Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February
2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** २०२०- २१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर
होणार
** देशभरातली चित्रपटगृहं आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरु
करण्यास परवानगी
** जगात सर्वाधिक वेगानं भारतात नागरिकांचं कोविड लसीकरण-
पंतप्रधान नरेंद्र मोदी
** प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन
** देशभरातल्या बालकांचं पल्स पोलिओ लसीकरण
** राज्यात काल दिवसभरात १ हजार ६७० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त तर मराठवाड्यात तीन बाधितांचा मृत्यू
आणि
** हिंगोली जिल्ह्यात ४० गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी अकरा वाजता, २०२०- २१
या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प कागदविरहित
रुपात सादर होणार आहे. अर्थसंकल्पाचं एक मोबाईल ॲपही तयार करण्यात आलं असून, संसदेसमोर
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, या ॲपवर नागरिकांना अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व तपशील
पाहता येणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात काय
तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
****
देशभरातली चित्रपटगृहं आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास
परवानगी देण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती
दिली. चित्रपटांच्या तिकिटांच्या `ऑनलाईन` नोंदणीस प्रोत्साहन द्यावं, असं त्यांनी
म्हटलं आहे. चित्रपटात दोन मध्यंतर असावेत, तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं
पालन करणं आवश्यक असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं.
****
भारताचा कोविड लसीकरण कार्यक्रम हा जगात एक उदाहरण ठरत असून,
जगात सर्वाधिक वेगानं आपण नागरिकांचं लसीकरणही करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या भागात ते काल
बोलत होते. कोविड प्रतिबंधक लस ही देशाच्या आत्मनिर्भरतेचं तसंच आत्मसन्मानाचंही प्रतीक
असल्याचं, ते महणाले. केवळ १५ दिवसांमध्ये, भारतानं ३० लाखांहून अधिक, `कोरोना योद्ध्यांचं`
लसीकरण केलं असून, अमेरिकेत हा टप्पा गाठायला १८ दिवस, तर ब्रिटनला ३६ दिवस लागले होते,
असं त्यांनी नमूद केलं.
`माय गोव्ह` या संकेतस्थळावर जालना जिल्ह्यातल्या परतूर इथले
डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी, रस्ते सुरक्षेबाबत मन की बात मध्ये बोलण्याचा आग्रह
केल्याची माहिती, पंतप्रधानांनी दिली, आपल्या सूचनेची दखल घेतल्याबद्दल डॉ मंत्री यांनी
पंतप्रधानांचे आभार मानले.
मेरे
प्यारे देशवासीयों,
माय
गोव्ह पर महाराष्ट्र के जालना के डॉ.स्वप्नील मंत्री और केरळ के पल्लकड के प्रल्हाद
राजगोपालन ने आग्रह किया है की में मन की बात में सडक सुरक्षा पर भी आपसे बात करु.
माननीय
पंतप्रधानांनी रस्त्याच्या सुरक्षेसंबंधी माझ्या सूचनांचे सर्व नागरिकांना आवाहन केले.
त्याबद्दल मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार एवंम धन्यवाद व्यक्त करतो.
आज माझ्या सारख्या सामान्य नागरिकाच्या सूचनांचा उल्लेख करुन माननीय पंतप्रधानांनी
मन की बात ला ‘जन जन की बात’ करुन दाखवले. याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
युवकांनी आपल्या भागातल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल, स्वातंत्र्याशी संबंधित वीरगाथांबद्दल
पुस्तक लिहावं, असं पंतप्रधानांनी सुचवलं. २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून,
देश, अत्यंत व्यथित झाल्याचं ते म्हणाले. कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, पद्म पुरस्कार
आदी विषयांवरही पंतप्रधानांनी, काल मन की बात मधून संवाद साधला.
****
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी
कार्यक्रम असून, पाच वर्षात एक लाख सुक्ष्म आणि लघुउद्योग प्रस्थापित करण्याचं उदिष्ट
असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बारामती इथं विद्या प्रतिष्ठान
संस्थेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत, 'माझा व्यवसाय, माझा हक्क',
या उपक्रमाची सुरुवात पवार यांच्या उपस्थितीत काल झाली, त्यावेळी ते बोलत होते. या
योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल, रोजगार निर्मितीला चालना मिळण्यासोबतच,
ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या योजनेच्या
अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा आणि समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून, उत्पादन,
सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसायांमध्ये युवकांना आणि युवतींना संधी मिळतील, असं उपमुख्यमंत्री
पवार यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं काल सांगली इथं वृद्धापकाळानं
निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव इथं एक मार्च १९४६ रोजी
जन्मलेले जमादार यांनी, १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी
त्यांनी अनेक कार्यक्रम केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांमधूनही इलाही
जमादार यांच्या अनेक रचना प्रसिद्ध झाल्या. नवोदित कवींसाठी `इलाही गझल क्लिनिक` नावाची
गझल कार्यशाळाही ते घेत असत. `वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे`, या पुस्तकातून, 'पाहिलेली
माणसे गेली कुठे’ `घर वाळूचे बांधायचे, स्वप्न नसे हे दिवान्याचे` या त्यांच्या गझला
चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या. जमादार यांच्या पार्थिव देहावर आज सांगली इथं अंत्यसंस्कार
होणार आहेत.
****
नवे कृषी कायदे म्हणजे केंद्र सरकारनं शेतमाल बाजार सुधारणा
आणि खुलीकरणाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल असल्याचं, शेतकरी संघटनेनं म्हटलं आहे.
संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, ललित बहाळे, गुणवंत हंगरगेकर, दिनेश शर्मा, यांनी
काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषद घेऊन कृषी कायद्यांबाबत आपलं मत मांडलं. खासगी खरेदीदारावर
आधारभूत किंमतीनं शेतमाल खरेदी करण्याचं कायदेशीर बंधन घालण्याची तरतूद, व्यवहारात
निरुपयोगी ठरत असल्याचा दावा, त्यांनी यावेळी केला. बाजार खुला केल्यानंतर निर्माण
होणाऱ्या स्पर्धेमुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल, असा विश्वासही संघटनेनं व्यक्त केला.
देशात कृषी कायद्यांवर आंदोलन करणाऱ्यांनी या मुद्यांच्या अनुषंगानं पुनर्विचार करावा,
असं आवाहनही शेतकरी संघटनेकडून यावेळी करण्यात आलं.
****
देशभरात काल पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली. जालना जिल्ह्यात
काल दिवसभरात एक हजार ७४७ बुथवर, दोन लाख १९ हजार ४४७ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात
आला. सकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात, एका
बालकास डोस पाजून या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पुढील चार दिवस ही लसीकरण
मोहीम सुरू राहणार असून, जिल्ह्यातला शून्य ते पाच वर्षे वयोगटातला एकही बालक पोलिओ
डोसपासून वंचित राहणार नाही याची आरोग्य विभागानं काळजी घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्री
टोपे यांनी यावेळी दिले.
औरंगाबाद महापालिकेतर्फे सिडको एन - आठ रुग्णालय इथं, या मोहिमेचा
प्रारंभ करण्यात आला. आरोग्य उप संचालक डॉ. जी. एम. गायकवाड यावेळी उपस्थित होते. शहरात
पोलिओ लसीकरणाचं ८१ टक्के उद्दीष्ट पूर्ण झालं आहे. उर्वरित बालकांना पुढच्या चार दिवसांत
घरोघरी जाऊन लस देण्यात येणार असल्याचं, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात
आलं.
परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं उपमहापौर भगवान वाघमारे, आणि
उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते, पोलिओची लस देत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
नांदेड तालुक्यात धनेगाव परिसरातल्या विटभट्टी कामगारांच्या बालकाला, जिल्हाधिकारी
डॉ. विपिन ईटनकर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर यांच्या हस्ते
लस देऊन ही मोहीम सुरू करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या जवळगा पोमादेवी इथं जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बालकांना लस पाजली.
हिंगोली जिल्ह्यात काल १ लाख २७ हजार ८३२ बालकांना पोलिओची लस
देण्यात आली. जिल्ह्यात ९५ टक्के लसीकरण झालं आहे. ऊसाच्या फडावरचे कामगार, गिट्टी
क्रशरवरील कामगार यांच्या बालकांचं त्या त्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात आलं.
****
राज्यात काल १ हजार ६७० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २९ हजार ५ रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, कोविड मुक्तीचा
दर ९५ पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यभरात २ हजार ५८५ नव्या बधितांची
नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या
बाधितांची एकूण संख्या २० लाख २६ हजार ३९९ झाली आहे. राज्यात काल ४०
रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. या आजारामुळे दगावलेल्या
रुग्णांची एकूण संख्या आता ५१ हजार ८२ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ४५ हजार ७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद, जालना आणि परभणी इथं प्रत्येकी एका
कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या ११५ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात
काल ३५ रुग्ण आढळले. लातूर ३७, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी ३३, जालना २९,
परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १२, तर हिंगोली जिल्ह्यात काल चार नवे रुग्ण
आढळले.
****
नाशिक इथं २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन स्थळाला, कुसुमाग्रज नगरी असं संबोधलं जाणार आहे. काल नाशिक इथं
गोखले एज्युकेशन सोसायटीत जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष, छगन
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, पूर्वतयारीबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय
घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमेलनासाठी ५० लाख रुपयांचं अनुदान दिल्याबद्दल,
भुजबळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळानं मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले आहे. संमेलनाच्या
बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशनही काल करण्यात आलं.
****
कष्टकरी, शेतकरी आणि सत्ताधारी यांच्यात संवाद उरलेला नसून,
याचं चित्रण निर्भीडपणे साहित्यातून आलं पाहिजे, अशी अपेक्षा, पंधराव्या राज्यस्तरीय
लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, भगवान अंजनीकर यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या सिंधी या गावी, या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात
ते बोलत होते. माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते, या संमेलनाचं
उद्घाटन झालं. या साहित्य संमेलनात वीरभद्र मिरेवाड यांच्या "माती शाबूत राहावी
म्हणून", या कविता संग्रहाचं तर माधव चुकेवाड यांच्या 'गोडधोड' या बालकाव्य संग्रहाचं
प्रकाशन, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
राष्ट्रीय महिला आयोगाचा स्थापना दिन काल नवी दिल्लीत साजरा
झाला. या कार्यक्रमात औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा, कोरोना विषाणू
संसर्ग काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोविड-19 संसर्गाच्या प्रभावापासून औरंगाबाद जिल्ह्याचा
ग्रामीण, भाग अत्यंत मेहनतीने आणि सचोटीने सुरक्षित ठेवला, आणि या कालावधीत समाजाचे
सर्व घटक आणि ग्रामीण जिल्हा पोलीस दल सुरक्षित ठेवण्यात एक आदर्श घालून दिल्याबद्दल,
मोक्षदा पाटील यांना गौरवण्यात आलं. परभणीच्या ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक नियती
ठाकर, अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह आणि सोलापूरच्या ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी
सातपुते, यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
****
कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांना ५० लाख रुपयांची
तरतूद करण्यात यावी, यासाठी मराठी पत्रकार परिषद प्रयत्न करत असल्याचं, मुंबई मराठी
पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातल्या
अंबाजोगाई इथं मूक नायक दिन आणि अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद शाखेच्या उद्घाटनप्रसंगी
ते काल बोलत होते. पत्रकारांशी संबंधित विविध समस्या दूर करण्यासाठी राज्यात प्रत्येक
तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा उघडणार असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांतल्या
४० गावांमध्ये, शनिवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता
तीन पूर्णांक दोन रिश्टर स्केल होती. या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली
नसल्याचं, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं म्हटलं आहे. या भागामध्ये तातडीनं पाहणी
करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
दिल्या आहेत.
****
परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी सेलू आणि मानवत
पोलीस ठाण्यातल्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. पोलीस दलाची प्रतिमा
मलिन होईल असं कृत्य त्या दोघांनी केल्याचा ठपका, पोलीस अधीक्षकांनी निलंबनाच्या आदेशात
नमूद केला आहे. मानवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी रसूल दाऊद शेख तर सेलू ठाण्यातील कर्मचारी
संजय साळवे अशी निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या देहेड इथं, काल सकाळी
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, देहेड इथला एक तरुण ठार झाला तर
दोघं गंभीर जखमी झाले. बालाजी बावस्कर असं मृत तरुणाचं नाव असून, तो भोकरदनहून पेट्रोलपंपावर
रात्रपाळीचं काम संपवून घरी जात असताना, हा अपघात झाला. सुधाकर दळवी आणि माणिक दळवी
अशी या अपघातातल्या गंभीर जखमींची नावं आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथले भाजप पदाधिकारी बालाजी कोराळे
यांचं काल गुलबर्गा-लातूर मार्गावर दुचाकी आणि टेंम्पो अपघातात निधन झालं. काल सकाळी
११ वाजेदरम्यान औसा वळण रस्त्यावर हा अपघात घडला.
****
औरंगाबाद जिल्हा परीषद अध्यक्ष पदाच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी
पूर्ण झाली आहे. माजी अध्यक्षा देवयाणी डोणगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात ही याचिका दाखल केलेली आहे. या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांना
समसमान मते मिळाली होती. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी चिठ्ठीच्या आधारे अध्यक्षाची
निवड केली होती. त्यामुळे या प्रक्रियेला डोणगावकर यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं अल्पवयीन
मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या निषेधार्थ, काल अणदूर इथं बंद पाळून
निषेध रॅली काढण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, तिसऱ्या आरोपीला
लवकरात लवकर अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
****
परभणी शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित `वाण आरोग्याचं`
या मोहिमेअंतर्गत, महिलांची काल मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरात रक्तदाब,
मधुमेह, रक्तगट यासारख्या तपासण्या करण्यात आल्या आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात
महिलांना वाण म्हणून `सॕनिटरी पॕडचं` वाटप करण्यात आलं.
//*************//
No comments:
Post a Comment