Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** इंग्लंडमध्ये कोविडची लस तयार; कोविड लसीकरणाला मंजुरी देणारा
इंग्लंड हा जगातला पहिला देश
** कोविडचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून
मानक कार्यप्रणाली जारी
** युवकांनी
व्यवसायासाठी ई वाहनांचा अधिकाधिक वापर करावा - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांचं
आवाहन
** औरंगाबाद इथं आज एका कोविडबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
** तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा यजमान ऑस्ट्रेलियावर
१३ धावांनी विजय
****
इंग्लंडमध्ये कोविडच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण करणारा इंग्लंड हा पहिला देश ठरला आहे. औषध उत्पादन करणारी अमेरिकी कंपनी फायजर
आणि जर्मन कंपनी बायेनटेक या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे विकसित केलेली ही लस कोविडपासून
९५ टक्क्यांपर्यंत संरक्षण करते, असं इंग्लंडच्या आरोग्य नियामक संस्थेनं सांगितलं
आहे. पुढच्या आठवड्यापासून या लसीचं उत्पादन सुरू होईल, सध्या या लसीचे पाच कोटी डोस
आणि पुढच्या वर्षात एक अब्ज तीस कोटी डोस उत्पादित होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला
आहे.
****
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मानक
कार्यप्रणाली जारी केली आहे. यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातले बाजार बंद राहणार आहेत.
६५ वर्षावरील व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील बालकांना अनावश्यक कामाखेरीज घरीच
थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या भागातली दुकानं उघडण्याची परवानगी असेल, तिथली
दुकानं उघडताच निर्जंतुक करण्यास तसंच ग्राहकांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यास सांगण्यात
आलं आहे. ग्राहकांसाठी दुकानाबाहेर सॅनिटायझर ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
रेल्वे विभागाच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आज दूरदृश्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून खासदारांसोबत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक
खासदाराला आपल्या समस्या तसंच सूचना मांडण्यासाठी रेल्वे विभागानं वैयक्तीक वेळ देण्याची
मागणी खासदार राजन विचारे यांनीवेळी केली. मुंबई महानगर परिसरातल्या रेल्वेच्या विविध
समस्या आणि प्रलंबित कामांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
युवकांनी व्यवसायासाठी
ई वाहनांचा अधिकाधिक वापर करावा, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर यासंदर्भातल्या बैठकीनंतर
बोलत होते. इलेक्ट्रीक रिक्षा, मालवाहू रिक्षा आदी वाहन खरेदीसाठी युवकांना कर्ज उपलब्ध
करून देण्यासंदर्भात विविध बँक अधिकारी तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आठवले यांनी बैठक
घेतली, तसंच बेरोजगार युवक आणि उद्योजकांसोबत दुसरी बैठक घेऊन त्यांना याबाबत मार्गदर्शन
केल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे
उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे.
****
येत्या ५ डिसेंबरला जागतिक मृदादिनानिमित्त प्रत्येक गावात कृषी कार्यशाळा
आयोजित करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. आज मुंबईत मंत्रालयात
झालेल्या ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबतच्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. गावातल्या शेतजमिनीत असलेले अन्न घटक आणि त्यासाठी आवश्यक खताचं प्रमाण,
याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत, असं भुसे
यांनी सांगितलं. गावातल्या प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठीही अशा प्रकारचे फलक लावण्याचं
आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं.
****
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या अंतर्गत उद्या ३ डिसेंबरला
प्रत्येक जिल्हाधिकारी तसंच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद
इथं उद्या दुपारी १ ते चार या वेळेत पैठण दरवाजा परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार
असल्याची माहिती संघटनेचे नेते सुभाष लोमटे, राम बाहेती यांनी दिली.
****
पंजाब मधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा
असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जास्तीत जास्त पीक घेणाऱ्या,
देशाच्या संरक्षण व्यवस्थेत विशेष सहभाग असणाऱ्या या राज्याला फारसं दुखवून चालणार
नाही, तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने चर्चा केली पाहिजे,
असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद इथं आज एका कोविडबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा रुग्ण कन्नड तालुक्यातल्या बरकतपूर इथला रहिवासी होता. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
कोविड बाधित रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४७३ झाली आहे. आजपर्यंत एकूण एक हजार १५०
रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला असून, ४१ हजार ३१९ रुग्ण या संसर्गातून मुक्त होऊन
रुग्णालयातून घरी परतले आहेत. शासकीय वैद्यकीय रूग्णालयातल्या १३ कोविड बाधितांना आज
सुटी देण्यात आली.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वे स्थानकावर दिल्लीहून आलेल्या १९६ प्रवाशांची
तर विमानतळावर २७ प्रवाशांची आज RTPCR चाचणी करण्यात आली
****
धनगर समाज महासंघाची आज धुळ्यात राज्यव्यापी बैठक घेण्यात आली. महासंघाचे
संस्थापक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत राज्यभरातून धनगर संघटनांचे
प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले, आरक्षणासह समाजाच्या अन्य महत्त्वपूर्ण प्रश्नांवर
या बैठकीत चर्चा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात कंत्राटी
पद्धतीनं काम केलेले कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून साखळी
उपोषण करत आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं वेतन मिळावं, कंत्राटी कामगारांना कामात
सामावून घेण्यात यावं, शासनानं जाहीर केल्याप्रमाणे कोविड काळात मरण पावलेल्या कोविड
योद्ध्यांना नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्यात यावं, या मागण्यांसाठी उपोषण करत असल्याचं,
आंदोलकांकडून सांगण्यात आलं.
****
क्रिकेट
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आजच्या
सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय
संघानं, हार्दिक पंड्याच्या ९२, रवींद्र जडेजाच्या ६६ तर कर्णधार विराट कोहलीच्या ६३
धावांच्या बळावर ३०२ धावा करत, यजमान संघासमोर ३०३ धावांचं लक्ष्य दिलं, मात्र ऑस्ट्रेलियाचा
संघ २८९ धावांतच सर्वबाद झाला. शार्दुल ठाकूरनं ३, जसप्रीत बुमराह २ तर कुलदीप यादव
आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक एक बळी घेतला. नवोदित गोलंदाज टी नटराजन यानं आपल्या
पदार्पणाच्या सामन्यात दोन बळी घेतले. दरम्यान, या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी
तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून, पहिला टी ट्वेंटी सामना परवा चार तारखेला होणार
आहे.
****
नागपूर हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा
इथं बस आणि ट्रकच्या अपघातात दोन जण ठार चार जण गंभीर जखमी झाले. रस्त्यावर उभ्या ट्रकवर
बस धडकून हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा
धरणात बुडून मृत्यू झाला आहे. काल धरण परिसरात सरपण आणण्यासाठी गेलेले हे तिघं परतले
नसल्यानं, आज सकाळी त्यांचा शोध सुरू करण्यात आला. असुर्डे धरणात या तिघांचे मृतदेह
पाण्यात तरंगताना आढळले. हा अपघात आहे की आत्महत्या, याबाबत चिपळूण पोलीस अधिक तपास
करत आहेत.
****
दक्षिण मध्य
रेल्वेनं हैदराबाद-जयपूर, सिकंदराबाद-शिर्डी, आणि काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासोबतच अमरावती-तिरुपती विशेष गाडीला महिनाभर मुदतवाढ देण्यात
आली असल्याचं, रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
****////****
No comments:
Post a Comment