आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
कृषी क्षेत्रात सुधारणा केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी
संवाद साधत होते. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी केंद्रसरकार प्रयत्नरत
आहे, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करत केंद्र सरकारनं शेतमालाला किमान हमीभावापेक्षा
दीडपट भाव मिळवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या सुमारे एक हजार बाजार समित्या
ऑनलाईन पद्धतीनं जोडल्या गेल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री किसान
सन्मान योजनेअंतर्गत ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार
रुपये या प्रमाणे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वर्ग करण्यात आला.
****
खवले मांजरांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेला राज्य शासनानं मान्यता
दिली आहे. राज्यात खवले मांजरांच्या वाढत्या तस्करीला चाप लावण्यासाठी स्वतंत्र ‘नियोजन
कृती आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. राज्यात खवले मांजर तस्करीचं प्रमाण वाढल्याचं
चित्र गेल्या काही वर्षांत तस्करीच्या प्रकरणामधून समोर आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर
हा निर्णय घेण्यात आला आहे
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या भिलज इथं बालविवाह रोखण्यात शासकीय यंत्रणेला
यश आलं. भिलज इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती महिला बालविकास
अधिकारी आर. आर. कांगणे यांच्यासह चाईल्डलाईनचे संदीप बेंडसुरे यांना मिळाली होती.
त्याबाबत त्यांनी शहानिशा करून हा विवाह रोखून पालकांचं समुपदेशन केलं.
****
औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातल्या समृद्धी या पिवळ्या
वाघिणीने काल पाच बछड्यांना जन्म दिला. वाघीण आणि बछड्यांची प्रकृती चांगली असून, थंडीपासून
बचावासाठी या वाघिणीच्या पिंजऱ्यात हिटर लावले असल्याची माहिती प्राणी संग्रहालय व्यवस्थापनानं
दिली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्यात, शेवटचं वृत्त हाती आलं
तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १४३ धावा झाल्या होत्या. रविचंद्रन अश्विननं तीनन,
तर जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment