Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात
१०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर
घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी ९७
कोटी ६५ लाखांहून अधिक लस मात्रांचं वितरण
** कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८पूर्णांक
एक दशांश टक्के
** भारतीय जनता पक्षाचे नेते खतगांवकर, पोकर्णा
यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आणि
** हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर, परभणी
जिल्ह्यात निम्न दूधना धरणाची दारं उघडली
****
देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या
९७ कोटी ६५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. काल ४१ लाख
२० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं या अंतर्गत लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
सांगितलं.
महाराष्ट्रात काल ४ हजार १६० लसीकरण सत्रांच्या
माध्यमातून ५ लाख १७ हजार ८५० नागरिकांना लस दिल्याचंही आरोग्य विभागानं कळवलं आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ९ कोटी १३ लाख ५ हजार ३६५ मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या
आहेत.
****
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर
९८ पूर्णांक १ दशांश टक्के झाला आहे. काल १९ हजार सातशे पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त
झाले आहेत. आतापर्यंत ३ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
काल १४ हजार १४६ नवे रुग्ण आढळले. देशभरात सध्या एक लाख ९५ हजार ८४६ सक्रीय रुग्ण असून
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
केंद्रसरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना
आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०१ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मात्रा पुरवल्या
आहेत. त्यापैकी अद्याप न वापरलेल्या १० कोटी ४२ लाखापेक्षा जास्त मात्रा राज्यांकडे
उपलब्ध आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण अमेरिकेच्या
दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्याअंतर्गत जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांची
भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी यावेळी भारतातल्या कोविड लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली.
मालपास यांनी कोविड लसीच्या उत्पादन आणि वितरणातल्या जागतिक भूमिकेबद्दलही भारताचे
आभार मानलं. या बैठकीत सीतारामन आणि मालपास यांनी हवामान बदलावर भारतानं केलेल्या प्रयत्नांवर
चर्चा केली.
****
नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे
नेते, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस प्रवेशाची
घोषणा केली आहे. खतगावकर हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि राज्याचे मंत्री देखील
राहिले आहेत. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी नगरसेवक सरजितसिंघ गील यांच्यासह भारतीय
जनता पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. देगलूर
विधानसभा मतदार संघातल्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या
मानल्या जात आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या
घोषणेचं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केलं आहे. त्यांच्यामुळे
नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातल्या पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल,
याचा आपल्याला विश्वास आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
जागतिक दारिद्र्य निर्मूनल दिन आज पाळण्यात
येत आहे. गरीबी हे हिंसेचं सर्वात विकृत रुप आहे, असं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं,
याचं स्मरण उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या दिनानिमित्त केलं आहे. जागतिक
गरीबी निर्मूलन दिनानिमित्त सर्वांच्या जीविकेसाठी स्थायी स्रोत उपलब्ध करण्यासाठी
एकत्रित प्रयत्न करूया असं आवाहन उपराष्ट्रपतींनी या संदर्भातल्या आपल्या संदेशाद्वारे
केलं आहे.
****
केंद्र सरकारनं, २०१४ सालापासून आजपर्यंत
१५७ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं दिली आहे. या नव्या
महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारनं १७ हजार
६९१ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केल्याचंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात
माहितीच्या अधिकाराअंतर्गत
विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना आरोग्य
मंत्रालयानं ही माहिती दिली. या सर्व नव्या महाविद्यालयांना केंद्र सरकार पुरस्कृत
योजनेअंतर्गत मान्यता दिली असल्याचं आरोग्य
मंत्रालयानं उत्तरातून कळवलं आहे.
****
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या
गट 'क' संवर्गातल्या पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा
स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असल्याचं आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी
म्हटलं आहे. उमेदवारानं अर्ज केलेलं पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतं
त्याच विभागातल्या जिल्ह्यात उमेदवारांना परीक्षा केंद्र दिलं गेलं आहे, असं स्पष्टीकरणही
त्यांनी या संदर्भातल्या तक्रारींवरनं केलं आहे. गट `क` संवर्गातल्या पदभरतीसाठी २४
ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव, हिमायतनगर,
बिलोली, मुखेड, कंधार, अर्धापूर, ऊमरी, धर्माबाद, नायगाव, किनवट या तालुक्यांत काल
रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तळणी, मनाठा, निवघा, आष्टी, तामसा, पिंपरखेड
कोंडलवाडी या सात महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हदगाव तालुक्यात कापुस पिकाचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात गेल्या
चोविस तासांत अतिवृष्टी झाल्यानं कयाधू नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यात शेतात
बांधून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेल्याचं वृत्त आहे. दरम्यान, तालुक्यातल्या डोंगरगाव
इथं मासेमारी करायला नदीत उतरलेला एक मजूर पुराच्या पाण्यात सुमारे पाच किलोमीटर वाहून
गेल्यानंतर शेवाळा गावाजवळ काही तरुणांनी त्याला वाचवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या
निम्न दूधना सिंचन प्रकल्पाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे
पाटबंधारे खात्यानं या जलाशयाची सहा दारं उघडून दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग
सुरू केला आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत
होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आज धरणाचे आठ दरवाजे आर्धा फुटांनी बंद
करण्यात आले आहेत. चार हजार एकशे ब्याण्णव घनफुट प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग कमी करण्यात
आला असून, आता ५ हजार २४० घनफुट प्रतीसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.
नदी काठच्या नागरिकांनी या संदर्भात सतर्क राहून सहकार्य करावं, असं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment