Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध
- पंतप्रधानांचं प्रतिपादन; शंभरावी किसान रेल्वे महाराष्ट्रातून पश्चिम बंगालकडे रवाना
**
कांद्यावरची निर्यात बंदी येत्या एक जानेवारीपासून
मागे
**
ईडीची नोटीस, हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं षडयंत्र
- खासदार संजय राऊत यांचा आरोप
**
राज्यात दोन हजार ४९८ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात
नव्या १५१ रुग्णांची नोंद
**
कोविड पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागतासंदर्भात
गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
**
शेतीसंबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या
निर्णयावर ठाम - अण्णा हजारे यांचा निर्धार
**
औरंगाबाद इथले ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत तांबे आणि उस्मानाबाद
इथले प्रतिष्ठित व्यापारी सुभाष गांधी यांचं निधन
** आणि
** ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतीय संघाची पकड
****
शेती आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
शंभरावी किसान रेल्वे हिरवा झेंडा दाखवून रवाना केली, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर
जिल्ह्यातल्या सांगोला इथून निघालेली ही रेल्वे, पश्चिम बंगालमधल्या शालिमार इथं जाणार
आहे. या वर्षी सात ऑगस्टला पहिली किसान रेल्वे, नाशिक जिल्ह्याच्या देवळाली इथून रवाना
झाली होती. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यात किसान रेल्वेचं योगदान महत्त्वाचं ठरणार
असून, कृषी क्षेत्रात मोठा बदल होणार असल्याचा विश्वास, पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त
केला. प्रारंभीच्या काळात साप्ताहिक असलेली किसान रेल्वे आता आठवड्यातून तीन वेळा धावते,
एका राज्यातले शेतकरी दुसऱ्या राज्यात आपला शेतमाल सहज पाठवू शकत आहेत, त्यांच्यासाठी
नवनवीन बाजार उपलब्ध होत आहेत, छोट्या शेतकऱ्याचा अत्यल्प शेतमालही किसान रेल्वेनं
पाठवता येतो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. धावतं शीतगृहं असलेल्या या किसान रेल्वेतून
फळं, दूध, भाजीपाला, मासळी असा नाशवंत माल आपल्या गंतव्य स्थळापर्यंत सुरक्षित आणि
रास्त दरात पोहोचवणं शक्य झालं आहे. किसान रेल्वेतून शेतमाल पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना
मालभाड्यात ५० टक्के सवलत दिली जात असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
****
कांद्यावरची निर्यात बंदी येत्या एक
जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे. विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल
याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.
कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं गेल्या सप्टेंबर महिन्यात कांदा
निर्यातीवर बंदी घातली होती.
****
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात
येणारी सामाईक प्रवेश परीक्षा 'एमएचटी-सीईटी'चा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. यंदा कोविड
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अध्यापन बंद असल्यानं, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम
२५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. तेवढ्याच अभ्यासक्रमावर यंदाची परीक्षा होणार असल्याचं
राज्य सीईटी विभागाने स्पष्ट केलं आहे. या परीक्षेत २० टक्के प्रश्न अकरावीच्या, तर
८० टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या दहावी तसंच बारावी परीक्षेच्या तारखा,
परवा ३१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. कोविड पार्श्वभूमीवर सीबीएसई मंडळानं अभ्यासक्रमात
३० टक्के कपात केली आहे. २०२१ साठीच्या मंडळाच्या परीक्षा ऑनलाइन नसून, लेखी स्वरुपाच्या
असणार आहेत. परीक्षा काळात कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीनं
पाळल्या जातील, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, असं मंडळाकडून
सांगण्यात आलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं आहे.
****
अंमलबजावणी संचालनालय - ईडीची नोटीस बजावणं, हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचं
षडयंत्र असल्याचा आरोप, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या
पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी काल मुंबईत
पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. आपण कायद्याचा आदर करतो त्यामुळे या नोटीसला जरुर
उत्तर दिलं जाईल, परंतु राजकीय सूडानं ही कारवाई होणार असेल, तर त्याला राजकीय पद्धतीनं
उत्तर दिलं जाईल, असा इशारा राऊत यांनी दिला. आपण कोणत्याही नोटीसला घाबरत नाही, राजकीय
वैफल्यातून अशा नोटिसा पाठवल्या जातात, प्रताप सरनाईक यांना पाठवलेली नोटीस ही अशाच
षडयंत्राचा भाग असल्याचं, राऊत म्हणाले.
****
टोकियो ऑलिम्पिकचा कोटा मिळालेल्या खेळाडूंना स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी प्रोत्साहन
म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल वितरित
करण्यात आला. यामध्ये दिव्यांग नेमबाज स्वरूप उन्हाळकर, नेमबाज राही सरनोबत आणि तेजस्विनी
सावंत, तीरंदाज प्रवीण जाधव आणि ॲथलीट अविनाश साबळे या खेळाडूंचा समावेश आहे.
****
राज्यात काल दोन हजार ४९८ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख २२ हजार
४८ झाली आहे. काल ५० रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ३०५ झाली असून,
मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका कायम आहे. काल चार हजार ५०१ रुग्ण बरे
झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख १४ हजार ४४९ रुग्ण, कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ४० शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५७ हजार १५९
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १५१ रुग्णांची
नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात चार, तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू
झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३२ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ३९, बीड २२, लातूर
२१, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी १३, उस्मानाबाद सात, तर परभणी जिल्ह्यात
काल कोविड संसर्ग झालेले चार नवीन रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी सुक्ष्म
नियोजन करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या लसीकरण कार्यक्रमात
कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्ष राहण्याची सूचना करतानाच,
कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी इथल्या ध्रूव कोविड रुग्णालयाची परवानगी रद्द करण्यात आली
आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
****
नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नये,
घरी राहूनच साधेपणानं हा दिवस साजरा करावा, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत, यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर, समुद्रकिनारी किंवा उद्यानांमध्ये गर्दी न करणं,
योग्य शारीरिक अंतराचं पालन करणं, आदी नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. कोणत्याही
प्रकारच्या मिरवणुका, आतषबाजी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासही मज्जाव करण्यात
आला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळांवर एकाच वेळी गर्दी न करता, आरोग्याच्या
बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन गृह विभागानं केलं आहे.
****
कोविड संसर्ग टाळण्यासाठी यंदा कोरेगाव भीमा इथं जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात नागरिकांनी
गर्दी टाळावी, असं आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे. ते काल पुण्यात
याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. नागरिकांच्या सोयीसाठी इथल्या अभिवादन कार्यक्रमाचं
दूरदर्शन वरुन थेट प्रसारण करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा
दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे
किमान हमी भाव मिळावा, फळं-फुलं, भाजीपाला, तसंच दुधाला उत्पादन खर्चाच्या आधारावर
किमान हमी भाव द्यावा, केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संवैधानिक
दर्जा द्यावा, आदी मागण्या हजारे यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर गेली तीन वर्ष आश्वासनं
आणि चर्चा झाल्या, आता ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं
हजारे यांनी या पत्रकात म्हटलं आहे.
****
दिल्ली इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, औरंगाबाद इथं विभागीय
आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी पक्ष आणि संघर्ष अल्पसंख्याक कामगार संघटनेच्या वतीनं,
आजपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. संघटनेच्या शिष्टमंडळानं काल विभागीय आयुक्तांच्या
मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करत, हे कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांना न्याय
देण्याची मागणी केली.
****
औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे
माजी प्रमुख, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीकांत तांबे यांचं काल निधन झालं. ते ८६
वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव देह आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात
येणार आहे. तांबे यांचे 'म्युजिंग्ज', 'वन हंड्रेड अँड वन' हे दोन इंग्रजी तर 'ताजा
कलम'हा मराठी कवितासंग्रह, 'इंग्लिश म्यूज ऑन इंडियन सॉईल' हा समीक्षात्मक ग्रंथ, आणि
ग.प्र.प्रधान यांच्या 'साता उत्तराची कहाणी' या कादंबरीचा, 'अ टेल विथ सेव्हन ॲन्सर्स'
हा इंग्रजी अनुवाद, अशी ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.
****
उस्मानाबाद शहरातले प्रतिष्ठित व्यापारी सुभाष गांधी यांचं काल अल्पशा आजारानं
निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्हा रोटरी क्लबचे ते अनेक वर्षे अध्यक्ष
होते. उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या अनेक संस्था संघटनांच्या उभारणीत आणि सामाजिक
कार्यात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नऊ वाजता
उस्मानाबाद इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात काल ८०२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज
दाखल केले. निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.
****
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन केंद्रावर अर्ज भरण्यासाठी येणारे इच्छुक
उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आर टी पी सी आर तपासणी करणं आवश्यक असल्याचं, परभणीचे
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे. उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधला जातो,
त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत.
*****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे विभागीय माहिती संचालक गणेश रामदासी
यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतीय संघानं पकड घेतली
आहे. सामन्यात आज चौथ्या दिवशी अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या
डावात नऊ बाद १९३ धावा झाल्या आहेत. मोहम्मद सिराजने तीन, जसप्रित बुमराह आणि रविंद्र
जडेजानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद
केला. भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला होता. ऑस्ट्रेलियाकडे सध्या ६२
धावांची आघाडी आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं आहे. उस्मानाबाद
इथं सेवालाल कॉलनीत तसंच जिल्ह्यात गंभीरवाडी इथं हे विवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला
मिळाली होती, बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नाने बाल विवाह रोखण्यात आले, तसंच वधू वर
आणि त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं.
****
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त काल लातूर इथं १३६ गरजूंना मोफत स्वेटर
वाटप करण्यात आलं. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी तर औरंगाबाद इथं शहराध्यक्ष
मोहमंद हिशाम उस्मानी यांनी काँग्रेस स्थापना दिनाच्या इतिहासाबाबत कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन केलं.
****
गॅस दरवाढीच्या विरोधात हिंगोली इथं राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा
शाखेच्या वतीनं काल चुलीवर भाकरी करून आंदोलन करण्यात आलं. पक्षाच्या जिल्हाध्यक्षा
सुमित्रा टाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यासह पक्षाच्या
पदाधिकारी तसंच कार्यकर्त्या या आंदोलनात सहभागी झाल्या.
****
नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी लातूर महापालिकेच्या वतीनं स्वच्छता
ताई भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याहस्ते
हिरवा झेंडा दाखवून काल या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. देशमुख यांनी काल कचरा वर्गीकरण
केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.
****
दत्त जयंती उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात देवगड इथल्या दत्त
मंदिरात यंदाचा जयंती सोहळा सध्या पद्धतीने साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद
तसंच नेवास्याकडून देवगडला येणारी वाहतुक आज सायंकाळपासून उद्या सायंकाळपर्यंत बंद
राहणार आहे.
****////****
No comments:
Post a Comment