Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार
कटीबद्ध - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची ग्वाही
**
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे अंतिम अहवाल पाठवताना संदर्भ तसंच
आराखड्यांसह मुद्देसूद आकडेवारी सादर करण्याची केंद्रीय पाहणी पथकाची सूचना
**
औरंगाबाद इथं एका कोविडग्रस्त महिलेचा मृत्यू;
जालना जिल्ह्यात नवे १९ कोविडग्रस्त
आणि
**
लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पात पहिला कोच
शेल तयार
****
पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार
कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. ते आकाशवाणीला
दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. २२ हरित द्रुतगती महामार्गांच्या बांधकामांमुळे
प्रवास आणि वाहतूक क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार असल्याचा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. देशात कुटीरोद्योग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योगांना चालना
देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी पावले उचलत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातली गावं 'स्मार्ट व्हिलेजेस'मध्ये परिवर्तित
करण्यासाठी युवकांनी गावाकडे चलण्याचं आवाहन नीतीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूर
इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात यशवंतराव केळकर युवा पुरस्कार
प्रदान केल्यानंतर बोलत होते. कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी बिहारचे युवा
कार्यकर्ते मनीष कुमार यांना गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
युवकांनी गावांमध्ये जाऊन व्यवसाय करा, त्यासाठी सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग - एमएसएमई
मंत्रालयाच्यावतीने सर्वती मदत करण्यात येईल, असं आश्वासन गडकरी यांनी दिलं.
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे अंतिम अहवाल
पाठवताना संदर्भ तसंच आराखड्यांसह मुद्देसूद आकडेवारी सादर करण्याची सूचना केंद्रीय
पाहणी पथकानं केली आहे. या पथकानं आज नागपूर इथं विभागीय आयुक्त संजीवकुमार
यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. केंद्राकडे पायाभूत सुविधा,
कृषी, तसंच पशुधनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती
व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे मागणी करणं आवश्यक असल्याचं या पथकानं
सांगितलं.
****
अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम
मंदिरासाठी येत्या १५ जानेवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत देशभरात निधी संकलन अभियान
राबवलं जाणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी
महाराज यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभियानाच्या माध्यमातून
देशभरात चार लाख गावातल्या ११ कोटी कुटुंबांपर्यंत तर महाराष्ट्रातल्या एक कोटी चाळीस
लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार असल्याचं गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितलं. राज्यात
हे अभियान १४ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहा, शंभर आणि एक हजार
रुपयांच्या कुपनद्वारे राममंदीर उभारणीसाठी निधी संकलित केला जाणार आहे
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम मालिकेचा बहात्तरावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्या, आकाशवाणीचं संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवरून,
तसंच आकाशवाणी, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या यू
ट्यूब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.
आकाशवाणीवर या कार्यक्रमाच्या हिंदी भाषेतल्या प्रसारणानंतर, लगेचच प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल. प्रादेशिक
भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण होणार आहे.
****
देशातल्या विनाचालक रेल्वेगाडीचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा सोमवारी उद्घाटन होणार आहे. सध्या दिल्ली मेट्रोच्या
मार्गावर ही गाडी धावणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्यानं, मानवी चुकीची शक्यता
राहणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्कॉटलंडहून नाशिक इथं आलेल्या एका २५ वर्षीय युवकाला कोरोना
विषाणू संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. हा तरूण आणि त्याच्या कोविडग्रस्त आईवर खासगी रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. या युवकाला कोरोनाचा नवा अवतार असलेला स्ट्रेन संसर्ग आहे का, हे
तपासण्यासाठी त्याच्या स्रावाचे नमुने पुणे इथल्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद शहरात आज एका ७५ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. तर कोविड बाधित नवे नऊ रुग्ण आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले.
जिल्ह्यातल्या एकूण कोविड रुग्णांची संख्या आता ४५ हजार २९८ झाली आहे. तर एकूण मृतांची
संख्या एक हजार १९७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ५५२ रुग्णांनी या विषाणू
संसर्गावर मात केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वेस्थानकावर
आज २२७ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली, काल चाचणी केलेल्यापैकी चार प्रवासी बाधित
आढळून आले आहेत. औरंगाबाद विमानतळावर आज ४७ प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात आली, काल
चाचणी केलेल्यापैकी पाच विमान प्रवासी बाधित आढळून आले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दिवसभरात १९ नवीन कोविड बाधित रुग्ण
आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ५४ झाली आहे. उपचारानंतर कोरोना
विषाणूमुक्त झालेल्या १९ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले बारा
हजार ४२३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या २८८ रुग्णांवर सध्या
उपचार सुरू आहेत.
****
लातूर इथल्या रेल्वे बोगी प्रकल्पात
पहिला कोच शेल तयार झाला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. सुशासन
दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने मराठवाड्याला ही भेट दिल्याबद्दल निलंगेकर यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार व्यक्त केले आहेत.
हा राज्यातला पहिला तर देशातला चौथा रेल्वे बोगी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातल्या
५० हजाराहून अधिक तरुणांना रोजगार प्राप्त होणार असून औद्योगिक विकासालाही चालना मिळणार
आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश पात्रता परीक्षा पेट- २०२० दोन टप्प्यामध्ये
घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात येत्या २९ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात येत्या
१० जानेवारीला परीक्षा होणार आहे. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या नांदेड, लातूर तसंच
परभणी शहरातल्या परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन
मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी ही माहिती दिली
****
लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर
कारखान्याच्या वतीनं एकरी १५० मेट्रीक टन ऊस तोडणी पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते आज बाभळगाव इथं
करण्यात आला. केंद्र तसंच राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा प्रत्येक शेतकऱ्याने
लाभ घ्यावा, शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने ऊस लागवड हाती घावी, असं आवाहन देशमुख यांनी
यावेळी केलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी किक्रेट मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात आज दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या आहेत. शुभमन गील २८, तर चेतेश्वर पुजारा सात धावांवर
खेळत आहेत. आज सकाळी ऑस्ट्रेलियानं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा
निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांतच संपुष्टात आला. जसप्रित बुमराहनं ५६ धावांत ४, रविचंद्रन अश्विननं ३५ धावांत ३ तर
नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराजनं आपल्या
पदार्पणाच्या कसोटीत ४० धावांत २ गाडी बाद केले. रविंद्र जडेजाला एक
बळी मिळाला. मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर
आहे.
****////****
No comments:
Post a Comment