Friday, 23 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथील जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका - तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोकण किनारपट्टीसह राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आढावा

** पेगॅसस हेरगिरी प्रकरणी विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित

** राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासासाठी सर्किट योजना तयार करावी - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

आणि

** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचं पारंपरिक पद्धतीनं उद्घाटन

****

कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. डोंगर उतारांवरील गावं आणि वस्त्यामधील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. पूरग्रस्त नागरिकांचं योग्य ठिकाणी स्थलांतर करावं, पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटं, कपडे, औषधी यासारखं जीवनावश्यक साहित्य पुरवण्याकडे लक्ष द्यावं, कोविड रुग्णांची काळजी घ्यावी, तसंच प्रशासन आणि नागरिक यांनी समन्वयानं काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल-एनडीआरफच्या १४ तुकड्या, तटरक्षक दलाच्या २, तसंच नौदलाच्या २ तुकड्यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

****

महाड इथल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथकं आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू असून, पूरग्रस्तांसाठी खाद्यपदार्थ तसंच पेयपदार्थ एसटीद्वारे पोहोचवण्यात येत आहेत. आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली.

 

दरम्यान, रायगड जिल्ह्यात तळई गावांत काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ३६ जणांचे मृतदेह बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आले. अजून ३० ते ४० जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

पोलादपूर तालुक्यात गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी इथं दरड कोसळून आठ ते दहा घरांचं नुकसान झाले असून, काही घरं दरडीसोबत वाहून गेली, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. केवनाळे इथंही ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या २०३ कुटुंबातील ८०५ व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आलं आहे. सर्वाधिक ४२५ जण दोडामार्ग तालुक्यातले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं खबरदारीची उपाययोजना म्हणून हे स्थलांतर करण्यात आलं आहे.

****

कोकणातील पूर परिस्थितीत रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरु करून मदत कार्य वेगाने व्हावं, असं रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. यासाठी तातडीने आढावा घेऊन गणेशोत्सवासाठी ४० गाड्यांचं नियोजन करण्याच्या सूचना दानवे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या. गणेशोत्सवासाठी ११२ गाड्या उपलब्ध होणार असून, प्रतिक्षा यादी वाढल्यास गाड्यांची संख्या वाढवण्यात येईल, असंही दानवे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

****

पेगॅसस प्रकरणावरुन विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केलं. टीएमसीच्या इतर सदस्यांनी या निलंबनाचा तीव्र निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ सुरुच राहिल्यानं कामकाज साडेबारा वाजता दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आलं. त्यानंतर खासदार शंतनू सेन यांनी, सभापतींच्या सूचनेनंतरही सदनाबाहेर जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून राज्यसभेचं कामकाज तिसऱ्यांदा अडीच वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

 

लोकसभेतही कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर संपूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ जूलै रोजी आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७९ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज १६५ वी जयंती. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लोकमान्य टिळक यांचे विचार प्रेरक आहेत. शिक्षण आणि महिला सशक्तीकरण आदी विषयांवरचे त्यांचे विचार आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहतील असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लोकमान्य टिळक हे खडतर परिस्थितीतही आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा देतात, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

विधान भवनातही प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी टिळकांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं बलवंत वाचनालयानं घेतलेल्या कार्यक्रमात सरस्वती भुवन प्रशालेच्या प्राचार्य शुभांगी पांगरकर यांनी आपल्या व्याख्यानातून टिळकांच्या कार्याला उजाळा दिला.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

****

राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. आज मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत देशमुख यांनी, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. पुराभिलेख संचालनालयाकडे असलेला ऐतिहासिक वारसा डिजिटल स्वरुपात जतन करण्याच्या कामाला गती देण्याची सूचना देशमुख यांनी केली.

****

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचं पारंपरिक पद्धतीनं आज सायंकाळी उद्घाटन झालं. जपानच्या टोक्यो शहरात सुरू असलेल्या या उद्धाटन सोहळ्याच्या संचलनात भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि मुष्टियोद्धा मेरी कोम यांनी भारतीय पथकाचं नेतृत्व केलं. कोरोना विषाणू साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आणि सध्या प्रेक्षकांविना होत असलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेचं, डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर रोज पहाटे पाच ते संध्याकाळी सात या वेळेत थेट प्रसारण होणार आहे.

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज कोलंबो इथं खेळला जात आहे. दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत २३ षटकात ३ गडी बाद १४७ धावा केल्या. हा सामना पावसामुळे थांबला असून मनिष पांडे १० तर सुर्यकुमार यादव २२ धावांवर खेळत आहेत. भारतानं या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

****

औरंगाबाद इथं एका कोविड बाधिताचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोविड विषाणू संसर्गानं आतापर्यंत तीन हजार ४८१ जण दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ११० झाली असून एक लाख ४३ हजार ३५५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे.

****

जालना इथंही आज एका कोविड रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक हजार १७७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात पाच नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ३७७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १४७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

//********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...