Thursday, 2 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०२ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता १४ किलो २०० ग्रॅम विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत, ८८४ रुपये ५० पैसे झाली आहे. गेल्या महिनाभरात गॅसच्या किंमती दुसर्यांदा वाढल्या आहेत.

****

पी एम सी अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र या अडचणीत सापडलेल्या सहकारी बँकेच्या खातेदारांना या वर्षी ३० नोव्हेंबरपासून पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने यासंदर्भात अधिसूचित केलेल्या ठेवी विमा आणि क्रेडिट हमी या कलमांतर्गत खातेदारांना दिलासा मिळणार आहे.

****

टेस्ट ड्राईव्ह च्या बहाण्याने नवीन चारचाकी गाडी पळवून नेणाऱ्या दोघांना औरंगाबाद पोलिसांनी काल पाठलाग करून अटक केली. फैसल रफीक सय्यद आणि सय्यद अरबाज सय्यद आरेफ अशी आरोपींची नावं असून, सोबत आलेल्या वाहन दुकानाच्या कर्मचाऱ्याला त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून गाडी खाली उतरवून दिलं होतं. उसने पैसे देण्यासाठी चारचाकी पळवल्याचं आरोपींनी कबूल केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

****

नांदेड इथले भारतीय जनता पक्षाचे नेते भगवानराव पाटील आलेगावकर यांनी काल माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. सुनिल कदम उपस्थित होते.

****

जालना इथल्या पाणी पुरवठा विभागातला उपअभियंता दामोदर घोरपडे याला काल १० हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. एका ग्रामपंचायतीत नळ दुरुस्ती आणि इतर कामाचं सात लाख ४० हजार रुपये देयक मंजूर त्यानं ही लाच मागितली होती.

****

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊनच हिंगोली जिल्ह्यात गणेशोत्सव साजरा करावा, तसंच खबरदारी म्हणून कमीत कमी गणेश मूर्तीची स्थापना करावी, असं आवाहन, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक मंडळाच्या सदस्यांनी आपल्यामुळे कोविडमध्ये वाढ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सर्वांनी जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...