Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर
कौटुंबिक निवृत्तीवेतन नियमांचं सुलभीकरण करण्यात आल्याचं, केंद्रीय राज्यमंत्री डॉ
जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. कोविड-19 महामारी दरम्यान
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागानं केलेल्या महत्त्वपूर्ण
सुधारणांबद्दल, त्यांनी माहिती दिली. इतर औपचारिकता किंवा
प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता, पात्र कुटुंब
सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि मृत्यू प्रमाणपत्र दावे प्राप्त झाल्यानंतर, तात्काळ तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्याची तरतूद, अलिकडेच करण्यात आली असून, ही तरतूद महामारी दरम्यान कोविडमुळे किंवा
बिगर कोविड कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी लागू असल्याचं,
जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. अधिदान आणि लेखा कार्यालयाच्या सहमतीने आणि
विभागप्रमुखांच्या मंजुरीनंतर, सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत
तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याची मुदत वाढवण्याची तरतूदही करण्यात
आल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
सरकारच्या
विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या
दोन वृत्तवाहिन्यांनी सत्तारुढ वायएसआर काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्ण राजू
यांचं वादग्रस्त भाषण प्रसारित केलं होतं, त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वाहिन्यांविरोधात
देशद्रोहाचा आरोप करत, गुन्हा दाखल केला होता, तसंच खासदार राजू यांना देशद्रोहाच्या
आरोपाखाली अटक केली होती. एका खासदाराचं भाषण प्रसारित करणं हे देशद्रोहाच्या गुन्ह्यात
मोडत नाही, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं, आंध्र प्रदेश सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर
नाराजी व्यक्त केली.
****
कोरोना
प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कोविन ऍपवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते, मात्र ग्राणीण भागात
कोविन ऍपच्या माध्यमातून नोंदणी अशक्य असून, सरकारला वास्तविकतेचं भान नाही, असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे. ग्रामीण भागात कोविन ऍपवरून नोंदणी करणं प्रत्यक्षात शक्य
आहे का, कोविन ऍपवर नोंदणी करूनच त्यांनी लसीकरणाला जावं, अशी अपेक्षा सरकार कशी ठेवू
शकतं, असे प्रश्न न्यायालयानं विचारले आहेत.
****
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना २३ कोटीपेक्षा
जास्त कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रा, विनामूल्य
वितरीत केल्या आहेत. एक कोटी ७५ लाखापेक्षा अधिक मात्रा अद्याप राज्यं आणि
केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असल्याचं, केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं सांगितलं आहे. येत्या तीन दिवसात आणखी दोन कोटी ७३ लाखाहून अधिक
मात्रा राज्यांना उपलब्ध करुन दिल्या जातील, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशात
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. देशात काल नव्या
एक लाख २७ हजार ५१० रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७९५ नागरिकांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, दोन कोटी ८१ लाख झाली असून, या
संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ३१ हजार ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दोन लाख ५५
हजार २८७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत, दोन कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, सध्या १८ लाख ९५ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सन
२०१५ ते २०२१ या कालावधीत बीड जिल्ह्यातल्या विविध देवस्थानांच्या जमिनी, ईनामी जमिनी,
अधिकाऱ्यांशी संगनमत करून दुसऱ्यांच्या नावावर करून दिल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे
निर्देश, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. बीड तालुक्यातल्या नामलगाव इथल्या
श्री गणपती मंदिराची २६ एकर जमीन परस्पर नावे करून घेतल्याचा प्रकार, नुकताच उघडकीस
आला. या संबंधीचा फेरफार निकाल तात्काळ थांबवण्यात यावा, असा आदेशही मुंडे यांनी दिला
आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
****
पाच
जून, या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून, औरंगाबाद विभागात सर्व गावांत तसंच शहरात
वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. प्रत्येक व्यक्तीमागे किमान तीन झाडं
लावण्यात येणार आहेत. वृक्ष लागवडीची ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याबाबत सर्व विभाग
प्रमुखांना, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आवश्यक सूचना केल्या आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातून शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांचं कोविड लसीकरण
लवकरच सुरू केलं जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली. म्युकरमायकोसिस
संदर्भात डॉक्टरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी तज्ज्ञांद्वारे कार्यशाळा, वेबिनारचं
आयोजन करणार असल्याचं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या बैठकीत सांगितलं.
****
दुबई
इथं सुरु असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजीत यानं सुवर्णपदक
पटकावलं आहे. ९१ किलो वजनी गटात त्यानं कझाखस्तानच्या व्हॅसिली लेविट याचा चार - एक
असा पराभव केला. या विजयामुळे भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदकं जमा झाली आहेत.
****
No comments:
Post a Comment