Sunday, 10 October 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 October 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

                 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 October 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑक्टोबर २०२१ सायंकाळी ६.१०

****

गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-१ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** देशात ऊर्जा निर्मिती केंद्रांसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध -केंद्रीय कोळसा मंत्रालयाचं स्पष्टीकरण

** राज्यातले १३ औष्णिक विद्युत संच कोळशाअभावी बंद - वीज महावितरण कंपनीची माहिती

** औरंगाबाद इथं एकाचा पाण्यात बुडून मृत्यू; नांदेड जिल्ह्यात दोघे वीज पडून ठार

आणि

** सिद्धेश्वर तसंच येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

****

देशातील ऊर्जा निर्मिती केंद्रांची गरज भागवू शकेल, एवढा पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय कोळसा मंत्रालयानं दिलं आहे. सध्या ऊर्जा प्रकल्पांकडे ७२ लाख टन इतका कोळसा साठा असून आणखी चार दिवसांसाठी तो पुरेसा आहे. आणि कोल इंडिया लिमिटेडकडे आणखी ४०० लाख टन कोळशाचा साठा असून त्याचा पुरवठा ऊर्जा केंद्रांना केला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

यावर्षी देशांतर्गत, कोळशापासून ऊर्जानिर्मितीत २४ टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्रालयानं सांगितलं आहे. सध्या देशातल्या सर्व औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना दररोज, साडे १८ लाख टन कोळसा लागतो. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने, कोळसा पुरवठ्यात अडचणी आल्या.

सीआयएल कडून वीजनिर्मिती कंपन्यांना दररोज १४ लाख टन कोळशाचा पुरवठा केला जातो. पाऊस कमी झाल्यानंतर लगेचच हा पुरवठा दररोज १५ लाख करण्यात आला असून लवकरच त्यात आणखी वाढ होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

दरम्यान, कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात महावितरण कंपनीला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतले १३ संच सद्य:स्थितीत बंद असल्याचं महावितरण कार्यालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. त्यामुळे तब्बल तीन हजार ३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाल्याचं म्हटलं आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत आणि अन्य स्त्रोतांकडून वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी आणि उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी दररोज सकाळी सहा ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

****

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने उद्या राज्यात बंद पुकारला आहे. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावं आणि शेतकरी विरोधी कायदे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया संदर्भात जागृती करावी, असं अवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. या संदर्भाने त्यांनी आज एक प्रसिद्धपत्रक जारी केलं आहे.

उद्याच्या या बंदमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, सर्व व्यापारी संघटना, सर्व अंगिकृत संघटना, सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं या बंदला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राजकीय बंदला व्यापारी महासंघाचा विरोध असल्याचं यापूर्वीच प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. लखीमपूरची घटना दुःखद आहे. मात्र, यापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे बंदला पाठिंबा देणार नाही, असं व्यापारी महासंघानं म्हटलं आहे. जर कोणी व्यापारी स्वेच्छेने बंद पाळणार असेल, तर त्याला महासंघाचा विरोध नसेल, असं व्यापारी महासंघानं स्पष्ट केलं आहे.

****

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, ही अपेक्षा रास्त असल्याचं, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल जिल्हानिहाय नुकसानाचा एका बैठकीत आढावा घेतला असून, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने ८० टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी आपण या बैठकीत मांडल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत याबाबत चर्चा होणार असून, पीक विमा आणि शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि राज्य मदत निधीतून मदत देण्याबाबत निर्णय येत्या आठवड्यात होणं अपेक्षित असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ लेणी धबधबच्या खालच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा आज बुडून मृत्यू झाला. आर्यन विजयप्रताप सहानी असं या युवकाचं नाव असून तो औरंगाबाद शहरातल्या विजय नगर गारखेडा परिसरातला रहिवासी होता. औरंगाबाद अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

****

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात वीज अंगावर कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. आष्टूर इथला एकोणीस वर्षीय युवक महिपती म्हैत्रे तर, रिसनगाव इथंल्या तीस वर्षीय बालाजी पवार अशी या दोघांची नावं आहेत.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित परिक्षेसाठी आज औरंगाबाद जिल्ह्यात ४७ उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यापरिक्षेसाठी १४ हजार ५०४ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. या परीक्षांमध्ये कॉपी, गैरप्रकाराचा प्रयत्न टाळण्यासाठी आयोगानं परिक्षार्थींची तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात सोडलं. कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्याचं उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळवलं आहे. या परीक्षेसाठी एक हजार ९८९ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

                                       ****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे १२ दरवाजे आज पुन्हा एकदा खुले करण्यात आले आहेत. या धरणातून १३ हजार ४०० घनफुट प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीपात्रात करण्यात येत आहे. गत वेळी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने माथा इथंल्या पुलावरून पाणी गेल्याने तब्बल ३० तास राज्य रस्ता वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आजही दोन दरवाजातून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. या प्रकल्पात खडकपूर्णा सिंचन प्रकल्पातून पाण्याची आवक सुरू असून, प्रकल्पात सद्य स्थितीत शंभर टक्के एवढा पाणीसाठा आहे.

****

जागतिक मानसिक आरोग्य दिन आज पाळला जात आहे. मानसिक आरोग्य आणि समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षी हा दिवस साजरा केला जातोअसमान जगातलं मानसिक आरोग्य’सा या दिनाचा यंदाचा विषय आहे. औरंगाबाद शहरातल्या मोतीकारंजा परिसरातल्या जीवन आधार बेघर निवारा गृहात औरंगाबाद महापालिका आणि जीवन आधार केंद्राच्या वतीनं एक कार्यक्रम घेण्यात आला. मनपा उपायुक्त सौरभ जोशी, जीवन आधार केंद्राचे संचालक डॉ. फारुख पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

 

//**************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...