Monday, 28 December 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधल्या शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या शंभराव्या किसान रेल्वेला दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून रवाना करणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसंच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यावेळी नवी दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या किसान रेलची साप्ताहिक रेल्वे म्हणून ऑगस्ट मध्ये सुरुवात झाली, लोकप्रियता मिळाल्यानं आता आठवड्यातून तीन दिवस ही रेल्वे धावत आहे.

दरम्यान, पंतप्रधान आज देशातल्या पहिल्या चालकरहित मेट्रो रेल्वेचंही उद्घाटन करणार आहेत. दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाईन स्थानकावर पंतप्रधान या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील.

****

विदेशातून आलेल्या प्रवाशांनी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिला आहे. विदेशातून आलेल्या विशेषत: ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांसाठी मानक कार्यपद्धती काल ठरवण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. विदेशातून आलेले प्रवासी औरंगाबाद विमानतळावरुन महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या बसमधून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होतील, असं यावेळी सांगण्यात आलं. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

परभणी इथं लॉयन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी काल असोला पाटी इथल्या वृध्दाश्रमातल्या महिलांना ब्लँकेट वाटप केलं. लॉयन्स क्लबचे प्रांतपाल विवेक अभ्यंकर, प्रांतसचिव राहूल औसेकर, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा योजनेला एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त क्लबच्यावतीनं काल वृद्ध आणि निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आलं.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद ९५ धावा झाल्या होत्या. उमेश यादव, जसप्रित बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. भारत ३६ धावांनी आघाडीवर आहे.

****

 

 

 

No comments: