Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01
June 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या
कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड
लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकाने
सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ
उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
कोविड-१९ शी संबंधित अधिक मदतीसाठी
आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या
मदत केंद्राशी संपर्क करू शकता.
****
** कोविड उपचारासाठीच्या
टू डी जी औषधाच्या वापराबाबत डीआरडीओकडून मार्गदर्शक सूचना जारी
** खासगी रुग्णालयांमध्ये
कोविड उपचारांसाठी राज्य सरकारकडून दरपत्रक निश्चित
** औरंगाबाद इथं
आज ५ कोविडग्रस्तांचा मृत्यू; बीड जिल्ह्यात ३६१ तर जालन्यात नवे ७२ रुग्ण
आणि
** परिस्थिती सामान्य
होईपर्यंत वाहन कर्ज हप्त्याची सक्तीची वसुली किंवा जप्ती करू नये - परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
****
कोविड उपचारासाठी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओनं विकासित केलेलं औषध टू डी जी हे औषध डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसारच घ्यावं, असं डीआरडीओनं म्हटलं आहे. या औषधाच्या वापरासाठीच्या मार्गदर्शक
सूचना डीआरडीओनं जारी केल्या आहेत. अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग, यकृत तसंच मूत्रपिंडाचे
आजार असलेल्या रुग्णांवर या औषधाचा परिणामांचा अभ्यास अद्याप केलेला नाही, त्यामुळे
अशा रुग्णांना हे औषध काळजीपूर्वक द्यावं, गर्भवती आणि स्तन्यदा माता तसंच १८ वर्षांपेक्षा
कमी वयाच्या रुग्णांना हे औषध देऊ नये, असं डीआरडीओन स्पष्ट सांगितलं आहे.
****
देशात आजपासून एक राष्ट्र एक मानक योजना सुरू झाली आहे. विविध विकास संघटनांकडून वापरण्यात येणाऱ्या मानकांमध्ये
सुसूत्रता आणि समन्वय राखणं हा या योजनेचा उद्देश
आहे. या योजनेमुळे देशात तयार झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेत एकरूपता आणता येईल आणि ब्रांड इंडिया
संकल्पनेला चालना मिळेल असं या बाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
केंद्रीय मोटार
वाहन नियमात एक सुधारणा करण्यात आली आहे. रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना
जारी केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे किंवा त्यांच्या
नूतनीकरण आणि नव्या नोंदणीचे चिन्ह प्राप्त करण्यासाठीच्या शुल्कामध्ये सूट देणं प्रस्तावित
आहे. यासंदर्भात सर्वसामान्य जनता आणि संबंधित घटकांकडून मतं मागवली आहेत. अधिसूचनेचा
मसुदा जारी झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत संबंधितांनी आपल्या सूचना तसंच मतं पाठवायची
आहेत.
****
कोविड उपचारांसाठी
खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून
दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत.
या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी,
महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या
आहेत.
****
राज्य सरकारने यंदा
आषाढी वारी सोहळ्यास परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी
मंडळातर्फे देण्यात आला आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी आषाढी वारी झाली
नाही. देशभरात निवडणुका झाल्या, राजकीय बैठका, कार्यक्रम होत आहे. मग, आषाढी वारी सोहळ्यावर
बंदी का? असा प्रश्न मंडळानं विचारला आहे. निर्बंध असावेत, पण बंदी नको. अटी तसंच नियम
घालून आषाढी वारीला परवानगी द्यावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मंडळाचे
राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ई-मेलद्वारे
दिला आहे.
****
धुळे
महापालिकेच्या महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षासाठी जाहीर ओबीसी आरक्षण रद्द करून अनुसूचित जाती प्रवर्गाला संधी देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. याप्रकरणी
पुढील सुनावणी जुलै महिन्यात होईल. तो पर्यंत धुळ्याच्या
महापौर पदाची निवडणूकही पुढे ढकण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार, आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी
अध्यक्ष राधाकृष्ण नार्वेकर यांचं आज निधन झालं. नार्वेकर यांच्या निधनाबद्द्ल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
भारतीय रेल्वेनं या वर्षीच्या मे महिन्यात आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे ११
कोटी चाळीस लाख टन माल वाहतूक केली आहे. कोविड काळातही गेल्या वर्षीच्या मे
महिन्यापेक्षाही ही वाहतूक सुमारे १० टक्क्यानं जास्त असल्याचं रेल्वे
मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. कोळसा, खतं, लोहखनिज तेल, खाद्यान्न आणि सिमेंट
या स्वरूपातली ही मालवाहतूक होती.
****
बीड जिल्ह्यात आज
३६१ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक ७० रुग्ण बीड तालुक्यात आढळले.
त्याखालोखाल आष्टी तालुक्यात ६०, केज ४४, अंबाजोगाई ३०, माजलगाव तसंच पाटोदा तालुक्यात
प्रत्येकी २९, शिरूर २८, गेवराई २४, वडवणी १८ धारूर १७, तर परळी तालुक्यात आज १२ नवे
कोविडग्रस्त आढळले.
****
औरंगाबाद इथं शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटीत आज पाच कोविड रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. यामध्ये एक रुग्ण औरंगाबाद शहरातला असून, उर्वरित चार रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातल्या
विविध गावांतले आहेत. दरम्यान घाटी रुग्णालयात आज ३५ नवे रुग्ण दाखल झाले, तर २९ रुग्ण
कोरोना संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना सुटी देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात
आज दिवसभरात ७२ नवीन कोविड रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६० हजार
२०८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ३५१ रुग्णांना आज
सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५७ हजार ६६३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या
एक हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज एकाही रुग्णाचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला नाही.
****
कोविड संचारबंदीच्या
पार्श्वभूमीवर खाजगी फायनान्स कंपन्यांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत ऑटोसह इतर वाहनांच्या
कर्ज हप्त्याची सक्तीची वसुली किंवा जप्ती करू नये, याबाबत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी
लेखी आदेश जारी केले आहेत. प्रहार ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे
ही मागणी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी काल सर्व खाजगी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची
तातडीची बैठक घेतली, त्यानंतर आज हे आदेश जारी केले.
****
हिंगोली जिल्ह्यात
सर्व सरकारी रुग्णालयं तसंच २० खाटांपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांना
प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधितांना आवश्यकतेनुसार
व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक रुग्णालयांनी हिंगोली जिल्हा कौशल्य
विकास समन्वयक सुमीत पोटे यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन हिंगोलीच्या कौशल्य विकास,
रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
औरंगाबाद इथं विना
मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या
निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे
या साठीही दंड आकारण्यात आला. कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १४ जणांवर कारवाई
करण्यात आली. या सर्व कारवाईत एकूण एक लाख २८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला
****
परभणी शहरासह जिल्ह्यात
सर्वच दुकानांना दैनंदिन व्यवहारास मुभा देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाद्वारे दोन
दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ही माहिती दिली. आमदार
पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
यांची भेट घेऊन, दुकाने उघडण्याबाबत परवानगी देण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसात
स्थितीचा अभ्यास करत याबाबत विचार करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं. शिवसेनेचे
खासदार संजय जाधव यांनीही आज जिल्हधिकाऱ्यांची भेट घेऊन, अत्यावश्यक वस्तूंसह इतर दुकानांनासुध्दा
व्यवहाराला मुभा देण्याची मागणी केली.
****
छत्रपती शिवाजी
महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा येत्या ६ जून रोजी रायगडावर साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी
तुळजापूरहून कवड्याची माळ आणि कुंकू तसंच शिरकाई देवीसाठी मानाची साडी चोळी आणि इतर
साहित्य आज रायगडाकडे रवाना करण्यात आलं. अभिषेक सोहळा समिती सदस्य प्राध्यापक सतिश
खोपडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आलं.
****
परभणी महानगरपालिकेत
कार्यरत २१ रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत आजपासून नियमित करण्यात आलं
आहे. आयुक्त देविदास पवार यांनी याबाबतचा आदेश लागू केला. महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे,
यांच्याहस्ते या कर्मचाऱ्यांना ही नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
****
हिंगोली उप प्रादेशिक
परिवहन कार्यालयाच्या वतीनं नांदेड नाका चौकात रिक्षा चालकांना जीवनाश्यक कीटचे वितरण
करण्यात आलं. परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या
सूचना तसंच सामान्यत: विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराचं माहितीपत्रकही यावेळी
वितरीत करण्यात आलं.
****
मागासवर्गीयांचे
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा शासन निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन
पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे
असलेलं निवेदन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांच्याकडे आज सादर करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणी
जिल्ह्यात जिंतूर इथं भाजपच्या वतीनं कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. शासकीय
रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका
चालक अशा ७५ कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र देवून गौरवण्यात आलं.
//********//
No comments:
Post a Comment