आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथील जरी झाले
असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका - तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून
सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड
-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय
मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** धोकादायक वस्त्याचं सुरक्षित
पुनर्वसन आणि पुरग्रस्तांना नुकसान भरपाईची मुख्यमंत्र्यांची घोषणा
** पूरग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये
आपत्तीग्रस्तांना गहू, तांदूळ आणि केरोसिनचा मोफत पुरवठा
** टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलन
स्पर्धेत मीराबाई चानूची रौप्य पदकाला गवसणी
आणि
** देशातल्या पहिल्या मोबाइल
ऑक्सिजन प्लॅन्ट 'प्राणवायू-दूत'चं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात
लोकार्पण
****
कोकणातील धोकादायक वस्त्याचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात
येईल आणि पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी
आज रायगड जिल्ह्यातल्या दरडग्रस्त तळई गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसंच नागरिकांशी
संवाद साधला. कोकणात सातत्यानं येणाऱ्या नैसर्गिक संकटाचा उल्लेख करून, दुर्घटना घडूच
नयेत, घडल्या तर त्यात जीवितहानी होऊ नये यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनास्थळी पोहोचण्यास विलंब
झाला या आरोपाचं त्यांनी खंडन केलं. आपत्तीच एवढी मोठी होती, की पथकाला त्याठिकाणी
पोहचताना अडचणी आल्या. राज्य शासन आपत्तीचा
मुकाबला करण्यासाठी तयार होतं. केंद्राने देखील सहाय्य केलं, लष्कर, एनडीआरएफ सर्वांनीच
मदत केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पूर परिस्थिती उद्भवते.
यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा
तयार केला जाईल,असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
****
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर
या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आपत्तीग्रस्तांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो
तांदूळ आणि पाच लीटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा
मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. ते आज नाशिक इथं बोलत होते. या भागांमध्ये
दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचं वितरण केलं जाणार असल्याचं ते म्हणाले. ज्या ठिकाणी
शिवभोजन केंद्र वाहून गेलं आहेत किंवा पाण्यात आहेत तिथं इतर ठिकाणांवरून शिवभोजनाची
पाकिटं वितरीत करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
****
कोकणातल्या पूर परिस्थितीत
मदतकार्य राबवण्यास ठाकरे सरकारकडून झालेल्या दिरंगाईची न्यायिक चौकशी केली जावी, अशी
मागणी मुंबईचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. गुरुवारी २ ठिकाणी दरड कोसळली असताना
सुद्धा राज्य सरकारने नौदल किंवा तटरक्षक दलाला बोलवण्यासाठी शुक्रवारी पत्र दिलं,
त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यानं नागरिकांचे बळी गेल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. ही दिरंगाई अक्षम्य असल्याचं,
भातखळकर यांनी म्हटलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण
शहरातला महापूर आता ओसरला असून मदतकार्याला वेग आला आहे. चिपळूण पालिकेचे कर्मचारी
ठिकठिकाणी स्वच्छता करत आहेत. आपद्ग्रस्तांना ठिकठिकाणाहून मदतीचा मोठा ओघ सुरू झाला
आहे. त्यामध्ये जीवनावश्यक सर्व वस्तूंचा समावेश आहे. खेड तालुक्यातल्या पोसरे इथं
घरांवर कोसळलेली दरड दूर करण्याचं काम सुरू झालं असून दरडीखालून तिघांचे मृतदेह बाहेर
काढण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात महाड आणि
पोलादपूर तालुक्यात दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबलेले एकूण ५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले
आहेत. यामध्ये १० वर्षा खालील ७ बालकांचा समावेश आहे. तळीये मधून एकूण ४६ मृतदेह मिळाले
असून पोलादपूर तालुक्यात ११ मृतदेह बाहेर काढले आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधिकारी प्रदीप इंगोले यांनी ही माहिती दिली.
****
सातारा जिल्ह्याच्या पाटण
तालुक्यातील आंबेघर इथं मदत आणि शोधकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल
झालं असून मातीखाली गाडले गेलेले सहा मृतदेह आज सकाळी बाहेर काढण्यात आले. दरड कोसळल्याने
तसेच पुरात वाहून गेल्याने दगावलेल्यांची संख्या आता १३ झाली आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस
झाल्याने आज सकाळी ६ वाजता धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी
नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा
इशारा देण्यात आला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या
रविवारी २५ जुलै रोजी आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७९ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन
स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या
ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचं अभिनंदन केलं आहे.
हॉकीमध्ये भारतीय संघानं अटीतटीच्या
लढतीत न्यूझीलंड संघाचा तीन - दोन असा पराभव केला. भारतीय महिला हॉकी संघाचा सामना
नेदरलँडसोबत सुरू आहे. फर्स्ट हाफपर्यंत दोन्ही संघ एक एक गोलने बरोबरीत होते.
तिरंदाजीमध्ये मिश्र सामन्यात
उपान्त्यपूर्व फेरीत दीपिकाकुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या संघाचा दक्षिण कोरियाच्या
संघाकडून दोन - सहा असा पराभव झाला.
टेबल टेनिस स्पर्धेत मोनिका
बत्राने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर मिश्र
दुहेरी प्रकारात शरथ कमल आणि मोनिका बत्रा यांचा चीनच्या खेळाडूकडून पराभव झाला.
नेमबाजीमध्ये सौरभ चौधरी १०
मीटर एयर पिस्टल प्रकारात सातव्या स्थानावर राहिला.
****
देशातल्या पहिल्या मोबाइल
ऑक्सिजन प्लॅन्ट 'प्राणवायू-दूत' आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाईस 'ए एफ-हंड्रेड'
आणि 'ए एफ- सिक्स्टी' या यंत्राचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित
पवार यांच्या हस्ते आज पुण्यात लोकार्पण करण्यात आलं. मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट हा प्राणवायू
-दूत २५० लिटर प्रति मिनिट क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रं, ग्रामीण भाग आणि
सुमारे ५० रुग्णखाटांच्या रुग्णालयाची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची
मांडणी अतिशय सोपी असून, हा ३० मिनिटांच्या आत हा प्राणवायू दूत सेवा देण्यास सज्ज
होतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. प्राणवायू दूतमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची
सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलिंडर्स भरण्यासाठी याचा वापर करता येईल.
****
दरम्यान, कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचं दिसत असल्यानं, सोमवारपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत
बाजारपेठांमध्ये व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री
आणि इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून यासंदर्भात निश्चित सकारात्मक निर्णय घेऊ, असं उपमुख्यमंत्री
म्हणाले. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना काही
सवलती देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी
चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं पवार म्हणाले.
****
दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण-पॉलिटेक्निक
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास ३० जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
ही मुदत २३ जुलैला संपणार होती. ७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात
येणार असल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने किमान
एक झाड लावून त्याचं संवर्धन करणे गरजेचं असल्याचं, महसूल तसंच ग्रामविकास राज्यमंत्री
अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं बुध्द लेणी परिसरात संबोधी अकादमीच्या
वतीने वृक्षारोपण वृक्षसंवर्धन कार्यक्रमात ते बोलत होते. माझे झाड माझी जबाबदारी
’ या उदे्शाने प्रेरित होऊन जैवविविधता टिकवण्याकरता नागरिकांनी हातभार लावावा, असं
आवाहन सत्तार यांनी केलं.
****
कसारा -कल्याण घाटात भूस्खलन
झाल्यानं, तसंच काही ठिकाणी रेल्वे मार्गावर आलेल्या पाण्यामुळे तर काही ठिकाणी रेल्वे
मार्गच वाहून गेल्यामुळे मध्य रेल्वेने काही विशेष रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
नांदेड-मुंबई राज्यराणी गाडी २७ जुलै पर्यंत तर मुंबई -नांदेड राज्यराणी विशेष गाडी
२८ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. नांदेड-पनवेल गाडी २७ जुलैपर्यंत तर पनवेल-नांदेड
गाडी २८ जुलैपर्यंत तर धावणार नाही.
//********//
No comments:
Post a Comment