Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** जगात सर्वोत्तम असलेली
प्रत्येक वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं - मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन
** पोलिस भरतीच्या पहिल्या
टप्प्यात पाच हजारावर पोलिसांची भरती - गृहमंत्री अनिल देशमुख
** जालना जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू, नव्या चोवीस रुग्णांची नोंद
आणि
** ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पाच बाद २७७ धावा; कर्णधार अजिंक्य राहाणेचं नाबाद
शतक
****
जगात सर्वोत्तम असलेली प्रत्येक
वस्तू देशात उत्पादित करण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधत होते.
आपल्या दैनंदिन आयुष्यात
कळत-नकळत वापरल्या जाणाऱ्या परदेशी वस्तूंना स्वदेशी पर्याय शोधावेत, आणि आपल्या देशातल्या
कष्टकरी लोकांनी बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी
केलं. नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक सशक्त
व्हावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची
खात्री करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कोल्हापूरच्या अंजली तसंच
मुंबईचे अभिषेक यांनी पाठवलेल्या पत्रांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. देशात बिबट्यांची
संख्या वाढली असून, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे असल्याचा
गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकपासून देशाला मुक्त
करायचंच असून हा देखील नव्या वर्षाच्या संकल्पांपैकी एक संकल्प ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
या वेळी केलं. पंतप्रधानांच्या या संबोधनाच्या मराठी अनुवादाचं रात्री आठ वाजता पुन:प्रसारण
होणार आहे.
****
राज्यात साडेबारा हजार पोलिस
भरती मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच हजार २९५ पोलिस भरतीचे आदेश संबंधित विभागाना
लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ही भरती
प्रक्रीया लवकरच सुरू होईल, असंही त्यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं.
नागपूरमध्ये चालू वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात
घट झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं प्रकाशित
केलेल्या आकडेवारीनुसार देशातल्या गुन्हेगारीमध्ये पाटना शहरानंतर दुसरे शहर म्हणून
नागपूरचा उल्लेख होता, परंतु ही आकडेवाडी ही २०२०मधील नसून २०१९मधली असल्याचं गृहमंत्री
देशमुख म्हणाले.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमच्या खासदार भावना
गवळी यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना
विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या आता ३४५ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात २४ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ७८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना
विषाणूमुक्त झालेल्या ८ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा
हजार ४३१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३०२ रुग्णांवर सध्या
उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज तीन नवे कोविडग्रस्त
दाखल झाले, तर चार जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातल्या एकूण कोविड रुग्णांची संख्या
आता ४५ हजार ३०१ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ५५६ रुग्णांनी या विषाणू
संसर्गावर मात केली आहे. जिल्ह्यात या संसर्गानं आतापर्यंत एक हजार १९७ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे.
****
राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली
मूठभर खाजगी विकासकांचा फायदा
केला जात असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला
आहे. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखालच्या
समितीने काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या. त्यातल्या काही निवडक आणि
सोयीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली जात असून, त्याचा राज्याच्या तिजोरीला फटका बसेल तसंच काही निवडक लोकांनाच लाभ होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे
हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी फडणवीस
यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीची
विषय पत्रिका गोपनीय असते, पण याबाबतचे
संबंधित संपूर्ण कागदपत्रं आणि शासन निर्णयाचा मसुदा सर्व
विकासकांकडे उपलब्ध आहेच शिवाय समाजिक माध्यमांवरही दिसत असल्याकडे फडणवीस यांनी
लक्ष वेधलं आहे.
****
गुजरात पोलीस दहशतवाद विरोधी पथक - एटीएसने मुंबई बॉम्बस्फोटातला
आरोपी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतला गुंड माजीद कुट्टी याला अटक केली आहे. माजीद कुट्टी
हा गेल्या २४ वर्षांपासून फरार होता. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात २३ फेब्रुवारी १९९६
एका छापेमारीत चार किलो आरडीएक्स, दहा डिटोनेटर, ११५ पिस्तुलं आणि शेकडो गोळ्या असा
मोठा साठा जप्त करण्यात आला होता. पाकिस्तानी बनावटीची ही शस्त्रं राजस्थानच्या बाडमेर
सीमेवरून गुजरातमध्ये पोहोचली होती, ती मुंबई आणि अहमदाबादेत पाठवली जाणार होती. या
कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता. तो भारतात येत असल्याची माहिती
मिळाल्यानंतर गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला केली.
****
घरगुती
वापराच्या गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आज राज्यभरात
आंदोलन करण्यात आलं. पुण्यात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात चूल पेटवून
दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत, तर आमचं पुढचं लक्ष्य
हे पेट्रोल पंपावर लावलेले पंतप्रधानांचे फलक असतील, असा इशारा चाकणकर यांनी दिला.
कोविड टाळेबंदीच्या काळात लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना, सर्वसामान्य
नागरिकांना स्वस्त दरात गॅस आणि इंधन उपलब्ध करुन देण्याऐवजी दरवाढ केल्याचा आरोप या
आंदोलकांनी केला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या
काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दोन दिवंगत योध्दयांच्या कुटुंबियांना आज नागपूर इथं राज्य शासनाकडून प्रत्येकी ५०
लाख रुपयांचं विमा कवच सानुग्रह सहायता निधी देण्यात आला. राज्याचे
ऊर्जा मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते.
****
भारतानं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज मेलबोर्न इथं दुसऱ्या दिवशी
पाच बाद २७७ धावा काढून पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे आजच्या
दिवसाचा खेळ थांबला तेंव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे १०४ आणि रविंद्र जडेजा ४० धावांवर
खेळत होते. भारतानं आज सकाळी एक बाद ३६ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली.
शुभमन गील ४५, चेतेश्वर पुजारा १७, ऋषभ पंत २९, हनुमा विहारी २१ धावा काढून बाद झाले.
मिशेल स्टार्क आणि पॅट कमीन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार सामन्यांच्या
या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
करंज या झाडांच्या बियांपासून बायोडिझेल निर्मितीवर
अधिक संशोधन व्हावं, अशी अपेक्षा केंद्रीय
परिवहन तसंच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ग्रीक क्रूड अॅण्ड बायो
फ्यूएल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीनं आज नागपुरात करंज झाडाच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावं, अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी
केली. करंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन
आपल्या पारंपरिक डिझेलपेक्षा चांगलं असून प्रदूषण न करणारं असल्याचंही गडकरी म्हणाले.
****
२०१५
ची ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या मात्र निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना
यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक विभागानं याबाबतचे आदेश जारी
केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या ३ हजार ८४० जणांना यंदाची निवडणूक लढवता येणार नसल्याची
सूचना निवडणूक आयोगानं जिल्हा प्रशासनाला केली
आहे. या व्यक्तींच्या नावाची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे
अशा व्यक्तींनी उमेदवारी दाखल केल्यास त्यांचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद होण्याची
शक्यता आहे
****
No comments:
Post a Comment