Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ८३ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे. काल २१
हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९७ लाख ८२ हजार रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले आहेत. काल नव्या २० हजार २१ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण
रुग्णसंख्या, एक कोटी दोन लाख इतकी झाली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्यांची
संख्या सातत्यानं घटत असून, सध्या सुमारे दोन लाख ७७ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आतापर्यंत या आजारानं देशात एक लाख ४७ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातला
कोविड मृत्यू दर एक पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी
मृत्यूदर आहे.
****
ब्रिटनहून भारतात
आलेल्या सहा जणांना कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे. यातले तीन प्रवासी
बंगळूरु इथले, दोन हैदराबाद आणि एक पुणे इथला आहे. या प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात
आलेल्या व्यक्तींना विलगीरकणात ठेवण्यात आलं आहे. या प्रवाशांच्या सहप्रवाशांचाही शोध
सुरु असल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविड संदर्भातल्या
देखरेखीबाबत यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू
असतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं काल एका अधिसूचनेद्वारे स्पष्ट केलं आहे. देशात
नव्यानं सापडणाऱ्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली
तरी जागतिक पातळीवर वाढत असलेला संसर्ग आणि ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा आढळलेला नवा
प्रकार, या पार्श्वभूमीवर देखरेख, प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचं मंत्रालयानं
सांगितलं आहे.
****
वस्तू आणि सेवा
कर - जीएसटी महसूलाची तूट भरुन काढण्यासाठी, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी
रुपयांचा नववा साप्ताहिक हप्ता राज्यांना जारी केला आहे. यापैकी पाच हजार ५१६ कोटी
६० लाख रुपये २३ राज्यांना, तर ४८३ कोटी ४० लाख रुपये दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसंच
पुद्दुचेरी या विधानसभा असलेल्या, तीन केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. याअंतर्गत
महाराष्ट्राला आतापर्यंत १५ हजार ३९५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
****
तीन नव्या कृषी
कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात
आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना उद्या बुधवारी चर्चेसाठी बोलावलं आहे. सरकार आणि
आंदोलक शेतकऱ्यांदरम्यानची या मुद्यावरील चर्चेची ही सहावी फेरी असेल. या संदर्भात
केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या ४० शेतकऱ्यांना पत्र लिहून त्यांना चर्चेसाठी निमंत्रित
केलं आहे. कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा या
मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल.
****
पुण्यातल्या
सीरम इन्स्टिटय़ूटनं तयार केलेल्या, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट
व्हॅक्सिन - ‘न्यूमोसिल’ या लशीचं लोकार्पण
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल केलं. जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील
सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचं कारण न्यूमोनिया असून, त्यापैकी २० टक्के बालकं भारतीय
आहेत. आतापर्यंत लस आयात करत असल्यामुळे ती देशातल्या सर्व बालकांसाठी देणं शक्य नव्हतं,
आता सीरमनं तयार केलेली संपूर्ण भारतीय बनावटीची लस भारतासह जगातले बालमृत्यू रोखण्यास
उपयुक्त ठरेल, असं मत डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
औरंगाबादच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरातल्या २५० खाटांचं सुपरस्पेशालिटी
रुग्णालय, केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील हेल्थ सर्विसेस कन्स्लटन्सी कार्पोरेशननं
३१ डिसेंबर पूर्वी घाटी प्रशासनास हस्तांतरित करावं, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनिल
चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. तत्पूर्वी या इमारतीतल्या
सर्व सोयी सुविधा पूर्ण करून द्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
केली आहे.
****
नाशिक मधल्या
न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेचा सहायक संचालक अमासिद्ध तिपण्णा पांढरे याला दहा
हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. मृत व्यक्तीचा जुना ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी
घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
कर्णधार अजिंक्य
रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मेलबर्न इथं झालेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला.
भारताची पहिल्या डावातली १३१ धावांची आघाडी भरुन काढण्यासाठी फलंदाजीस उतरलेला ऑस्ट्रेलियाचा
संघ, ७० धावांची आघाडी घेऊन, २०० धावात तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं तीन, जसप्रित
बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादवनं एक गडी
बाद केला. भारतानं दुसऱ्या डावात दोन गडी गमावत विजयाचं लक्ष्य साध्य केलं. शुभमन गिल
३५, तर अजिंक्य रहाणे २७ धावांवर नाबाद राहीले. पहिल्या डावात शतकी खेळी खेळणारा रहाणे
सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत
एक - एक अशी बरोबरी साधली आहे.
//**********//
No comments:
Post a Comment