Wednesday, 6 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य शासनानं तत्काळ विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. त्यांनी आज औरंगाबाद इथं संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात केंद्र सरकारकडून ही मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं कराड यांनी सांगितलं.

****

राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषद आणि ३८ पंचायत समित्यांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी, काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे.

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या सर्व सहा गणात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण १४ जागांपैकी सात जागांचे निकाल घोषित झाले आहेत. त्यापैकी कॉंग्रेसनं दोन, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनविकास, वंचित बहुजन आघाडीनं प्रत्येकी एक, तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली आहे.

****

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातली धार्मिक स्थळं, आणि प्रार्थना स्थळं उद्यापासून दर्शनाकरता खुली करण्यात येणार आहेत.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात दररोज १० हजार भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे, तसंच कोरोना चाचणी सक्तीची नसून सर्वांची रांगेमध्ये आरोग्य तपासणी आणि ओळखपत्राची पडताळणी होणार आहे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज १५ हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. यात पाच हजार ऑनलाईन, पाच हजार सशुल्क पास आणि पाच हजार भक्तांना शिर्डीत ऑफलाईन मोफत दर्शन पास मिळणार आहेत.

****

दूरदर्शनवरील रामायण मालिकेत रावणाची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद त्रिवेदी यांचं आज निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. ते विक्रम आणि वेताळसाठी देखील ओळखले गेले. त्रिवेदी यांनी हिंदी आणि गुजराती चित्रपटांसह सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ९२ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ५९ लाख ४८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या ९२ कोटी १७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ८३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ३८ लाख ७२ हजार ६८१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ४९ हजार ५३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २४ हजार ७७० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३१ लाख ७५ हजार ६५६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ४६ हजार ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

जुनी वाहनं मोडीत काढण्याच्या धोरणाशी संबंधित प्रोत्साहनाबाबत एक अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं जारी केली आहे. देखभालीचा आणि इंधनाचा अधिक खर्च येत असलेली वाहनं मोडीत काढण्यासाठी एक यंत्रणा या धोरणामध्ये राबवण्यात येणार आहे. एक एप्रिल २०२२ पासून १५ वर्षे जुन्या कारचा परवाना नवीन करण्यासाठी पाच हजार, तर नव्या वाहनाच्या नोंदणीचं शुल्क ६०० रुपये राहील, असं मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

देशातली वीजेची मागणी यावर्षी ऑगस्टपासून वाढत असल्याचं केंद्रीय वीज मंत्रालयानं म्हटलं आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये १२४ बिलियन युनिट वीज वापरली गेली, तर कोविड कालावधीच्या पूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये, १०६ बिलियन युनिट म्हणजेच १८ ते २० टक्के अधिक वीज वापरली गेली. वीजेच्या मागणीत वाढ होत आहे याचा अर्थ, अर्थव्यवस्था वाढत असल्याचं चिन्ह आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

राज्य शासनातल्या विविध विभागांमधल्या विविध संवर्गातली एकूण २९० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगानं काल राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली.  येत्या दोन जानेवारीला राज्यभरातल्या ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी २५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. हा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जाणार असून, तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

****

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक पदांसाठी ३० ऑक्टोबर ला होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे. या पदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालांसंदर्भात, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं दिलेल्या अंतिम आदेशानुसार, परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, मुख्य परीक्षेची सुधारीत तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार असल्याचंही, या निवेदनात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे, रात्री उघडण्यात आलेले नऊ आपत्कालीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या धरणाच्या १८ दरवाजातून ६६ हजार २४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...