Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
·
शेतकऱ्यांना
शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नरत- पंतप्रधानांची ग्वाही
·
विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्यभरात सुशासन
दिवस साजरा
·
जालना तसंच औरंगाबाद इथं आज प्रत्येकी एका कोविडबाधिताचा
मृत्यू
आणि
·
खवले मांजरांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेला राज्य शासनाची
मान्यता
****
शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी केंद्रसरकार प्रयत्नरत
असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर
शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करत केंद्र सरकारनं
शेतमालाला किमान हमीभावापेक्षा दीडपट भाव मिळवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या
सुमारे एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीनं जोडल्या गेल्या असून, दहा हजारापेक्षा
अधिक शेतकरी उत्पादक गट स्थापन करणं आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी काम सुरू
असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात सुधारणा करून सरकारने शेतकऱ्यांना
अधिक चांगले पर्याय उपलब्ध करून दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. यावेळी प्रधानमंत्री
किसान सन्मान योजनेअंतर्गत ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये
या प्रमाणे १८ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले.
पंतप्रधानांनी यावेळी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या
योजनांपासून झालेल्या लाभाबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. लातूर जिल्ह्यातल्या औसा
तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले यांनी पंतप्रधानांशी बोलताना, प्रधानमंत्री फसल बिमा
योजनेचा आपण लाभ घेतला असून, त्यामाध्यमातून ५४ हजार रुपये मिळाल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त
करणारे असून, राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा
आरोप, माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला
आहे. पुण्यात मांजरी इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कंत्राटी शेती बाबतचा
कायदा २००६ पासून महाराष्ट्रात लागू आहे. त्यावेळी हा कायदा करणारे आज मात्र त्याच
कायद्यांना विरोध करत आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं
आवाहन लातूर इथले प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी केलं आहे.
****
नागपूर इथल्या विधान भवनातलं विधानमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार आहे.
पूर्वी हे सचिवालय फक्त नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळातचं सुरू राहत असे.
वर्षभर सुरू राहणाऱ्या या कक्षाचं येत्या ४ जानेवारीला उद्धाटन होणार आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज सुशासन
दिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवण्यात आले. पुण्यात भाजप युवा
मोर्चाच्या वतीने मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नूतन मराठी विद्यालयाच्या
मैदानावर रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यात सुमारे ५५० दात्यांनी रक्तदान केलं.
****
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात “माहितीचा
अधिकार अधिनियम आणि सेवा हमी कायदा” या विषयावर आज सुशासन दिनानिमित्त ऑनलाईन
प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भीमराव हाटकर
यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केलं
****
उस्मानाबाद इथल्या लोकसेवा समितीच्यावतीने सातत्यपूर्ण
समाजसेवा करणाऱ्या सेवा वृत्तींना मराठवाडा विभागीय लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्या
आले. औरंगाबाद इथं वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालती करंदीकर, कोविडग्रस्त
मृतांवर अंत्यसंस्कार करणारे उस्मानाबाद इथले विलास गोरे आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयात
कोविड काळात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे सौदागर साठे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं
****
जालना जिल्ह्यात आज एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू
झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४३ झाली
आहे. दरम्यान, आज दिवसभरात दिवसभरात ३१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ३५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त
झालेल्या १७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बार हजार ४०४ रुग्ण
या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथं आज एका ६५ वर्षीय पुरुष कोविड बाधिताचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. तसंच चार रुग्णांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. आज पाच नवे कोविड
बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची
संख्या आता ४५ हजार २०५ झाली आहे. आजपर्यंत ४३ हजार ४५५ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर
मात केली असून ५५६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यातल्या विविध
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड बाधितांना आज नाताळ निमित्त विशेष भोजन देण्यात
आलं.
****
खवले
मांजरांच्या संवर्धनासाठी तज्ज्ञ समितीच्या स्थापनेला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. राज्यात खवले मांजरांच्या वाढत्या तस्करीला चाप लावण्यासाठी स्वतंत्र
‘नियोजन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यात खवले मांजर तस्करीचं प्रमाण वाढल्याचं
चित्र गेल्या काही वर्षांत तस्करीच्या प्रकरणामधून समोर आलं आहे. त्यापार्श्वभूमीवर
हा निर्णय घेण्यात आला आहे
****
औरंगाबाद
इथं सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातल्या समृद्धी या पिवळ्या वाघिणीने आज पाच
बछड्यांना जन्म दिला. वाघीण आणि बछड्यांची प्रकृती चांगली असून थंडीपासून बचावासाठी
त्यांच्या पिंजऱ्यात हिटर लावले असल्याची माहिती प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाकडून
देण्यात आली
****
परभणी
जिल्ह्यात एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमी चळवळ राबवण्यात येत आहे. सर्व जातीधर्मासाठी
सर्व सोयीसुविधांनीयुक्त स्वच्छ स्मशान भूमी असावी यासाठी प्रगतीशील शेतकरी कातंराव
देशमुख झरेकर यांनी पुढाकार घेतला आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर
परभणी जिल्ह्यात ‘एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमी’
चळवळ राबवण्यात येत आहे.यासाठी पुढाकार घेतला आहे प्रगतीशील शेतकरी कांतराव देशमुख
झरेकर यांनी. यासंदर्भात कांतराव देशमुख म्हणाले.
माझी एक संकल्पना अशी आहे की एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमी
असली पाहिजे. कुठल्याही जातीचा असला तरी एकाच स्मशानभूमीत अंत्यविधी झाला पाहिजे. आणि
ती स्वच्छ सुंदर असायला पाहिजे. म्हणून मी माझ्या आईच्या नावाने सौ.वत्सलादेवी देशमुख
यांच्या नावाने एक लाख रुपयांचं बक्षीस एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमीला देणार आहे.
याचळवळीमुळे गाव पातळीवर निश्चितच चांगले
वातावरण निर्माण होईल. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
नांदेडचे
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढच्या वर्षासाठी जिल्ह्यात तीन स्थानिक सुट्ट्या
जाहीर केल्या आहेत. यात ११ जानेवारी २०२१ रोजी श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रा पालखी
सोहळा, १ मार्च रोजी हाजी सय्याह सरवरे मगदुम यांचा कंधार इथला ऊर्स आणि १३ सप्टेंबर
रोजी ज्येष्ठा गौरी पूजन, या तीन स्थानिक सुट्ट्यांचा समावेश आहे.
//*************//
No comments:
Post a Comment