Wednesday, 30 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** देशातल्या चार राज्यात कोविड लसीकरण प्रक्रियेची अभिरुप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

** महाराष्ट्रात एकही रुग्ण ब्रिटनमधल्या नव्या विषाणूने बाधित नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे

** राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५४ शतांश टक्के; मराठवाड्यात नवे २३३ रुग्ण

** अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जाहीर

** रिक्त पदांची भरतीप्रक्रिया तातडीनं सुरु करावी- विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची सूचना

** मराठा आरक्षणासंदर्भात न्याय देण्याची मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यपालांकडे मागणी 

आणि

** मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; कर्णधार अजिंक्य राहणे सामनावीर

****

कोविड लसीकरण प्रक्रियेची अभिरुप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. आसाम, आंध्रप्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये, गेल्या दोन दिवसांत ही चाचणी घेण्यात आली. लसीकरण प्रक्रियेतली आव्हानं ओळखून ती दूर करण्यासाठी योग्य ते बदल करणं, हा या चाचणीचा उद्देश होता. या चार राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये ही लसीकरण चाचणी घेण्यात आली, संबंधित जिल्हा प्रशासनानं यासाठी अभिरुप लाभार्थी यादी तयार करून, त्यांच्यापर्यंत लस पोहोचवण्यापर्यंतची प्रक्रिया, को-विन या सॉफ्टवेयरच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केली. या चाचणीदरम्यान आलेल्या अनुभवातून प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबवली जाईल, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, कोविड प्रतिबंधासंदर्भात यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना येत्या ३१ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत.

****

महाराष्ट्रात एकाही कोविडग्रस्ताला ब्रिटनमधल्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेला नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे, ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांनी अवयवदानासाठी पुढे यावं, असं प्रत्यारोपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचं टोपे म्हणाले. कोविड संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशभरात ब्रिटनहून परतलेल्या सात रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.

****

राज्यात काल तीन हजार १८ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली आहे. काल ६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ३७३ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे. काल पाच हजार ५७२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख २० हजार २१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५७ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २३३ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ५८ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ४९, बीड ४३, नांदेड ४१, जालना २०, उस्मानाबाद १२, परभणी आठ तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन नवीन रुग्ण आढळले.

****

परभणी जिल्हा पोलिस दलातले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली जात आहे. आजपर्यंत एकूण ३५२ जणांची चाचणी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या निर्देशावरून हे अभियान राबवलं जात आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

तीन नव्या कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं या कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. या मुद्यावर चर्चेची ही सहावी फेरी असेल. कृषी कायद्यांव्यतिरिक्त किमान हमी भाव, हवेची गुणवत्ता आणि वीजपुरवठा, या मुद्यांवरही यावेळी चर्चा केली जाईल.

****

राज्य सरकारांना विश्वासात न घेता केंद्र सरकारनं कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल काही शेतकऱ्यांनी दिल्लीत पवार यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीत बसून शेती करता येत नाही, अशी उपरोधिक टीकाही पवार यांनी केली.

****

दरम्यान, कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात आंदोलकांनी चर्चा करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हे कायदे शेतकरी हिताचे असून, काही पक्ष आणि संघटना त्याबाबत गैरसमज पसरवत असल्याचं आठवले म्हणाले. मागासवर्गीयांनी विविध महामंडळाकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याच्या मागणीसह, अन्य मागण्यांसाठी आरपीआयच्या वतीनं आंदोलनाचा इशाराही आठवले यांनी दिला.

****

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारनं मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांकरता ५९ हजार ४८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी, काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या शिष्यवृत्तीपैकी ६० टक्के वाटा केंद्र सरकार तर ४० टक्के वाटा राज्य सरकार वहन करणार आहे. दहावीनंतरच्या उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले अनुसूचित जाती प्रवर्गातले, सुमारे एक कोटी ३६ लाख विद्यार्थी, यामुळे पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतील, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला. राज्य सरकारांकडून या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळताच, शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं गहलोत यांनी सांगितलं.

****

चारचाकी वाहनातल्या प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेत, चालकाच्या शेजारील आसनासाठीही एअरबॅग बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. नव्या वाहनांना येत्या एक एप्रिलपासून, तर जुन्या वाहनांसाठी येत्या एक जूनपासून हा निर्णय लागू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. परिवहन मंत्रालयानं यासंदर्भातला मसूदा आपल्या संकेतस्थळावर प्रदर्शित केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी पुढच्या महिन्याभरात आपल्या सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्य लोकसेवा आयोगानं कक्षेबाहेरच्या गट क पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांची गुणमर्यादा, ४५ टक्क्यांवरुन ४० टक्के करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवा नियुक्तीच्या परीक्षेत किमान गुणांची अट शिथील करण्याच्या अनुषंगाने, काल मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी भरणे यांनी हे निर्देश देत, या मागणीबाबत सकारात्मक विचाराचं आश्वासन दिलं.

****

शासकीय सेवेत एक लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया तातडीनं सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी संख्या तसंच शासकीय सेवेतल्या विविध वर्गातली रिक्त पदं पाहता, नव्या वर्षापासून भरती प्रक्रिया राबवावी, असं पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. कोविड प्रादुर्भावातून उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भरतीसाठी वयोमर्यादा अट शिथिल करण्यात यावी, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. खासदार गवळी यांच्या नेतृत्वात परवा शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी विमा कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांना मारहाण झाली होती. याप्रकरणी व्यवस्थापकांनी कुठलीही तक्रार दाखल केली नाही, मात्र पोलिसांच्या समोर हा प्रकार घडल्यानं पोलिसांनीच फिर्याद दाखल करून गुन्हे नोंदवले आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात समाजाला न्याय देण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. काल मुंबईत राजभवन इथं राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन सादर करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे वकील बाजू मांडण्यास सक्षम नाहीत, तसंच महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार, हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यानं, त्यांचे राजीनामे घ्यावे असं या निवेदनात म्हटलं आहे.

****

मध्ययुगीन भारताच्या जडणघडणीत महात्मा बसवेश्वर यांचं मोलाचं योगदान आहे, असं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले समाज शास्त्राचे प्राध्यापक डॉ. डी. श्रीकांत यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात, "महात्मा बसवेश्वर : क्रांतिकारी विचार कार्य", या विषयावर बोलत होते. ज्ञानामुळेच समाजातले असंख्य प्रश्न सुटण्यास मदत होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करावा, विचाराला आचरणाची जोड द्यावी, असं आवाहन डॉ. श्रीकांत यांनी केलं.

****

हवामान अद्ययावत शेतीसाठी पीक हवामान प्रतिमाने मोलाची भूमिका बजावत असल्याचं, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी म्हटलं आहे. हवामान अद्ययावत शेतीची साधने या विषयावर आयोजित आठवडाभराच्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.

****

कामगार संघटना संयुक्त कृती समितीने शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी, देशातल्या अंबानी आणि अदानी या दोन उद्योग समूहांवर, येत्या एक तारखेपासून बहिष्कार मोहीम पुकारली आहे. काल औरंगाबाद इथं झालेल्या पत्रकार परिषदेत समितीचे नेते डॉ भालचंद्र कांगो यांनी ही माहिती दिली. तीनही सुधारित कृषी कायदे मागे घ्यावेत, शेत मालासाठी किमान आधारभूत किंमत कायदा लागू करावा, आदी मागण्या या समितीनं केल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे बहिष्कार आंदोलन सुरू राहणार असल्याचं, डॉ कांगो यांनी सांगितलं

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे तहसीलदार दत्तू शेवाळे यांनी केलं आहे.

****

कर्णधार अजिंक्य रहाणेची चमकदार फलंदाजी आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मेलबर्न क्रिकेट कसोटी सामना आठ गडी राखून जिंकला. काल चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ, दुसऱ्या डावात, अवघ्या ७० धावांची आघाडी घेऊन, २०० धावांतच तंबूत परतला. मोहम्मद सिराजनं तीन, जसप्रित बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन, तर उमेश यादवनं एक गडी बाद केला. भारतानं विजयासाठीचं लक्ष्य दोन गडी गमावत साध्य केलं. शुभमन गिल ३५, तर अजिंक्य रहाणे २७ धावांवर नाबाद राहिले. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतला पुढचा सामना येत्या सात जानेवारीपासून सुरू होणार आहे.   

****

दत्त जन्मोत्सवाचा सोहळा काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी, राज्याच्या विविध भागांसह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातूनही भाविक आले होते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या देवगड इथं, मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा साजरा झाला. मराठवाड्यात बीड, परभणी, जालन्यासह सर्वच ठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांनी कोविड नियमांचं पालन करून दर्शन घेतलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ४२८ ग्रामपंचायतींच्या तीन हजार ६६२ ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी कालपर्यंत दोन हजार ३०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

****

लातूर जिल्ह्यात सर्व रस्ते, राज्य तसंच राष्ट्रीय महामार्गांचं डीजिटल सर्वेक्षण करून ‘डीस्ट्रिकट रोड - डॅशबोर्ड’ तयार करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. काल देशमुख यांनी लातूर इथं सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी हे निर्देश दिले. नवीन रस्त्यांची बांधणी, दुरूस्ती आणि नूतनीकरण ही कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत, हा या मागचा उद्देश आहे.

****

कोविड प्रादुर्भावाच्या काळातही बीड जिल्ह्यात क्षयरुग्णांवर उपचार करणाऱ्या १३० खासगी डॉक्टरांना काल जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या डॉक्टरांनी कोविड काळात ५८४ क्षयरुग्णांवर उपचार केले.

//************//

 

 

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...