Tuesday, 1 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. कोविड -१९ शी संबंधित अधिक मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत केंद्राशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत केंद्राशी संपर्क करू शकता.

****

·      मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाचा लाभ देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाच्या आदेशात सुधारणा.

·      औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, पुणे, मुंबई नाशिकसह राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे नियम आजपासून शिथिल.

·      पोलिस ठाण्यात गोंधळ घालून धमकी दिल्याच्या प्रकरणात औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा.

·      म्युकरमोयकोसिसच्या प्रत्येक रुग्णास मोफत इंजेक्शन देण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी.

·      राज्यात १५ हजार ७७ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ७२ जणांचा मृत्यू तर एक हजार ३९४ बाधित.

आणि

·      मराठवाड्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस, वीज पडून दोन जणांचा मृत्यू.

****

नोकरी आणि शिक्षणात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग - एसईबीसी अर्थात मराठा समाजातल्या पात्र लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी या आदेशात सुधारणा करण्यात आली असून, यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यानुसार इतर कुठल्याही आरक्षणाचा लाभ न मिळणाऱ्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्था, स्वायत्त विद्यापीठांमध्ये प्रवेशाच्या १० टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय सरकारी कार्यालयं, निमशासकीय आस्थापना, महामंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राधिकरणांमध्ये सरळ सेवा भरतीत १० टक्के आरक्षण देण्यात येईल. राज्यात सध्या लागू असलेल्या आरक्षणाशिवाय हे आरक्षण असेल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तहसीलदार किंवा अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल.

****

मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला, राज्य सरकारनं सात जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, ही समिती स्थापन करण्यात आली होती.

****

औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, पुणे, मुंबई आणि नाशिकसह राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे नियम आजपासून शिथिल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. दुपारी तीन वाजेनंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तसंच दुकानं सुरु ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मॉल्स, केशकर्तनालय, धार्मिक स्थळं बंदच राहतील. हॉटेल, दारुची दुकानं, यांना पूर्वी प्रमाणे फक्त पार्सल सेवा सुरु राहील, असं या आदेशात म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. हिंगोली जिल्ह्यात ई-कॉमर्स, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी संबंधित सर्व दुकानं, वाहन दुरुस्ती दुकानं, मोंढा इत्यादी दुकानं आणि आस्थापना, सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील.

परभणी जिल्ह्यात शेतीशी संबंधित दुकानं आठवड्याचे सर्व दिवस सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. दोन्ही जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात निर्बंध कायम असणार आहेत. फक्त कृषी विषयक सेवा आणि बॅँका दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी लागू असलेली जनता संचारबंदी आता फक्त रविवारी लागू असणार आहे.

****

पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आणि धमकी दिल्याच्या गुन्ह्यात औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयानं सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. औरंगाबाद शहरात २०१८ साली उसळलेल्या जातीय दंगलीच्या गुन्ह्यात शिवसैनिकांना जामिनावर सोडावं म्हणून, जैस्वाल यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला होता. हवालदार चंद्रकांत पोटे यांनी जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान, न्यायालयानं शिक्षा आणि दंड जाहीर केल्यानंतर जैस्वाल यांनी त्वरीत दंडाची रक्कम न्यायालयात जमा करुन शिक्षेला अपिलापर्यंत स्थगिती आणि जामीन मिळवला आहे.

****

राज्य सरकारनं म्युकरमोयकोसिसच्या प्रत्येक रुग्णास मोफत इंजेक्शन द्यावं, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल जालना इथं यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले –

राज्य सरकार फक्त महात्मा फुले योजनेतल्या पेशंटला किंवा हॉस्पिटलला म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन देतात. आत्ता महाराष्ट्रामधे साधारणपणे तीन हजार सातशे ॲक्टिव्ह पेशंटस्‌ आहेत. या सगळ्यांकरता तो कुठेही ॲडमिट असला तरी म्युकर मायकोसिसची इंजेक्शन्स हे राज्य सरकारनं प्रोक्युअर केले पाहिजे. तो खाजगीत असो की तो सरकारीत असो. कारण कोणाला ५० लागतात कोणाला ६० लागतात कोणाला १०० लागतात. हे मोफत इंजेक्शन्स त्यांनी दिले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे.

जालना औद्योगिक वसाहतीत पोलाद उद्योग समूहानं उभारलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची फडणवीस यांनी काल पाहणी केली. पोलाद उद्योग समुहाकडून दररोज दोनशे ऑक्सिजन सिलिंडर मोफत देण्यात येत असल्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याची टीका, फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत प्रदेश भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने आतातरी लक्ष घालून पुढच्या उपाययोजना तातडीनं हाती घेतल्या पाहिजे, ओबीसी समाजासंदर्भात शास्त्रीय आकडेवारी गोळा करण्याचं काम तातडीनं केलं, तर समाजाला दिलासा देता येईल, असं ते म्हणाले.

इतर मागासवर्गीय प्रवर्ग - ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्य सरकारनं न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू मांडण्याचा प्रयत्नच केला नाही, असं त्या म्हणाल्या. याप्रश्नी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.

****

दरम्यान, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल भंडारा इथं बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातून आरक्षण रद्द व्हावं, असं विधान बिहारच्या निवडणुकीच्या वेळी केलं होतं, आता मात्र भाजप ओबीसीचे हितचिंतक असल्याचं भासवत आहेत, असं पटोले यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात याकरिता आरोग्य विभागानं ५०० रुग्णवाहिकांची खरेदी केली असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या २० रुग्णवाहिकांचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते. जालना जिल्ह्यासाठी आणखी रुग्णवाहिकांची आवश्यकता असून, त्या लवकर उपलब्ध करून दिल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री टोपे यांनी संयुक्त बैठक घेत, जिल्ह्यातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना केल्या.

****

राज्यात काल १५ हजार ७७ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ४६ हजार ८९२ झाली आहे. काल १८४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९५ हजार ३४४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. काल ३३ हजार रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ८८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ५३ हजार ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ३९४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ७२ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २४, बीड १४, औरंगाबाद ११, जालना नऊ, उस्मानाबाद आठ, परभणी तीन, हिंगोली दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५१६ रुग्ण आढळले. उस्मानाबाद २९१, औरंगाबाद २१६, नांदेड १५३, लातूर ९८, परभणी ५४, जालना ३४, तर  हिंगोली जिल्ह्यात ३२ नवे रुग्ण आढळून आले.

****

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असं फडणवीस यांनी सांगितलं.

****

मराठवाड्याच्या काही भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. विभागात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात सोनपेठसह अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. मानवत तालुक्यातल्या पाळोदी शिवारात वीज कोसळल्यानं शेतात काम करणाऱ्या ज्ञानेश्वर टरपले या १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातल्या हेर इथं सुनिता कांबळे या ५० वर्षीय महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात नायगाव शहर आणि परिसरात ही काल सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. बीड आणि जालना जिल्ह्यातही काल पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, मराठवाड्यात उद्यापर्यंत तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

उस्मानाबाद इथं नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संभाव्य जागेची, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. राष्ट्रीय आरोग्य परिषदेच्या सूचनेनुसार, आपण चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करत असल्याचं, त्यांनी सांगितलं. शासकीय नियमानुसार महाविद्यालयासाठीची पदभरती लवकरात लवकर सुरू करून, पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पहिल्या वर्षासाठी शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

दरम्यान, देशमुख यांनी उस्मानाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातली रुग्ण संख्या कमी होऊन संसर्गदर कमी होण्यासाठी, जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांची माहिती घेऊन, त्यांनी आवश्यक सूचना केल्या.

****

हिंगोली जिल्ह्यात काल सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यावर कारवाई करत, दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरड शहापूर इथं कोरोना प्रतिबंधाचे नियम डावलून, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, हा विवाह सोहळा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकानं त्या ठिकाणी जाऊन वधु वरासह २०० वऱ्हाड्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी दहा जणांना ताब्यात घेतलं असून, लग्नाचं व्हिडिओ शुटिंग पाहून इतरांचा शोध घेण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी शहरात टाळेबंदीचं उल्लंघन करणाऱ्या १० दुकानांवर काल कारवाई करण्यात आली. या सर्व दुकानदारांना एकूण एक लाख ३५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. यामध्ये एका बांगडी दुकानासह नऊ कापड दुकानांचा समावेश आहे.

परभणी ते जिंतूर मार्गावरील झरी इथं काल ग्रामीण पोलिस ठाणे तसंच ग्रामपंचायतीनं वाहनधारकांची आरटीपीसीआर तपासणी केली आणि विनामास्क फिरणाऱ्याविरुध्द दंडात्मक कारवाई करत, २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

****

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मजलिस चॅरिटी एज्युकेशनल अ‍ॅण्ड रिलिफ ट्रस्ट आणि अ‍ॅक्सेस फाउंडेशन अंतर्गत पाठवलेली वैद्यकीय साहित्याची खेप काल औरंगाबाद इथं दाखल झाली. खासदार इम्तियाज जलील यांनी काल या साहित्याचं लोकार्पण केलं. यामध्ये अद्ययावत व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, थर्मामीटर, ऑक्सिमीटर आणि औषधांचा समावेश असल्याची माहिती खासदार जलील यांनी दिली.

****

लातूर इथं आज ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी सहा केंद्रांवर कोविड लसीकरण सुरू राहणार आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी आज लसीकरण होणार नाही, अशी माहिती लातूर महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

****

गेल्या सात वर्षात देशाचा विकास नाही तर देशाला भकास करण्याचं काम भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलं असल्याच्या घोषणा देत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना एक निवेदन देण्यात आलं.

****

नांदेड जिल्हा परिषदे अतंर्गत विविध विभागातल्या पदोन्नतीच्या कोट्यातली रिक्तपदं सेवा ज्येष्ठतेनुसार येत्या १० जून पर्यंत भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली.

****

नांदेड-पनवेल-नांदेड ही विशेष रेल्वे गाडी १५ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली.

****

No comments: