Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 04 October 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२१
सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना
आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी
करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या
तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· कोविडमुळे गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा सुरू; सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचं स्वागत.
· निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या मुद्द्यांवर त्वरित तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
· राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नीट रद्द करून नव्याने घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
आणि
· अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मराठवाड्याला केंद्र सरकारकडून शक्य ती मदत करणार - केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचं आश्वासन.
****
कोविड पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा जवळपास दीड वर्षानंतर आजपासून सुरू झाल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी, तर शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग, प्रत्यक्ष सुरु झाले.
औरंगाबाद शहरातील आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या ४१३ शाळा आज सुरु झाल्या. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे आणि कोविड -१९ चे नियम पाळत सुरक्षेची संपूर्ण काळजी शाळांमध्ये घेण्यात आली. सुरक्षित अंतर ठेवून एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात आला होता. शहरातल्या मयुरबन कॉलनी इथल्या महानगर पालिकेच्या शाळेत तुतारी अन् ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्याचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा शाळेची गोडी निर्माण करण्यासाठी प्रवेशद्वारावर शिक्षिकांनी मुलांचं औक्षण करून स्वागत केलं.
जालना जिल्ह्यातल्या दोन हजार ४०० शाळा कोविड नियमांचे पालन करत आजपासून सुरु झाल्या. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये येताना विद्यार्थ्यांच्या उत्साह दिसून आला. अनेक शाळांममध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात टोकवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि शुभेच्छा दिल्या. पुन्हा नव्यानं शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना मुंडे यांनी यावेळी दिल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व विदयार्थी, शिक्षक यांच्याशी आज संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या बोधचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं.
यावेळी बोलतांना ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शाळांनी सर्व नियमांचं पालन करण्याची सूचना केली. एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल मार्ड संघटनेनं समाधान व्यक्त केलं. कोविड काळात निवासी डॉक्टरांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करावं, पालिकेच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमधून जीएसटी कपात बंद करावी, या मागण्यांसाठी मार्डने संप पुकारला आहे. या संपाचा आज चौथा दिवस आहे. जोपर्यंत या मागण्यांविषयी योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं औरंगाबाद इथल्या आंदोलक डॉक्टरांनी सांगितलं.
****
आरोग्य विभागाकडून जालना जिल्ह्यासाठी प्राप्त २३ रुग्णवाहिकांचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. १०२ क्रमांकाच्या या नवीन रुग्णवाहिकांचा वापर गर्भवतींना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात सेवा देण्यासाठी मोफत केला जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना यापूर्वी २० रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याची माहिती टोपे यांनी दिली.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी १२ सप्टेंबर रोजी घेतलेली राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नीट रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या परीक्षेत गोंधळ झाला असून फसणूक, प्रश्न पत्रिका फुटणे यासारख्या गोष्टींचा हवाला देत परीक्षा नव्याने घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र देशात सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असताना, परीक्षेच्या विरोधात फक्त पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत, हे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचं निरीक्षण नोंदवत, अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयानं नमूद केलं.
****
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या शेतीचं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारकडून शक्य ती मदत करण्याचं आश्वासन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. डॉ. कराड यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन खासदार पाटील यांनी या मागणीचं निवेदन त्यांना सादर केलं.
****
परभणी शहरासह परिसरात आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांची बाजारात धावपळ झाली. या पावसाने खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाचे अठरा दरवाजे एका फुटाने उघडून सुमारे १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या वसमत रस्त्यावर खानापूर नगर इथल्या महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या असुविधांच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी आज सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले. महानगरपालिकेच्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य अधिकारी फिरकले नाहीत. कर्मचारीवर्गसुद्धा हजेरी लावत नाही. त्यामुळे या परिसरातल्या सर्वसामान्य नागरिकांना या आरोग्य केंद्राचा कोणताही लाभ मिळत नाही.
****
केंद्र सरकारनं तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तरप्रदेशात लागलेलं हिंसक वळण आणि त्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज नांदेड शहरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर आणि इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
****
हिंगोली जिल्ह्यात सातत्याने बसत असलेले भूकंपाचे धक्के आणि भूगर्भातील हालचाली या संबंधाने जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजना आणि जनजागृतीबाबत मार्गदर्शन सुरू केलं आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा, एडशी इथं आज भूकंप आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली.
//************//
No comments:
Post a Comment