Wednesday, 30 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित अभिनव उपक्रमांचा उपयोग देशाच्या दुर्गम भागातही आर्थिक समावेशकता आणि सामाजिक परिवर्तनासाठी करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल इंडिया पुरस्कार २०२० प्रदान केले, त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका असून, डिजिटल समावेशाने आपलं जीवन अधिक सोपं झालं असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं प्रथमच डिजिटल इंडिया पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया नामांकनांपासून ते अंतिम पुरस्कार सोहळ्यापर्यंत ऑनलाईन पार पडली. ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात.

****

ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली होती, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, देशात या नव्या विषाणूचे २० रुग्ण आढळले आहेत. 

****

रचना बदललेल्या नव्या विषाणूविरोधातही लस प्रभावी ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केला आहे. सध्या तयार होत असलेल्या लसी नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार नसल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबतचे नियम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं आज मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. याआधी प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू केलेले नियम ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. 

****

देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे. काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४ हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या २० हजार ५०० रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या, एक कोटी दोन लाख इतकी झाली आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्यांची संख्या सातत्यानं घटत असून, सध्या सुमारे दोन लाख ६२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत या आजारानं देशात एक लाख ४८ हजार ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातला कोविड मृत्यू दर एक पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी मृत्यूदर आहे.

****

राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी, जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्जही आज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावे, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यानं, ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागानं माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत वीज चोरीला आळा घालावा आणि महावितरणचा महसूल वाढवावा, असे निर्देश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात वीज चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी थकबाकीपोटी ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पूरवठा खंडित करण्यात आला आहे, त्याठिकाणी जाऊन चौकशी करावी, वीज चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षिसे द्यावीत, त्याचबरोबर वीजचोरीला अभय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही राऊत यांनी यावेळी दिले.

****

पंजाब आणि महाराष्ट्र कॉऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. संचालनालयानं वर्षा राऊत यांना पाच जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही उद्या ३१ डिसेंबर आणि परवा एक जानेवारी असे दोन दिवस रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. नविन वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगानं औरंगाबाद ग्रामीण भागात गर्दी होऊन कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  

**//**

 

 

No comments: