Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात
१०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर
घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर आकारण्यात
येणारं सीमा शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
** देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८
पूर्णांक ७ शतांश टक्के
** कोरोना विषाणू संसर्ग तक्रार निवारणासाठी समित्यांची स्थापना
आणि
** राज्यात गाव तिथं म्हाडा संकल्प राबवणार- मंत्री जितेंद्र
आव्हाड यांची घोषणा
****
केंद्र सरकारनं पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर
आकारण्यात येणारं मूलभूत सीमा शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह त्यावर लावण्यात
येणारा कृषी अधिभार देखील रद्द केला जाणार आहे. हा निर्णय आजपासून येत्या ३१ मार्च
२०२२पर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत
या तेलाची आवक वाढेल आणि त्यायोगे तेलाच्या किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत
आतापर्यंत शह्याण्णव कोटी ८२ लाख २० हजार नऊशे
९७ लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्यात
आज दुपारी अडीच वाजेपर्यंत ३ लाख ९० हजारापेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या असून
लसीकरणाची एकूण संख्या ९ कोटी ४ लाखाहून अधिक झाली आहे. यापैकी २ कोटी ७७ लाखाहून अधिक
जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक
७ शतांश टक्के झाला आहे. काल एकोणवीस लाख ८०८ रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून आतापर्यंत
तीन कोटी तेहतीस लाख बासष्ट हजार ७०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात काल अठरा
हजार ९८७ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात या संसर्गाचे २ लाख ७ हजार ६५३ रुग्ण उपचार
घेत आहेत.
****
कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन
प्रतिसाद निधीतून ५० हजार रुपये मदत निधी देण्या संबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार
तसंच या संदर्भातल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य शासनानं तक्रार निवारण समितीची
स्थापना केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी
ही माहिती दिली आहे. महापालिका क्षेत्रासाठी एक आणि बाहेरील क्षेत्रासाठी एक अशा दोन
समिती यात असतील. अर्ज केल्यानंतर मदत निधी मिळाला नाही तर मृत व्यक्तींचे नातेवाईक
समितीकडे दाद मागू शकतील. तसंच समिती मृत व्यक्तीवर करण्यात आलेल्या उपचाराच्या कागदपत्रांची
तपासणी करून तीस दिवसांत या संदर्भातला निर्णय घेईल असंही डॉ. व्यास यांनी सांगितलं.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलचे
दर ३५ पैशांनी वाढले. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल १०४ रुपये एकोणऐंशी पैसे लिटर
आणि डिझेल ९३ रुपये चोपन्न पैसे लीटर दरानं विकलं जात आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत
११० रुपये ७५ पैसे लीटर, तर डिझेलची किंमत १०१ रुपये ४० पैसे लिटर झाली आहे.
****
प्रत्येकाच्या घराचं स्वप्न साकार करणं गरजेचं आहे त्यामुळेच
आता गाव तिथं म्हाडा ही संकल्पना राबविली जाणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र
आव्हाड यांनी केली आहे. यासंबधीचा कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचंही त्यांनी
आज ठाणे इथं सांगितलं. म्हाडाच्या सुमारे नऊ हजार घरांची सोडत ठाणे इथं काढण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते. म्हाडांच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आणि त्या दृष्टीनं
हे म्हाडा समोर आव्हान असल्याचंही आव्हाड यावेळी सांगितलं.
****
पासष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर
बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचं ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते
करण्यात आलं. यावेळी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, आणि इतर पदाधिकारी, सदस्य,
प्रमुख कार्यकर्ते उपस्थिती होते. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन
दिनानिमित्त मुख्य समारंभ नसला तरी आज आणि उद्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या
सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेनं सर्व तयारी पूर्ण केली आहे.
****
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवी मंदिराला
तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री
सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून चारशे वर्ष जुनी
परंपरा आहे. नवरात्रोत्सवात दहा दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते, याकाळात राज्यातूनच
नव्हे तर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शहराच्या वैभवात भर
घालणाऱ्या या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी केली
आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या `कवच कुंडल`
मोहिमेमध्ये उस्मानाबाद इथं राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानानं सक्रिय सहभाग घेतला
असून या अंतर्गत मिशन कवचकुंडल आद्या या मोहिमेचा प्रारंभ आज करण्यात आला. स्वयंसहाय्यता
गटातल्या महिलांच्या कुटुंबांचं शंभर टक्के लसीकरण व्हावं हा उद्देश समोर ठेवून ही
मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून संसर्गापासून
स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आणि गटातल्या प्रत्येक महिलेनं सक्रिय
सहभाग घेऊन आपलं कुटुंब कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्य कार्यकारी
अधिकारी राहुल गुप्ता यांनी या निमित्त केलं आहे.
****
परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या
वाढदिवसानिमित्त शिवसेना युवा सेनेच्या वतीनं आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात
आलं. या महारक्तदान शिबिरात एक हजार युवक आणि महिलांनी रक्तदान केलं.
//********//
No comments:
Post a Comment