Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
· कृषी क्षेत्रात सुधारणांमुळे
शेतकऱ्यांसमोर अधिक चांगले पर्याय उपलब्ध- पंतप्रधानांचं प्रतिपादन.
· ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वर्ग.
· रेल्वे गाड्यांमधून पालेभाज्या
तसंच फळ वाहतुकीला सरसकट पन्नास टक्के सवलत.
· आत्मनिर्भर भारताचं धेय साकारण्यासाठी
टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता – राज्यपाल.
· भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
यांचा जन्मदिवस ‘सुशासन दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा.
· राज्याचा कोविडमुक्तीचा दर
९४ टक्क्यांवर; मराठवाड्यात नव्या २३१ रुग्णांची नोंद.
· उस्मानाबाद इथल्या लोकसेवा
समितीचे मराठवाडा विभागीय लोकसेवा पुरस्कार प्रदान.
आणि
· भारत - ऑस्ट्रेलियादरम्यान
दुसऱ्या क्रिकेट कसोटीला मेलबर्न इथं सुरुवात.
****
कृषी
क्षेत्रात सुधारणा केल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाल्याचं प्रतिपादन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी
संवाद साधत होते. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी केंद्र सरकार
प्रयत्नरत आहे, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करत केंद्र सरकारनं शेतमालाला किमान
हमीभावापेक्षा दीडपट भाव मिळवून दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या सुमारे एक हजार
बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीनं जोडल्या गेल्या असून, दहा हजारापेक्षा अधिक शेतकरी उत्पादक
गट स्थापन करणं आणि आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी काम सुरू असल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या
बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे १८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी
वर्ग करण्यात आला.
पंतप्रधानांनी
यावेळी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबत
त्यांचे अनुभव जाणून घेतले. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले
यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधत, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या माध्यमातून ५४
हजार रुपये मिळाल्याचं सांगितलं. आपल्या या अनुभवाबद्दल भोसले यांनी या शब्दांत भावना
व्यक्त केल्या –
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स कंपनीकडून ५४३१५ रूपये माझ्या खात्यामधे
जमा झाले. आणि मला असं बोलायचं होतं की आपण शासनाच्या स्कीममधे जर शेतकऱ्यांनी राहिलं
तर आपला निश्चित फायदा होणार आहे. कारण सगळ्याच स्कीम शेतकऱ्यांसाठीच काढलेल्या आहेत.
माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता की १० मिनिट आपल्या पंतप्रधांसोबत मला चर्चा करण्याची
संधी मिळाली. आणि मी महाराष्ट्रातून एकमेव शेतकरी होतो की मला हा चान्स मिळाला. माझ्यापेक्षा
जास्त आनंद गावातील लोकांनाचा आणि इतरांना झाला.
****
केंद्र
सरकारचे नवे कृषी कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे असून, राजकीय
स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री
तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काल पुण्यात मांजरी
इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कंत्राटी शेतीबाबतचा कायदा २००६ पासून
महाराष्ट्रात लागू आहे. त्यावेळी हा कायदा करणारे आज मात्र त्याच कायद्यांना विरोध
करत आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
****
किसान
रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच
फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर
यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, ॲपल बोरसह सर्वच प्रकारच्या
फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे. या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील दहा हजार
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, बोर तसंच काही
भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेषतः
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. सर्वच प्रकारची फळं आणि भाजीपाला
वाहतुकीवर पन्नास टक्के अनुदान मिळावं यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्र्यांकडे
पाठपुरावा केला होता.
****
नागपूर
इथल्या विधान भवनातलं विधानमंडळ सचिवालय आता वर्षभर सुरू राहणार आहे. पूर्वी हे सचिवालय
फक्त नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळातच सुरू राहत असे. वर्षभर सुरू राहणाऱ्या
या कक्षाचं येत्या ४ जानेवारीला उद्धाटन होणार आहे.
****
आत्मनिर्भर
भारताचं धेय साकारण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या कर्मयोगाची आवश्यकता असल्याचं, राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत लोकमान्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त
‘राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासा’च्या वतीनं गीता जयंती कार्यक्रम घेण्यात
आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
गीता
हा जगाकडे तसंच जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत दृष्टी देणारा ग्रंथ असल्याचं राज्यपाल
म्हणाले. दिनकर स्मृती न्यास संस्थेचं कार्य निरंतरपणे चालू राहावं, अशा शुभेच्छा देत
राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेला पाच लाख रुपये देणगी जाहीर केली.
राज्यपालांनी
काल बोरीवली इथं अटल स्मृती उद्यानात वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. अटल
स्मृती उद्यान परिसरालाही राज्यपालांनी भेट दिली.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
माजी
पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त काल सुशासन दिनी भारतीय
जनता पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवण्यात आले. पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या
वतीनं मोफत जन धन खाते उघडण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नूतन मराठी विद्यालयाच्या मैदानावर
रक्तदान शिबीर घेण्यात आलं. यात सुमारे ५५० दात्यांनी रक्तदान केलं.
****
शेतकऱ्यांना
आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी कायद्यांसह अनेक चांगल्या
योजना सुरू केल्या असल्याचं, भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या पोयनाड इथं
शेतकरी संवाद अभियानात त्या बोलत होत्या. काँग्रेसची सत्ता असताना शेतीसंदर्भात कायदे
झाले. काही लोकांनी असे कायदे करण्याच्या लेखी सूचना केल्या, आता मात्र नवीन कायद्यांना
विरोध होत असल्याची टीका मुंडे यांनी केली.
****
लातूर
जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांतून वाजपेयींना अभिवादन करण्यात आलं. खासदार सुधाकर श्रृंगारे
यांनी मार्केट यार्ड परिसरात अटलजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. यानिमित्तानं
झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना श्रृंगारे यांनी, काँग्रेसचं शेतकरी प्रेम
बेगडी असल्याची टीका केली. नवीन कृषी कायदे हे शेती आणि शेतकऱ्यांसाठी भविष्यात लाभदायी
ठरणार असल्याचं श्रृंगारे म्हणाले.
भाजपा
जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनीही, अटलजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून
अभिवादन केलं. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी,
औसा शहरात स्वच्छता मोहीम राबवून अटलजींना आदरांजली वाहिली. वाजपेयी यांच्या प्रतिमेचं
पूजन करून या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.
औरंगाबाद
इथं भाजप कार्यालयात शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या हस्ते, वाजपेयी यांच्या प्रतिमेला
पुष्पांजली अर्पण करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी वाजपेयी यांच्या
आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
****
परभणी
शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं. परभणी इथं मराठवाडा हायस्कूलमध्ये अभिवादन सभा घेण्यात आली.
****
नांदेड
जिल्हाधिकारी कार्यालयात “माहितीचा अधिकार अधिनियम आणि सेवा हमी कायदा” या विषयावर
काल सुशासन दिनानिमित्त ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागाचे
लेखाधिकारी निळकंठ पांचगे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे उपअभियंता भीमराव हाटकर
यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन केलं
****
राज्यात
काल तीन हजार ४३१ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१९ लाख तेरा हजार ३८२ झाली आहे. काल ७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४९ हजार १२९ झाली असून, मृत्यू
दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल एक हजार ४२७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख सहा हजार २९८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ४ दशांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात
५६ हजार ८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३१ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद
जिल्ह्यात तीन, नांदेड जिल्ह्यात दोन तर जालना जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू
झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल ८९ नवे रुग्ण आढळले, यामध्ये इंग्लंडहून आलेल्या एका महिलेचा समावेश
आहे. लातूर जिल्ह्यात ३३, जालना ३१, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी २८, उस्मानाबाद
११, परभणी नऊ, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले दोन नवीन रुग्ण आढळले.
****
लातूर
जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या धनेगाव इथले रहिवासी स्वातंत्र्य सैनिक व्यंकोबा
पिराजी बिरादार यांचं काल निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर
आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
नाताळ
तसंच सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या मंदिरात
दररोज चार हजार अतिरिक्त दर्शन पास जारी केले जाणार आहेत. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी
ही माहिती दिली. पूर्वी दररोज सकाळी पाच ते दुपारी चार या वेळेत आठ हजार दर्शन पास
देण्याची सोय केली होती, कालपासून दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत आणखी चार हजार
दर्शन पास दिले जात आहेत. तुळजापूर मंदिर समितीच्या, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री
तुळजाभवानी डॉट ओआरजी, या संकेतस्थळावरून दर्शन पास उपलब्ध करून दिले जात आहेत.
****
उस्मानाबाद
इथल्या लोकसेवा समितीच्यावतीने सातत्यपूर्ण समाजसेवा करणाऱ्या सेवाव्रतींना मराठवाडा
विभागीय लोकसेवा पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर –
१०८ या शासकीय रुग्णवाहिकेतून जीवाची पर्वा न करता निर्धारानं संयमपूर्व, सातत्यपूर्ण
मानवसेवा करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वाहनचालक श्री निवृत्ती सौदागर साठे, उस्मानाबाद
नगर पालिकेत लिपिकाची नोकरी करत असतानाही केवळ कर्तव्य भावनेने, अंत्यसंस्काराचे कार्य
करून मानवता आणि कर्तव्यनिष्ठता पार पाडणारे श्री विलास सावळाराम गोरे आणि औरंगाबाद
महानगरात सातत्यपूर्ण समाजसेवा करणाऱ्या मालती मनोहर करंदीकर यांना ‘लोकसेवा’ हे पुरस्कार
नगराध्यक्ष श्री मकरंद राजे निंबाळकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. श्रीमती करंदीकर
यांनी पुरस्काराची पूर्ण रक्कम रा.स्व.संघ विद्याभारतीचे पश्चिम क्षेत्रमंत्री श्री
शेषाद्री डांगे यांच्याकडे सुपूर्द केली.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
औरंगाबादचे
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल शहरात सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांची
प्रत्यक्ष पाहणी करून, कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रस्त्यांच्या
बाजूचे पदपथ व्यवस्थित करणे, वाहनतळांची व्यवस्था करणे, रिक्षा चालकांना रिक्षा उभे
करण्यासाठी जागा नेमणे, रस्त्यातील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे, तसंच झाडांना आवश्यक
कुंपण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले.
****
लातूर
शहरातल्या विविध विकास प्रकल्पांची काल पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी केली. महापौर
विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देविदास टेकाळे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी अधिकारी
यावेळी उपस्थित होते. विकास कामांमध्ये आवश्यक सुधारणांबाबत देशमुख यांनी सूचना केल्या.
****
राज्यमंत्री
संजय बनसोडे यांनी काल जहिराबाद - औराद शहाजनी -लातूर या रस्त्याच्या कामाची अचानक
पाहणी केली. यावेळी संबंधितांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार काम करण्याच्या सूचना राज्यमंत्री
बनसोडे यांनी दिल्या.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूर
इथले प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठल लहाने यांनी केलं आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासू्न मेलबर्न इथं सुरु झाला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या
तीन बाद ६५ धावा झाल्या होत्या. जसप्रित बुमराहनं एक तर रविचंद्रन अश्विननं दोन गडी
बाद केले. चार सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत एक
- शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment