Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
आपला
देश २०२१मध्ये यशाची नवी शिखरं पदाक्रांत करेल, असा विश्र्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आज आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना व्यक्त केला.
या कार्यक्रम मालिकेचा हा बहात्तरावा भाग होता. नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची
ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक सशक्त व्हावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
नव्या वर्षात आपण आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचं अभिनंदन करुया, या कोल्हापूरमधील
अंजली यांनी पाठवलेल्या शुभेच्छांचा त्यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी उल्लेख केला.
आपल्याला आलेल्या पत्रांमध्ये लोकांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये देशाचं
सामर्थ्य, देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचं कौतुक केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी
दिली. मुंबईच्या अभिषेक यांनी कोरोना विषाणू संदर्भात पाठवलेल्या संदेशाचा उल्लेखही
त्यांनी यावेळी केला. या संकट काळात देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली असून या
क्षमतेचं नाव ‘आत्मनिर्भरता’ असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीत पूर्वी विदेशी
महागड्या खेळण्यांना मोठी मागणी होती आता देशात बनवलेल्या खेळण्यांची मागणी होत असल्याची
माहिती एका पत्रात असल्याचं त्यांनी सांगितलं. विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा
बदल आहे आणि त्याचा हा एक उत्तम पुरावा असल्याचं ते म्हणाले. देशातील लोकांनी ठोस पावले
उचलली आहेत. स्थानिक गोष्टींचा ते आग्रह धरत आहेत. हा मंत्र घराघरात निनादत असल्याचं
ते म्हणाले. अशावेळी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची
वेळ आली असून जे काही जगात सर्वोत्तम आहे ते आपण देशात उत्पादित करून दाखवू. यासाठी
आपल्या उद्योजकांना पुढं यावं लागेल, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. आपल्या
दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की,
कळत-नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे.
त्या गोष्टींसाठी देशात बनवलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण देशात उत्पादित,
देशातल्या कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टानं बनवलेल्या उत्पादनांचा वापर करू, असं
ते म्हणाले. देशात बिबट्यांची संख्या वाढली असल्याची आकडेवारी नमूद करताना त्यांनी
बिबट्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र
अव्वल स्थानी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्याला देशाला एकदा वापरायच्या प्लॅस्टिकपासून
मुक्त करायचंच असून हा देखील २०२१ च्या संकल्पांपैकी एक ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान
मोदी यांनी या वेळी केलं. या कार्यक्रमाचं रात्री आठ वाजता आकाशवाणीवरून मराठीमध्ये
पुनः प्रसारण होणार आहे.
****
देशात
आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याच्या
दरात सुधारणा होऊन तो ९५ पूर्णांक ८२ शतांश टक्के झाला आहे. या काळात १८ हजार सातशे
नवे रुग्ण आढळले आहेत तर, २७९ रुग्ण दगावल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे. देशात सध्या २ लाख, ७८ हजार, सहाशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल नऊ लाखांहून
आधिक जणांची कोरोना विषाणू संसर्गासाठी चाचणी करण्यात आली आहे.
****
महाविकास
आघाडी सरकार येत्या अर्थसंकल्पात धनगर समाजासाठी भरीव आर्थिक तरतूद करुन या समाजाला
न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं
आहे. सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं धनगर समाजातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते
काल बोलत होते. धनगर समाज महासंघाचे नवे प्रदेशाध्यक्ष विधिज्ञ चिमण डांगे यांचा यावेळी
सत्कार करण्यात आला.
****
महाराष्ट्र
राज्य पर्यटन विकास महामंडळानं जवळपास सर्व ठिकाणचे पर्यटक निवास आता उघडले आहेत. या
पर्यटक निवासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं आरोग्यरक्षक व्यवस्थांसह
तातडीच्या वैद्यकिय सुविधाही इथं उपलब्ध झाल्या आहेत. नव वर्षाचं स्वागत करण्याच्या
दृष्टीनं या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे.
****
भारतानं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज मेलबोर्न इथं दुसऱ्या दिवशी
पाच बाद २७७ धावा काढून पहिल्या डावात ८२ धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे दिवसभराचा
खेळ थांबला तेंव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे शतक झळकवून १०४ आणि रविंद्र जडेजा ४० धावांवर
खेळत होते. भारतानं आज एक बाद ३६ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. शुभमन
गील ४५, चेतेश्वर पुजारा १७, ऋषभ पंत २९, हनुमा विहारी २१ धावा काढून बाद झाले. मिशेल
स्टार्क आणि पॅट कमीन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. चार कसोटींच्या या मालिकेत
पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
नांदेड-हैदराबाद-परभणी
प्रवासी रेल्वे गाडी आता नांदेड-तांडूर-परभणी विशेष एक्सप्रेस रेल्वे म्हणून धावणार
आहे. रेल्वे मंडळानं या बदलाला मान्यता दिली. येत्या १० जानेवारी पासून ही गाडी नांदेड-
तांडूर-परभणी अशी धावणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment