Sunday, 10 October 2021

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – १० ऑक्टोबर २०२१ दुपारी १.०० वा. प्रादेशिक बातम्या

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ० ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

 

नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो.

****

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीनं पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षानं देशभरातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना उद्या सोमवारी तीन तास मौन पाळण्यास सांगितलं आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळे दरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर हे मौन आंदोलन केलं जाणार आहे. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात प्रदेश काँग्रेस समित्यांना पत्र पाठवलं आहे.

***

राज्य सरकार स्वतःच राज्यात बंद कसा पुकारू शकतं असा प्रश्न केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं उद्या राज्यात बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री आठवले यांनी एका पत्रकाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधाचं राजकारण करण्यात आघाडी इतकी मश्गुल झाली आहे की, आपण राज्यात सरकार चालवत आहोत, याचं त्यांना भान राहिलं नसल्याचं सांगत, बंद पुकारण्याची महाविकास आघाडीची भूमिका चुकीची असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

****

तेल कंपन्यांनी आज डिझेलच्या दरात ३५ तर पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रति लिटर वाढ केली आहे.

***

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत देशभरात आतापर्यंत ९४  कोटी  ७६ लाख ८५ हजार जणांना लस देण्यात आली आहे. यात ६८ कोटी जणांना पहिली तर २६ कोटी ६२ लाख जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत ८ कोटी ७२ लाख, ९७ हजार ८५०हून अधिक जणांना लसीची मात्रा देण्यात आली आहे.

देशात काल दिवसभरात ६६  लाख ८५ हजारां हून अधिक जणांचं लसीकरण झालं.

देशातील कोरोना विषाणू बाधित सक्रिय रुग्णांची संख्या आता आणखी कमी होऊन ती २ लाख ३० हजारांवर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये १८ हजार १६६ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर २१४ करोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. त्याचवेळी, गेल्या २४ तासांमध्ये २३ हजार ६२४  रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. विषाणू मुक्त झालेल्यांचा एकूण आकडा आता तीन कोटी ३२ लाखांच्या वर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९९ टक्के झाला आहे.

***

आकाशवाणी तसंच दूरदर्शनमधील प्रसारण विषयक सुधारणांमुळे नविन तंत्रज्ञान आणि नवीन कार्यक्रम संधींमध्ये मुलाग्र बदल घडून येत असल्याचं प्रसार भारती नमूद केलं आहे. काही माध्यमांमध्ये यासंदर्भात प्रसारित होत असलेल्या चुकीच्या बातम्यांचा संदर्भ देत प्रसार भारतीनं कालबाह्य झालेले नालॉग भूस्तरीय दुरचित्रवाणी प्रक्षेपक काढून टाकण्याच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. नालॉग टेरेस्ट्रीयल टीवी हे तंत्रज्ञान आता कालबाह्य झालं असून ते काढून टाकणं हे देशाच्या हिताचं आहे, त्याजागी आता फाईव जी सारख्या नवीन तंत्रज्ञानासाठी मौल्यवान स्पेक्ट्रम उपलब्ध होत आहेत तसंच विजेच्या वापरावरील अनावश्यक खर्चही कमी होत असल्याचं प्रसार भारतीनं म्हटलं आहे. आतापर्यंत देशातील ७० टक्के ऍनालॉग प्रक्षेपक काढून टाकण्यात आले आहेत.

***

दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक एक देगांव-येळेगाव लक्ष्मीनगर तसंच हिंगोली जिल्ह्याच्या डोंगरकडा  इथल्या युनिट क्रमांक दोनच्या उसाची प्रतवारी लक्षात घेकिमान किफायतशीर दर- एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले असल्याचं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी सांगितलं. देगांव-येळेगाव लक्ष्मीनगर युनिटसाठी दोन हजार ४६४ रुपये तर डोंगरकडा युनिटसाठी दोन हजार ५६६ रुपये प्रतिटन एफआरपी दर निश्‍चित करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं तिडके यांनी सांगितलं.

***

नंदुरबार जिल्ह्यातल्या आयान मल्टी ट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाचं सुरु असेललं धाडसत्र काल रात्री उशीरा पुर्ण झालं. सत्तर तास चाललेल्या या कारवाईत सहा आयकर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकानं कार्यालयातील कागदपत्र आणि संगणकांची झाडाझडती घेतली आहे. संगणकाच्या हार्ड डिस्क देखील त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या असल्याची माहिती सूत्रानं दिली. मात्र याबाबत आयकर विभाग किंवा साखर कारखान्याकडून अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

***

जागतिक मानसिक आरोग्य दिन आज साजरा होत आहे. मानसिक आरोग्य आणि समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातोअसमान जगातलं मानसिक आरोग्य’सा या दिनाचा यंदाचा विषय आहे.

***

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या युट्युब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...