Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** नव वर्षाचं स्वागत शांततेनं,
साधेपणानं करा- गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन
** परवा- शनिवारपासून कोरोना
विषाणू संसर्गावर लसीकरण सुरू होणार
** कोरोना विषाणू संसर्गाचे
जालन्यामध्ये २१ तर औरंगाबादमध्ये आठ नवे रुग्ण
आणि
** `फास्टॅग`
लावण्यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
****
कोरोना विषाणू संसर्गाचं
संकट संपलेलं नसून, राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं
आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट,
पब, बार रात्री ११ पर्यंतच खुले राहणार असून, त्यानंतर सर्व आस्थापना बंद होतील असं
ते म्हणाले. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून औषधं आणणं, जेवण आणणं, यावर बंधन
नसून, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर मात्र बंधन असल्याचं,
देशमुख यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज ३१ डिसेंबर आणि उद्या
एक जानेवारी असे दोन दिवस, रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं
स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन, संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ
शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. औरंगाबादचे
पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास
सांगितलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या
नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं इतर आजारांच्या रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावं असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आरोग्य विभागातील पदभरतीला गती मिळावी
यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी
ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातली पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत
पूर्ण करावी, फिरतं शस्त्रक्रीया केंद्र सुरू करावं, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी
संगणक प्रणाली तयार करावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गवरचं लसीकरण परवा- शनिवारपासून सुरू
करण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज सांगितलं. ते एका
उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाची पुरेशी
तयारी करण्याचं सांगितलं आहे. सर्व राज्यांत काही प्रमुख शहरांमध्ये या लसीकरणाचा अभ्यास
केला जाणार आहे. लसीकरणाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवणं आणि सहभागी लोकांना प्रशिक्षण
देणं हा या अभ्यासाचा उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव भुषण यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात तीन कोरोना विषाणू
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर २१ नवे रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या
आता १३ हजार १६७ झाली असून जिल्ह्यात या संसर्गानं आतापर्यत ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला.
आज ४१ रुग्णांना या आजारानं बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. तर सध्या २८१ रुग्णांवर
रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या दोन कोविड बाधितांचा आज उपचारांदरम्यान
मृत्यू झाला.तर आठ नवे कोविड बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाले. जिल्ह्यात
आतापर्यंत एक हजार २०२ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत
४३ हजार ८७५ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून ४७३ रुग्णांवर सध्या उपचार
सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना
कोरोना विषाणू संसर्गाची लागण झाली आहे. त्यांना गेल्या तीन चार दिवसांपासून ताप आणि
सर्दीचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली असता हे स्पष्ट झालं.
अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीच्या निमित्तानं खडसे सध्या मुंबईत आहेत. डॉक्टरांनी
त्यांना १४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांनंतर ते या चौकशीला सामोरं
जाणार असल्याचं त्यांच्या कार्यालयानं कळवलं आहे.
****
केंद्रीय
रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना `फास्टॅग` लावण्यासाठी येत्या १५
फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी एक
जानेवारीपासून `फास्टॅग` बंधनकारक असेल अशी घोषणा करण्यात आली होती. देशातल्या टोल
नाक्यांवर एक जानेवारीपासून रोख व्यवहार होणार नाहीत, फक्त `फास्टॅग` ग्राह्य धरले
जाईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जाहीर केलं होत. पण, आता `फास्टॅग`साठी
मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
राज्यातल्या प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांचं नियोजन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या
अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करायला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या समितीनं याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळासोबत चर्चा करून या प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
****
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक चांगला पर्याय म्हणून
इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे असं मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं
आहे. इस्लामपूर इथल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या
उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. साखर निर्मिती केल्यास माल गोदामात पडून राहतो आणि
त्यासाठी पोत्याला २५० ते ३०० रुपये व्याज भरावं लागतं, साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉल
तयार करणं हे फायद्याचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक ऊस गळीत हंगामात
१०३ दिवस हा इथेनॉल प्रकल्प चालवून दररोज एक हजार टन ऊसाचं गाळप करून ७८ हजार लिटर
इथेनॉल तयार केलं जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात चायनीज नायलॉन मांजा विक्रीस बंदी
घालण्यात आली आहे. औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीत चायनीज नायलॉन मांजा विकता येणार
नाही. पतंग विक्रेता हा मांजा विक्री करताना आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे
आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिले आहेत. चायनीज नायलॉन मांज्यामुळे
होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
मुंबई-गोवा
महामार्गावर रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात कशेडी घाटात आज पहाटे खासगी आरामबस
दरीत कोसळून झालेल्या अपघातात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत.
आज पहाटे चार वाजता भोगाव इथं हा अपघात झाला. बस दरीत ५० फूट कोसळल्यानं झालेल्या या
अपघातातल्या जखमींना पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालकाचा
गाडीवरील ताबा सुटल्यानं बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी
दिली आहे. मुंबईत शीव इथून काल रात्री ही बस कणकवलीकडे जाण्यासाठी निघाली होती. बहुतेक
प्रवासी रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरचे आहेत.
****
यंदाचं
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत व्हावं, यासाठी पुण्यातल्या सरहद संस्थेनं
पुढाकार घेत, तसं निमंत्रण साहित्य महामंडळाला दिलं असताना हे संमेलन नाशिक इथं व्हावं,
यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची लस येण्याच्या पार्श्वभूमीवर
३१ मार्चपूर्वी हे संमेलन आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
****////****
No comments:
Post a Comment