Wednesday, 2 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३९७८०४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६१२७३९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

·      खासगी रुग्णालयांमध्ये शहरांच्या वर्गीकरणानुसार कोविड उपचारांसाठीचे दर राज्य सरकारकडून निश्चित.

·      राज्यात १ हजार १२३ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ५५ जणांचा मृत्यू तर एक हजार ५६ बाधित.

·      देशात यंदा सरासरीच्या १०१ टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज.

·      सहा जून हा दिवस संपूर्ण राज्यभरात “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

आणि

·      सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणं आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरुन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ जणांविरोधात गुन्हा दाखल

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा यंदा कोविड पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जे विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक आहेत, त्यांना परिस्थिती अनुकूल होताच, सीबीएसई मंडळाकडून पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशात कोविडची स्थिती पाहता, पालक आणि शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चिंतीत होता, या तणावपूर्ण स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगता येणार नाही, असं मत, पंतप्रधानांनी या बैठकीत व्यक्त केलं. सीबीएसईनं यंदा दहावीच्या परीक्षाही यापूर्वीच रद्द केल्या आहेत.

****

खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांसाठीचे दर राज्य सरकारनं निश्चित केले आहेत. यानुसार आता शहरांचं वर्गीकरण करून दर निश्चित करण्यात आले असून, रुग्णालयांना अधिक दर आकारता येणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कक्षांतर्गत नियमित विलगीकरणासाठी ‘अ’ वर्ग शहरांसाठी प्रतिदिन चार हजार रुपये, ‘ब’ वर्ग शहरांसाठी तीन हजार रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांसाठी, दोन हजार ४०० रुपये शुल्क घेता येईल. यामध्ये रुग्णाची आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, आणि जेवण या सुविधांचा समावेश आहे. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल, फक्त मोठ्या चाचण्या तसंच उच्च पातळीवरील मोठ्या औषधांना, यातून वगळण्यात आलं आहे.

अतिदक्षता कक्ष विलगीकरणासाठी ‘अ’ वर्ग शहरांत साडे सात हजार रुपये, ‘ब’ वर्ग शहरांत साडे पाच हजार रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांत, साडे चार हजार रुपये दर आकारता येईल. तर व्हेंटिलेटरसह अतिदक्षता कक्ष विलगीकरणासाठी, ‘अ’ वर्ग शहरांत नऊ हजार रुपये, ‘ब’ वर्ग शहरांत सहा हजार ७०० रुपये आणि ‘क’ वर्ग शहरांसाठी, पाच हजार ४०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

‘अ’ वर्ग शहरांत मुंबई, पुणे, आणि नागपूर, ‘ब’ वर्ग शहरांत नाशिक, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, सांगली तर उर्वरित सर्व शहरं ‘क’ वर्ग क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड ही दोन शहरं ‘ब’ वर्गात तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद ‘क’ वर्गात समाविष्ट आहेत.

****

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. मे महिन्यात बालकांना कोविड संसर्ग होण्याचं प्रमाण शून्य पूर्णांक शून्य सात टक्के एवढं होतं. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनानं राज्यस्तरीय बालरोगतज्ज्ञांचा कृती दल स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवर उपचारांच्या दृष्टीनं रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करत असल्याचं, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं आहे.

****

राज्यात काल १४ हजार १२३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ६१ हजार १५ झाली आहे. काल ४७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९६ हजार १९८ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. काल ३५ हजार ९४९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५४ लाख ३१ हजार ३१९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ३० हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५५ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २१, बीड दहा, उस्मानाबाद आठ, औरंगाबाद सात, नांदेड पाच, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात काल कोविड संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३६१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात १७७, औरंगाबाद १५७, लातूर १०६, उस्मानाबाद ८९, जालना ७२, परभणी ६४, तर हिंगोली जिल्ह्यात ३० नवे रुग्ण आढळून आले.

****

कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यूमुखी पडलेल्या मात्र शासनाच्या निकषात बसत नसलेल्या, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना, पाच लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल ही घोषणा केली. कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रूपये देण्याची सरकारी योजनेची मुदत, एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आल्याचंही, त्यांनी जाहीर केलं.

****

देशात यंदाही मान्सून समाधानकारक म्हणजे सरासरीच्या १०१ टक्क्यांपर्यंत असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज काल जाहीर केला. त्यानुसार देशभरात जून ते सप्टेंबर या पूर्ण कालावधीत पावसाची दीर्घकालीन सरासरी ९६ ते १०४ टक्के इतकी राहील. विशेषत: उत्तरार्धात जोरदार सरी बरसतील, असं महापात्रा यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा विचार करता जून महिन्यात मराठवाड्यात सरासरी कमी पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.

****

सहा जून हा दिवस संपूर्ण राज्यभरात “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसंच ग्रामपंचायतींमध्ये, कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचं पालन करुन हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालयी पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. सर्व पदाधिकारी, अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी भगव्या स्वराज्य ध्वजासह, शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करुन, राष्ट्रगीत तसंच महाराष्ट्र गीताचं गायन करुन कार्यक्रमाचा समारोप करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, येत्या सहा जून रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी तुळजापूरहून कवड्याची माळ आणि कुंकू तसंच शिरकाई देवीसाठी मानाची साडी चोळी आणि इतर साहित्य काल रायगडाकडे रवाना करण्यात आलं.

****

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याबाबत कायदेशीर अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. पदोन्नतीतील आरक्षण यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर राऊत यांनी ही माहिती दिली. या विषयावर निर्णय घेण्याबाबत बैठकीत एकमत झालं, असं ते म्हणाले.

****

रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी यावर्षी राबवलेल्या विविध फलोत्पादन विषयक योजनांचा, काल मंत्रालयात एका बैठकीत आढावा घेतला. याकरता विभागानं विकासाचं सुक्ष्म नियोजन करून, राज्याचं देशातल्या फळे निर्यातीमधलं प्रथम स्थान अधिक मजबूत करण्याचं आवाहन भुमरे यांनी यावेळी केलं. मराठवाडा विभागात मोसंबी पिकाचं मोठं क्षेत्र असून, त्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न करावेत, आणि मोसंबी उत्पादनासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहनही, त्यांनी केलं.

****

नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचं वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ कार्यालय सुरू करण्यास, राज्य शासनानं मान्यता दिली आहे. यामुळे नांदेडसह, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यात शासकीय इमारतींच्या कामांना गती मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी, याबाबत पाठपुरवठा केला होता.

****

नांदेड जिल्ह्यात सर्व प्रकारची दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले. यात मॉल्स, केशकर्तनालय, धार्मिक स्थळं बंद राहतील. जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी संबंधित सर्व दुकानं, वाहन दुरुस्ती दुकानं, आडत दुकानं आणि आस्थापना, सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र जिल्ह्यात दर शनिवारी आणि रविवारी कडक बंद पाळला जाईल, असं या आदेशात म्हटलं आहे.

परभणी जिल्ह्यातही अत्यावश्यक वस्तूंसह अन्य दुकानं उघडण्यास जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे.

दरम्यान, कोविड संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खाजगी फायनान्स कंपन्यांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत, ऑटोसह इतर वाहनांच्या कर्ज हप्त्याची सक्तीची वसुली किंवा जप्ती करू नये, याबाबत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश जारी केले आहेत. प्रहार ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथल्या उपजिल्हा रुग्णालयातल्या कोविड केंद्रात एका आठ महिन्याच्या मुलानं आणि सात महिन्याच्या मुलीनं कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. कोविडवर मात करणारे हे सर्वात लहान चिमुकले ठरले आहेत.

****

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची उस्मानाबाद शाखा आणि मातृभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं तुळजापूर तालुक्यातल्या होर्टी गावामध्ये, काल कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मोफत निर्जुंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी गावातील सार्वजनिक ठिकाणं, मंदिर परिसर, वस्ती, आठवडी बाजार, वाचनालय, बसस्थानक, कोविड रुग्णांचं घर या ठिकाणी निर्जुंकीकरण करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं भाजपच्या वतीनं काल कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. शासकीय रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, अशा ७५ कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र देवून गौरवण्यात आलं.

****

हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं काल नांदेड नाका चौकात रिक्षा चालकांना जीवनावश्यक कीटचं वितरण करण्यात आलं. परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना तसंच सामान्यत: विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तराचं माहितीपत्रकही यावेळी वितरीत करण्यात आलं.

****

सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणं आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरुन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाळेबंदीचं उल्लंघन करणारी दुकानं सील करण्यात आली होती, या दुकानांचं सील काढण्यासाठी खासदार जलिल यांनी कामगार उपायुक्त कार्यालयात जाऊन कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याविरोधात पोळ यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यात काल जिलेटीननं भरलेल्या टेम्पोचा अपघात होवून मोठा स्फोट झाला. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, टेम्पोच्या मात्र ठिकऱ्या उडाल्या. पार्डी-वैजापूर मार्गावर बारड रस्त्यावर हा अपघात झाला. धावत्या टेम्पोचं चाक निखळून पडल्यानं टेम्पो रस्त्यालगतच्या शेतात उलटला, चालकानं प्रसंगावधान दाखवून स्वत:चा जीव वाचवला, आणि शेतात काम करणारे लोक तसंच रस्त्यावरून जाणाऱ्यांना दूर होण्यास सांगितलं. त्यामुळे मोठा धोका टळल्याचं, आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

चालू हंगामात बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं सभासद शेतकऱ्यांसाठी २६० कोटी रूपये कर्जाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. ही कर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी केली असल्याचं, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी शरद ठोंबरे यांनी सांगितल. ते म्हणाले –

शेतकऱ्यांना सन २०२१-२२ या खरीप हंगामासाठी लवकरात लवकर कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा बँकेने जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याशी करार केला आहे. त्यामुळे शेतकरी सभासदास कर्जांसाठी लागणारा सातबारा, आताचा उतारा यासारखी आवश्यक असणारी कागदपत्रे आता बँकेच्या शाखेतच उपलब्ध होणार आहेत.

****

हिंगोली इथं रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच टिप्पर सोडवण्यासाठी, तीन लाख रुपये लाचेची मागणी करणारे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याविरोधात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल गुन्हा दाखल केला. माचेवाड यांनी लाच घेण्यास सहमती दर्शवल्याचं सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. कळंब तालुक्यातल्या मस्सा खंडेश्वरी शिवारात एका शेतातून गांजाची तब्बल ४७ पोती हस्तगत करण्यात आली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे एक कोटी २४ लाख ५९ हजार २६० रुपये इतकी आहे. या कारवाईवेळी दोन आरोपी पसार झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: