Tuesday, 29 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 December 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** कोविड लसीकरणाची अभिरुप चाचणी यशस्वी; कर्नाटकात तिघांना नव्या विषाणूचा संसर्ग

** अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

** यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात मारहाणप्रकरणी गुन्हदाखल

** कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात आंदोलकांनी तडजोडीसाठी पुढे यावं- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन

आणि

** मराठा आरक्षणासंदर्भात समाजाला न्याय द्यावा- मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यपालांकडे मागणी

 

****

कोविड लसीकरण प्रक्रियेची अभिरुप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. आसाम, आंध्रप्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत ही चाचणी घेण्यात आली. लसीकरण प्रक्रियेतली आव्हानं ओळखून ती दूर करण्यासाठी योग्य ते बदल करणं, हा या चाचणीचा उद्देश होता. या चार राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये ही लसीकरण चाचणी घेण्यात आली, संबंधित जिल्हा प्रशासनानं यासाठी अभिरुप लाभार्थी यादी तयार करून, त्यांच्यापर्यंत लस पोहोचवण्यापर्यंतची प्रक्रिया को-विन या सॉफ्टवेयरच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केली. या चाचणीदरम्यान आलेल्या अनुभवातून प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबवली जाईल, असं आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कर्नाटकात तीन रुग्णांना कोरोना विषाणूच्या नव्या अवताराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी ही माहिती दिली. हे तीन ही रुग्ण नुकतेच ब्रिटनहून परतले आहेत. कर्नाटकात नोव्हेंबर महिन्यापासून सुमारे सोळाशे नागरिक ब्रिटनहून आले आहेत, यापैकी २८० प्रवाशांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. उर्वरित प्रवाशांपैकी २६ जणांना कोविड संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामध्ये तीन रुग्ण नव्या कोरोना विषाणूनं बाधित आहेत. विषाणू संसर्ग पसरू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका प्रवाशालाही या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलं आहे. 

****

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांकरता ५९ हजार ४८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. या शिष्यवृत्तीपैकी ६० टक्के वाटा केंद्र सरकार तर ४० टक्के वाटा राज्य सरकार वहन करणार आहे. दहावीनंतरच्या उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले अनुसूचित जाती प्रवर्गातले सुमारे एक कोटी ३६ लाख विद्यार्थी यामुळे पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला. राज्य सरकारांकडून या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळताच, शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं गहलोत यांनी सांगितलं.

****

चारचाकी वाहनातल्या प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत, चालकाच्या शेजारील आसनासाठीही एअरबॅग बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. नव्या वाहनांना येत्या एक एप्रिलपासून, तर जुन्या वाहनांसाठी येत्या एक जूनपासून हा निर्णय लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. परिवहन मंत्रालयानं यासंदर्भातला मसूदा आपल्या संकेतस्थळावर प्रदर्शित केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी पुढच्या महिन्याभरात आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. सोमवारी खासदार गवळी यांच्या नेतृत्वात ईफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता,  या आंदोलनादरम्यान कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांच्याशी चर्चा सुरु असताना संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकांच्या अंगावर सोयाबीन फेकून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी व्यवस्थापकांनी अद्याप कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही, मात्र पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्यानं पोलिसांनीच फिर्याद दाखल करून विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत.

****

कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असून आंदोलनकर्त्यांनी तडजोडीसाठी पुढे येण्याचं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदे रद्द करण्याची मागणी संविधानानुसार योग्य नाही. मोदी सरकारनं शेतकरी हितासाठी हे कायदे आणले असून काही पक्ष आणि संघटना गैरसमज पसरवत असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज सहा नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. तर आठ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५ हजार ४२४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ७५६ जणांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून सध्या ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

लातूर जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले ४९ नवे रुग्ण आढळले, जिल्ह्यातली कोविड रुग्णसंख्या २२ हजार ९२९ वर पोहोचली आहे, जिल्ह्यात या संसर्गाने आतापर्यंत ६७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

****

परभणी जिल्हा पोलिस दलातले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली जात आहे. आजपर्यंत एकूण ३५२ जणांची चाचणी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या निर्देशावरून हे अभियान राबवलं जात आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात समाजाला न्याय देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. आज मुंबईत राजभवन इथं राज्यपालांना हे निवेदन देण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे वकील बाजू मांडण्यास सक्षम नाहीत. तसंच महाविकास आघाडीचे मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा राजीनामा घेण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

****

दत्त जन्मोत्सवाचा सोहळा आज सर्वत्र भक्तिभावाने साजरा होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर आज या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातूनही भाविक आले आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी याठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर होत असून, सुरक्षित अंतरही पाळलं जात आहे.

****

नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या ३४व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज झाला. या सोहळ्यात कॅप्टन संतोषकुमार सोरापल्ली यांना मानाचा ‘सिल्वर चित्ता’ करंडक तर कॅप्टन तारीफ सिंग यांना उत्कृष्ट उड्डाणासाठीचा ‘कॅप्टन एस.के.शर्मा’ स्मृतिचषक प्रदान करण्यात आला. अन्य ३३ गुणवंत वैमानिकांना यावेळी विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****

उस्मानाबाद शहर आणि तालुक्यातल्या नागरिकांसाठी टपाल कार्यालयाने चार ते चौदा जानेवारी दरम्यान विशेष डाक मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या डाक मेळाव्यात टपाल कार्यालयातल्या विविध योजना, तसंच आधार नूतनीकरण अशा सेवा विशेष कर्मचाऱ्यांचा वापर करून पुरवल्या जाणार आहेत. नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन उस्मानाबाद इथले पोस्टमास्टर बी व्ही पाटील यांनी केलं आहे.

//***********//

No comments: