Thursday, 31 December 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि

****

** कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकारमध्ये ५० टक्के मागण्यांवर सहमती

** राज्यात कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत जारी मार्गदर्शक सूचना ३१ जानेवारीपर्यंत कायम

** औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही आज आणि उद्या रात्रीची संचारबंदी लागू 

** प्राप्तिकर तसंच जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

** प्राचीन मंदिरं, लेण्या आणि शिल्पांच्या जतन संवर्धनाची जबबादारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे

** राज्यात तीन हजार ५३७ नवीन कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या २६८ रुग्णांची नोंद

आणि

** ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कालपर्यंत दाखल अर्जांची आज छाननी

****

कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेत ५० टक्के मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. ते काल या चर्चेच्या सहाव्या फेरीनंतर पत्रकारांशी बोलत होते. वीज वापरावर शेतकऱ्यांना राज्य सरकारांकडून मिळणारं अनुदान पूर्वीप्रमाणे कायम ठेवावं, तसंच पिकांचे खुंट जाळल्यास शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असलेल्या प्रदूषण नियंत्रण अध्यादेशातही दुरुस्ती करावी, या दोन मागण्या मान्य केल्या असून, किमान हमी भाव तसंच तीन कृषी कायद्यांवर, येत्या चार तारखेला होणाऱ्या पुढच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. किमान हमी भाव कायम राहणार असल्याचं लेखी आश्वासन देण्यास केंद्र सरकार तयार असून, शेतकरी मात्र या आश्वासनाला कायद्याच्या चौकटीत बसवण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं, तोमर यांनी सांगितलं.

****

देशात पंजाब आणि हरयाणा सोडता कुठेही शेतकऱ्यांचा उद्रेक दिसत नाही, त्यामुळे शेतकरी आंदोलनाला देशातल्या कोणत्या राज्यात, कितपत जनसमर्थन आहे, असा सवाल कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. खासदार शरद पवार यांचा कायद्याला विरोध नसून, विधेयक मांडण्याच्या पद्धतीला विरोध असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पवार कृषी मंत्री असताना त्यांनी या विधेयकासाठी समिती तयार केली होती, या कायद्याचा मसूदाही तयार झाला होता. मात्र ते राज्यसभेचे सदस्य असूनही या विधेयकावर चर्चा होत असताना गैरहजर का राहिले याचं उत्तर शोधावं, असंही पटेल म्हणाले.

****

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातले शेतकरी येत्या तीन जानेवारीला दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. नामदेव गावडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तुकड्या दोन जानेवारीला नाशिक इथं एकत्र जमून नागपूरमार्गे दिल्लीला रवाना होतील, अस त्यांनी सांगितल.

****

ब्रिटनसोबतच्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही विमानसेवा आजपर्यंत स्थगित करण्यात आली होती, ही स्थगिती आता आणखी आठवडाभर वाढवण्यात आली आहे. दरम्यान, देशात २० रुग्णांना या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. 

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

पोलिसांसाठी सेवेच्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं आणि सुविधांनी युक्त निवासस्थाने बांधण्याची गरज असून, त्यासाठी सर्वंकष असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थानं उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

****

कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबतचे नियम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलं आहे. यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केली. दरम्यान, कोरोना विषाणूचं संकट संपलेलं नसून, राज्यातल्या जनतेनं नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याचं आवाहन, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार रात्री ११ पर्यंतच खुले राहणार असून, त्यानंतर सर्व आस्थापना बंद होतील असं ते म्हणाले. जमावबंदी असली तरी रात्री घराबाहेर जावून औषधं आणणं, जेवण आणणं, यावर बंधन नसून, सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर मात्र बंधन असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यभरातल्या सर्व पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना दिल्याचंही ते म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही आज ३१ डिसेंबर आणि उद्या एक जानेवारी असे दोन दिवस, रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबतचं परिपत्रक जारी केलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गर्दी होऊन, कोविडचा प्रादूर्भाव होऊ शकतो, या अनुषंगानं हा निर्णय घेतला असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.  

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी नागरिकांना घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले...

 

यावर्षी नविन वर्षाच्या आगमनावर प्रत्येक वर्षाप्रमाणे आनंद आपण साजरा करणार आहोत.मात्र, कोरोनाच्या प्रार्दुभावाने राज्य शासनाने नियमावली तयार केलेली आहे. आपण जास्त प्रमाणात लोकांनी गोळा होवून या प्रकाराचा आनंद साजरा करु नये.साध्या पद्धतीने आपल्या कुटुंबासोबत घरातच राहून आपल्याला आनंद साजरा करायचा आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नूतन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने घरी राहूनच करावं, अस आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केल आहे. ागरिकांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, अस आवाहनही मुगळीकर यांनी केल आहे.

****

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. लेखा परीक्षण आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरणपत्र भरता येणार आहे. विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे. आता या व्यावसायिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. ‘विवाद से विश्वास तक’ योजनेनुसार नागरिकांनी स्वत:हून संपत्तीचा खुलासा करण्याची मुदतही ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

राज्यातले प्राचीन मंदिरं तसंच लेण्या आणि शिल्पांचं जतन संवर्धन करण्याची जबबादारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या वास्तुंना आंतरराष्ट्रीत दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी महत्त्वकांक्षी योजना सरकारनं आखली असून, त्यासाठी १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत घोषणा केली होती.

****

राज्यात काल तीन हजार ५३७ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख २८ हजार ६०३ झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार ४६३ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे. काल चार हजार ९१३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख २४ हजार ९३४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६२ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५३ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल सहा कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २६८ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन, तर जालना, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ६८ नवे रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ६५, जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ३५, लातूर २६, उस्मानाबाद २२, परभणी नऊ तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले आठ नवीन रुग्ण आढळले.

****

औरंगाबाद शहरातील २९ वर्षीय तरुणीला नोकरीच अमिष दाखवून अत्याचार करणं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीनं करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांना या मागणीचं निवेदन परिषदेच्या वतीनं सादर करण्यात आलं. या घटनेच्या निषेधार्थ काल भाजपच्या वतीनं पक्षाचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांच्या नेतृत्वात औरंगाबाद इथं क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपनं राजकीय फायद्यासाठी रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतः महेबूब शेख यांनी नार्को चाचणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली असल्याचं तपासे यांनी सांगितलं. महेबूब शेख यांनीही यावेळी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली.

****

परभणी जिल्ह्यातला पोलिस कर्मचारी विनायक भोपळे याला जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी काल निलंबित केल. भूखंड घेऊन देण्यासाठी धनादेशाद्वारे ९० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाच्या, तसच चार महिन्यांपासून कर्तव्यावर गैरहजर असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. 

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन राज्यसभेचे खासदार डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.

****

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती.

औरंगाबाद जिल्ह्यात ६११ ग्रामपंचायतींसाठी एकूण १७ हजार ४२६ अर्ज, उस्मानाबाद जिल्ह्यात ४२८ ग्रामपंचायतींसाठी नऊ हजार ८२५ अर्ज, तर बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतीसाठी ३ हजार ६६० अर्ज दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी महसूल मंडळ निहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था तहसील कार्यालयामध्ये केली होती. नांदेड तसंच परभणी जिल्ह्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. कालपर्यंत दाखल अर्जांची आज छाननी होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केलेल्या गावांच्या यादी नजरचुकीने शिरुर नगरपंचायतीचं नाव दर्शवण्यात आल होत. त्यात बदल करुन या हद्दीतली आचार संहिता रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात उर्वरित १२९ ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता आदेश कायम आहे.

****

राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी आज आणि उद्या ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही  अर्ज स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसंच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानं हा निर्णय घेतल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगर पालिकेचा कार्यालयीन अधीक्षक सुरेश सत्यनारायण मणियार याला नगर पालिका कार्यालयात दीड हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहात पकडण्यात आलं. प्लॉटची नोंद नगर पालिकेच्या मालमत्ता पुस्तिकेत  करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

सशस्त्रसेना ध्वजनिधीसाठी नांदेड जिल्ह्यातून १ कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार करण्यात आला असून देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीनं देणगी देता यावी यासाठी क्युआर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने अशा प्रकारे हा कोड तयार केला आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसर आणि सुधाकरनगर इथं वीजचोरी करणाऱ्या ५ ग्राहकांवर महावितरणने कारवाई केली आहे. या ग्राहकांनी ४ हजार ९८५ युनिटची वीजचोरी करून महावितरणचं ७० हजार रुपयांचं नुकसान केल्याचं उघडकीस आलं आहे.

****

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे नगरसेवक विरेंद्रसिंग बलवंतसिंग गाडीवाले यांची काल बिनविरोध निवड झाली. सभापती पदासाठी गाडीवाले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

****

२०२०-२१ च्या हंगामामधील तूर खरेदीसाठी केंद्र शासनाने सहा हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चित केला असून या खरेदीसाठी नाफेड तर्फे उस्मानाबाद जिल्हयात तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आल आहे. बीड जिल्ह्यातही गेवराई इथल्या खरेदी विक्री संघाच्या वतीनं शासकीय हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी उमापूर तसचं राक्षसभुवन इथल्या उपबाजारपेठेत ऑनलाईन नोंदणी केंद्र सुरु करण्यात आलं आहे.

//************//

No comments: