Thursday, 24 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

परंपरा आणि तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ मिळेल, खेळणी आणि गेम्स परंपरा आणि तंत्रज्ञानाला एकत्र करतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘टॉयकेथॉन २०२१’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांशी पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशात खेळणी उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशानं, केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अन्य पाच मंत्रालयांच्या सहकार्यानं ‘टॉयकेथॉन २०२१’चं आयोजन केलं आहे. मुलांमध्ये सकारात्मक वर्तन आणि चांगली मूल्य रुजावी, यासाठी भारतीय मूल्यांवर आधारित खेळणी तयार करणं, हा स्पर्धेचा उद्देश आहे. देशात दर्जेदार, स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक खेळण्यांचं उत्पादन करण्याचं आवाहन, पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

राज्यातल्या अनाथांना वयाच्या २८व्या वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी शिधापत्रिका मिळणार असल्याचं सार्वजनिक अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. शिधापत्रिकेसाठी महिला आणि बालविकास विभागानं वितरीत केलेलं अनाथ प्रमाणपत्र किंवा आई आणि वडील यांचं मृत्यूप्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल, असं ते म्हणाले.

****

अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात येणार असून, निकाल १७ ऑगस्टपर्यंत जाहीर केला जाणार आहे. संयुक्त प्रवेश मंडळानं काल ही घोषणा केली. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचं समुपदेशन तीन टप्प्यांत पूर्ण केलं जाईल, तसंच १५ सप्टेंबरपर्यंत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे.

****

राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबवली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एक जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचं, कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. दरवर्षी ही मोहिम एक जुलैपासून राबवली जाते, मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन यंदा २१ जूनपासून राज्यात ही मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आलं.

****

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी -पोकरा योजनेमधल्या ग्रामपंचायतींनी फळबाग आणि बांबूची लागवड करण्याचं आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. त्यांनी काल पोकरा योजनेतल्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी ऑनलाईन कार्यशाळे द्वारे संवाद साधला. ई - ग्राम सभेद्वारे कृषी संजीवनी समिती स्थापन करणं, प्रकल्पातील गावांमध्ये फळबाग लागवड आणि बांबू लागवडीस चालना देऊन गावाचा सर्वांगीण विकास साधणं याबाबत टाकसाळे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

****

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख १३ हजार १२५ नागरिकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. यामध्ये ग्रामीण भागातल्या तीन लाख ३३ हजार ६०८, तर शहरी भागातल्या तीन लाख ७९ हजार ५१७ जणांचा समावेश आहे.  

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव रणजित अण्णासाहेब पाटील यांनी स्वतःच्या वेतनापोटी परस्परच केलेल्या आणि उचललेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात काल राज्यपालांकडे निवेदन सादर केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी पुजारी मंडळातर्फे शहरातल्या गरजवंत नागरिकांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदीर भाविकांसाठी बंद असल्यानं पुजारी वृद्धांची आर्थिक स्थिती खालावली आहे, तसंच मंदिरात उदरनिर्वाह भागवणाऱ्या नागरिकांची उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे पुजारी मंडळातर्फे किट वाटप करण्यात आले.

****

माजी ऑलिम्पिक विजेती भारोत्तोलक पद्मश्री करनाम मल्लेश्वरी हिची दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाची पहिली कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशची भारत्तोलक खेळाडू असलेल्या मल्लेश्वरीने २००० साली सिडनी ऑलिम्पिक्स मध्ये ११० किलो आणि १३० किलो वजन उचलून इतिहास घडवला होता.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...