Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
नवीन
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही आणि कोणालाही विकण्याचं स्वातंत्र्य
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा पुढील हप्ता
वितरीत केला. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या नऊ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना
१८ हजार कोटींहून अधिक रक्कम यावेळी वितरीत करण्यात आली.
या
कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अधिकचे अधिकार मिळत असतील तर हे कायदे वाईट कसे असा प्रश्न
त्यांनी उपस्थित केला. या कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जात असून यामुळे
बाजार समित्या बंद होणार नाहीत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांनी कोणाच्या
बोलण्यात येऊ नये, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधानांनी
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून केंद्र सरकारच्या योजनांपासून झालेल्या लाभाबाबतचा
त्यांचा अनुभव जाणून घेतला. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातले शेतकरी गणेश भोसले
यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा आपण लाभ घेतला असून,
त्या माध्यमातून ५४ हजार रुपये मिळाल्याचं भोसले यांनी सांगितलं.
****
देशात
काल नव्या २३ हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३३६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी एक लाख २२ हजार ५६० इतकी झाली
आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४७ हजार ९२ रुग्णांचा मृत्यू झाला
असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण
बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते ९७ पूर्णांक ७७ शतांश टक्के झालं आहे. काल २४ हजार
५०० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत जवळपास ९७ लाख १७
हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ८१ हजार रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. काल जवळपास नऊ लाख ९७ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत
जवळपास १६ कोटी ६३ लाख चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
कोरोना
विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क
विभागाकडून ७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन
शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत करण्यात
आलेल्या या कारवाईमध्ये ३२ हजार २३८ गुन्हे नोंदवण्यात आले असून १९ हजार ४६२ आरोपींना
अटक करण्यात आलेली आहे.
****
नागरी
भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यावर देण्यात आलेली स्थगिती उठवणार असल्याची
माहिती अन्न, नागरी आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. नविन अधिकृत
स्वस्त धान्य दुकानं मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातील रद्द केलेली स्वस्त धान्य दुकान,
शहरी भागात नवीन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती या विषयांसंदर्भात काल मंत्रालयात
आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार
करुन शहरातील रास्त भाव धान्य दुकानांची स्थळ निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा
आणि या आराखड्यावर प्रचलित दुकानं, बंद दुकाने, प्रस्तावित दुकाने अशी सर्व प्रकारची
नोंद करावी, असे निर्देशही भुजबळ यांनी यावेळी दिले.
****
महात्मा
फुले मागासवर्गीय विकास महामंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध तसंच सफाई कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या त्यांच्या
कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवण्यात याव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री
डॉ. विश्वजित कदम यांनी दिले आहेत. मुंबईत महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या
आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यातला योग्य पात्र लाभार्थी निवडून त्यांना
व्यावसायिक प्रशिक्षण देऊन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना होईल यादृष्टीनं प्रयत्न
करावेत, अशी सूचनाही कदम यांनी यावेळी केली.
****
कर्नाटक
राज्यातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमावर्ती भागातलाय
पाच किलोमीटर अंतरावरील नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील हाणेगाव, मानूर, बिजलवाडी
आणि मुखेड तालुक्यातल्या हळणी या भागातील दारुची दुकानं २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत
बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
****
किसान
रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच
फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर
यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, ॲपल बोरसह सर्वच प्रकारच्या
फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना उद्या मेलबर्न इथं सुरु होत आहे.
भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. चार सामन्यांच्या मालिकेतला
पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
//************//
No comments:
Post a Comment