Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 23 September 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल
जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित
अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· पेगॅसस
हेरगिरी प्रकरण चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय तज्ज्ञांची समिती स्थापन करणार.
· पंतप्रधान
नरेंद्र मोदी चार दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल.
· औद्योगिक
अभियांत्रिकी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या भवितव्यात परिवर्तन अपेक्षित - केंद्रीय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचं प्रतिपादन.
आणि
· औरंगाबादमध्ये
अर्धा एकर क्षेत्र आणि तुकडाबंदी कायद्याचं पालन व्हावं- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांचं आवाहन.
****
सर्वोच्च न्यायालय पेगॅसस हेरगिरी प्रकरणी
चौकशीसाठी तज्ज्ञ तंत्रज्ञांची एक समिती स्थापन करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज
एका तोंडी आदेशाद्वारे ही माहिती दिली. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
करणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात आदेश दिले जातील, असंही सर्वोच्च न्यायालयानं
सांगितलं. जो आदेश पुर्वी दिला जाणार होता तो आता पुढच्या आठवड्यात दिला जाईल, असं
सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील पिठानं म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यात
या समितीतल्या सदस्यांची नावं निश्चित केली जातील आणि त्या नंतर आदेश दिले जातील, असंही
सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या चार दिवसांच्या
दौऱ्यासाठी आज अमेरिकेत दाखल झाले आहेत. जोरदार पाऊस सुरू असतानाही शेकडो भारतीय हातात
तिरंगा घेऊन त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जमले होते. विमानतळावर त्यांचं उत्साहात
स्वागत करण्यात आलं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो
बायडेन यांची व्हाईट हाऊस इथं बैठक होणार आहे. या बैठकीत अफगाणिस्तानमधल्या घडामोडी,
वाढता कट्टरतावाद, दहशतवाद, भारत - प्रशांत क्षेत्रातली सुरक्षितता, सायबर सुरक्षा,
कोविड लस पुरवठा आणि निर्मल ऊर्जा या क्षेत्रातली भागीदारी वाढवणं या मुद्द्यांवर चर्चा
करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान क्वाड शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
****
औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात खूप मोठी
क्षमता असून आपण जे काम करत आहात त्या माध्यमातून देशाच्या भवितव्यात मोठं परिवर्तन
घडवू शकता असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलं
आहे. गोयल यांनी आज मुंबईत ‘एन आय टी आय ई’ अर्थात राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी
संस्थेमधल्या मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातल्या उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन
केलं, त्यावेळी ते बोलत होते. जागतिकीकरण झालेल्या विश्वात परस्परांवरचं अवलंबित्वाचं
प्रमाण मोठं असल्यानं बांधणी, संशोधन, सामग्रीची वाहतूक करण्यासाठी सर्वोत्तम उपाय,
प्रभावी साठवणूक आणि गोदाम, अशाच इतर प्रकारांमध्ये मूल्यवर्धनाची गरज निर्माण झाली
आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक अभियांत्रिकीमध्ये खूप मोठी क्षमता असल्याचं गोयल म्हणाले.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ३१ हजार ९२३
नवे रुग्ण आढळले असून २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात तीन लाख एक हजार
सहाशे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आतापर्यंत
८३ कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार एकोणपन्नास नागरिकांचं लसीकरण झालं असल्याची माहिती
केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.
****
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातली
भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडली जात असल्याचं आरोग्य
मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागातर्फे सर्व तयारी
पूर्ण झाली आहे. परीक्षार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही त्यांनी
नमूद केलं आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातल्या पदासाठी परवा - शनिवारी तर गट
‘ड’ संवर्गातल्या पदांसाठी २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी
करण्यात आलेल्या तयारीचा टोपे यांनी आढावा घेतला. उमेदवारांना प्रवेश पत्र वेळेत मिळावं,
यंत्रणा सज्ज असावी, उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांचं समाधान करण्यासाठी `मदत
वाहिनी` सुरु करावी, अशा सूचना टोपे यांनी दिल्या.
****
औरंगाबाद शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी
अर्धा एकर क्षेत्र आणि तुकडाबंदी कायद्याचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी केलं आहे. त्यांनी या संदर्भात मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची
आज आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चार ते पाच जण एकत्र
येत अर्धा एकर क्षेत्राची नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे करतात आणि त्यामध्ये तुकडे
करुन अनधिकृत भूखंड पाडले जात असल्यानं तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं त्यांनी
सांगितलं. नागरिकांनी सहाशे चौरस फूट असे तुकडे पाडलेले भूखंड खरेदी करु नये, असं आवाहनही
त्यांनी यावेळी केलं. मुद्रांक शुल्क विभागात भूखंड, शेती खरेदी विक्रीची नोंदणी सुरू
असून या संदर्भातल्या अफवांना बळी पडू नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात आज सर्वदूर पाऊस झाला. जिंतूर
इथं दुपारी एक तास झालेल्या या पावसानं परिसरातल्या सखल भागात पाणी साचलं होतं.
****
आझादी का अमृत महोत्सवा निमित्त परभणी जिल्ह्यात
विविध उपक्रम सुरू आहेत. यांतर्गत जिल्ह्यात सांडपाण्याच्या नियोजनासाठी वैयक्तिक शोषखड्डे
तयार करणं, श्रमदान मोहिम राबवणं, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन करणं, स्वच्छतेविषयीचं
घोषवाक्य लिहिणं आणि नागरिकांचा ऑनलाईन अभिप्राय नोंदवणं असे विविध उपक्रम राबवणं सुरु
आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे या उपक्रमांना मार्गदर्शन करत आहेत.
****
हिंगोलीतल्या हिंगोली ते नांदेड मार्गावरच्या
सावखेडा गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं २० लाख ४५ हजारांचा गुटखा जप्त केला.
काल झालेल्या या कारवाईप्रकरणी आठ जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
आहे. मध्यप्रदेशातून एका ट्रकमध्ये गुटख्याची पोती नांदेडकडे नेली जात असल्याची माहिती
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरुन ही कारवाई करण्यात आली.
//**************//
No comments:
Post a Comment