळे चर्चेत आलं आहे. सामाजिक माध्यमाद्वारे एकत्र आलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी या गावाचा पाणी प्रश्न सोडवला, तसंच या संस्थेनं आत्तापर्यंत १८ गावांमध्ये अशाप्रकारे पाणी आणून त्यांचा पाणीप्रश्न सोडवला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सांगितलं.

****

लष्करातल्या भीम पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या ‘टी ५५’ या शक्तीशाली रणगाड्याचं लोकार्पण काल अलिबाग इथं आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. अलिबागच्या समुद्र किनारयावर ठेवण्यात आलेला हा रणगाडा पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे.

****

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायदाच्या विरोधात पंजाबसह देशातले शेतकरी मागील ३० दिवसांपासून आंदोलन करत आहे, त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं शीख बांधवांसोबत आज शहरातल्या उस्मानपुरा इथं धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढच्या वर्षासाठी जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यात ११ जानेवारी २०२१ रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी सोहळा, १ मार्च रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम यांचा कंधार इथला ऊर्स आणि १३ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या २३ पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या पोलीस चौकीत महिला अंमलदार यांची बीट मार्शल म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्याअनुषंगानं ३७ महिला अंमलदार यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर महिला अंमलदारांना बीट मार्शल म्हणून संधी देण्यात येवून संपूर्ण बीटची जबाबदारी महिला अंमलदारांच्या खाद्यांवर टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतला आहे.

****

नांदेड-हैदराबाद-परभणी प्रवासी रेल्वे गाडी आता नांदेड-तांडूर-परभणी विशेष एक्सप्रेस रेल्वे म्हणून धावणार आहे. रेल्वे मंडळानं या बदलाला मान्यता दिली. येत्या १० जानेवारी पासून ही गाडी नांदेड-तांडूर-परभणी अशी धावणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या. शुभमन गील २८, तर चेतेश्वर पुजारा सात धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावात संपुष्टात आला. जसप्रित बुमराहनं चार, रविचंद्रन अश्विननं तीन, मोहम्मद सिराजनं दोन, तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.

****

No comments: