Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
आयुष्मान भारत
योजनेमुळे गरीब लोकांना चांगल्या उपचाराच्या संघर्षातून मुक्त केलं असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
गुजरातच्या राजकोट इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सची पायाभरणी केली, त्यानंतर
ते बोलत होते. देशात वैद्यकीय शिक्षण सुधारण्यासाठी सरकार मिशन मोड वर काम करत असून,
राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणात सुधारणा होईल, आणि संस्थांची
संख्या वाढेल, असं पंतप्रधान म्हणाले. अंदाजे एक हजार १९५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात
येणारं हे रुग्णालय, २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. अत्याधुनिक ७५०
खाटांच्या रुग्णालयात ३० खाटांचा आयुष विभाग असेल, त्यात १२५ एमबीबीएस जागा आणि नर्सिंगसाठी
६० जागा असतील.
****
देशात कोविड
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९६ पूर्णांक शून्य चार शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.
काल २६ हजार १३९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ६० हजार २८० रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले आहेत. काल नव्या २१ हजार ८२१ रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण
रुग्णसंख्या, एक कोटी दोन लाख ६६ हजार ६७४ इतकी झाली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत
असलेल्यांची संख्या सातत्यानं घटत असून, सध्या सुमारे दोन लाख ५७ हजार ६५६ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. काल २९९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, आतापर्यंत या आजारानं
देशात एक लाख ४८ हजार ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातला कोविड मृत्यू दर एक पूर्णांक
४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी मृत्यूदर आहे.
****
देशात सर्वदूर
वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री
आर के सिंग यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या
१८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाच्या जागतिक महामारीचा सामना करत असतानाही, देशात सुमारे
दोन कोटी ८० लाख नवीन ग्राहकांपर्यंत वीज पोहोचली, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येक
घरात २४ तास वीज वितरित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नात कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही
त्यांनी दिली. गेल्या सहा-साडे सहा वर्षांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या
कार्यकाळात भारतानं अतिरिक्त वीज निर्मिती करणारं राष्ट्र असा दर्जा प्राप्त केला आहे,
भारत आता देशांतर्गत मागणी समवेत बांगलादेशसह इतर शेजारी राष्ट्रांनाही वीज पुरवण्यात
सक्षम झाल्याचं ऊर्जामंत्र्यांनी नमूद केलं.
****
देशात उद्यापासून
सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकार असणार आहे. यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर
थांबावं लागणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन,
एक डिसेंबर २०१७ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना देखिल फास्टटॅग अनिवार्य असल्याचं
सांगितलं होतं. आतापर्यंत दोन कोटी २० लाखहून अधिक फास्टटॅग जारी केले असल्याचं मंत्रालयानं
सांगितलं. देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यावर, तसंच तीन
हजारांहून अधिक अन्य ठिकाणी फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट
आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही फास्टटॅग खरेदी करता येतील.
****
प्राप्तिकर
विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लेखा परीक्षण
आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरणपत्र भरता
येणार आहे. विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे. वस्तू आणि
सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात
आली आहे. आता या व्यावसायिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करण्यात येईल.
****
राज्यात इथून
पुढे शहरांसाठी तयार करण्यात येणारे विकास आराखडे जीआयएस प्रणालीवर आधारित केले जाणार
आहेत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातल्या प्रथम अशा या प्रस्तावाला मंजुरी
दिली असून, नगरविकास विभागानं यासाठी तज्ज्ञ पात्र संस्थांची निवड सूची काल प्रकाशित
केली. राज्याचं झपाट्यानं नागरीकरण आणि त्याचा रेटा वाढत असताना शहरांचा नियोजनबद्ध
विकास हे मोठं आव्हान होऊन बसलं आहे. यासाठी जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती यंत्रणेवर
आधारित विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं जानेवारी २०१९ मध्येच घेतला
होता.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण
भागातही आज ३१ डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी असे दोन दिवस, रात्री ११ ते सकाळी सहा
वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं
परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात
गर्दी होऊन, कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं
या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त
निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं
आहे.
//*************//
No comments:
Post a Comment