Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 October 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३
ऑक्टोबर
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशातील १०० कोटी जनतेला कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच
पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतर सर्वांना आकाशवाणी सलाम
करते. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित
अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-19ची लक्षणं आढळली तर लगेच
विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य
स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
नागरी
भागातील स्वच्छ भारत अभियान तसंच अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या शंभर शाळा
सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न करण्यासही मान्यता
·
राज्यात कुठेही भारनियमन नाही, वीज
उत्पादन वाढवण्यासाठी नियोजन केलं जात असल्याची ऊर्जा मंत्री
डॉ.नितीन राऊत यांची माहिती
·
येत्या २२ ऑक्टोबरपासून
राज्यातली चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार, मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करता येणार
·
राज्यात दोन हजार एकोणसत्तर नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात
तीन जणांचा मृत्यू तर ८० बाधित
आणि
·
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत इतर
मागास प्रवर्गीयांना पुन्हा धोका दिल्यास, मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा इशारा
****
स्वच्छ
भारत अभियान - शहरी चा दुसरा टप्पा २०२५-२६ पर्यंत सुरु ठेवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल
ही बैठक झाली. अभियानाच्या आधीच्या टप्पात साध्य करण्यात आलेलं उघड्यावर शौचाच्या प्रथेपासून
मुक्ती मिळवण्याचं उद्दिष्ट कायम राखणं, सर्व
शहरात घनकचरा व्यवस्थापनाची शास्त्रशुद्ध प्रक्रिया राबवणं आणि एक लाखपेक्षा कमी लोकसंख्या
असलेल्या शहरात सांडपाण्याची व्यवस्था सुरळीत करणं, आदी कामं या अभियानाअंतर्गत करण्यात
येणार आहेत. यासाठी एक लाख ४१ हजार ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वर्ष
२०१५-२६ पर्यंतच्या अमृत दोन, अर्थात अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियान अंमलबजावणीलाही
केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. चक्राकार अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशातील
शहरांना जलसुरक्षित आणि स्व-शाश्वत करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरु करण्यात येणार
आहे. सर्व घरांना नळ जोडणी देणं, जलस्त्रोतांचं
जतन - संवर्धन करणं, जलपुनर्भरण, जलप्रक्रिया, आदी उपक्रम या योजनेअंतर्गत राबवण्यात
येणार आहेत. या योजनेसाठी येत्या पाच वर्षांत एकूण दोन लाख ७७ हजार कोटी रुपये अंदाजित
खर्च येणार असून, त्यापैकी ७६ हजार ७६० कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जातील.
सरकारी
आणि खाजगी क्षेत्रातल्या शंभर शाळा सैनिक शाळा सोसायटीशी संलग्न करण्यासही मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. या शाळा विशिष्ट स्तंभ म्हणून काम करणार असून, संरक्षण मंत्रालयाच्या
सध्याच्या सैनिक शाळांपेक्षा या शाळा भिन्न असतील.
****
राज्यात कुठेही भारनियमन केलं जात नसून, वीज
उत्पादन वाढवण्यासाठी योग्य नियोजन केलं जात असल्याची माहिती, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन
राऊत यांनी दिली आहे. राज्यातली कोळसा टंचाई आणि
त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट या विषयावर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. कोळसा टंचाईमुळे राज्यातली वीज निर्मिती
कमी झाली असून, गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने
वीज खरेदी करून, ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात असल्याचं ते
म्हणाले. राज्यात मागणीच्या तुलनेत तीन हजार
मेगावॅट वीजेची कमतरता जाणवत आहे. ही टंचाईची परिस्थिती
लक्षात घेता सकाळी तसंच संध्याकाळी सहा
ते १० या कालावधीत नागरिकांनी विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर
करून सहकार्य करावं, असं आवाहन, राऊत
यांनी केलं आहे.
****
येत्या
२२ तारखेपासून राज्यातली चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार आहेत. त्याबरोबरच बंदिस्त
सभागृह आणि मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करता येणार आहेत. यासाठीचे दिशानिर्देश
राज्य सरकारनं काल जारी केले. ५० टक्के आसन क्षमतेनं या ठिकाणी, चित्रपट, नाटकं आणि
इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता येणार आहेत. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातली स्थळं
पूर्णपणे बंद असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कार्यक्रम सादर करताना कोविड संदर्भातल्या
केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणत्याही निर्बंधाचा भंग होणार नाही, याची काळजी घेणं
आवश्यक आहे.
****
केंद्रीय
हवाई वाहतूक मंत्रालयानं सोमवारपासून सर्व विमान कंपन्यांना पूर्ण क्षमतेनं प्रवासी
वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. सध्याची प्रवासी वाहतुकीची परिस्थिती आणि प्रवाशांकडून
आलेली मागणी याचा आढावा घेतल्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला.
****
राज्यात काल दोन हजार ६९ नवे कोरोना
विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या
६५ लाख ८१ हजार, ६७७ झाली आहे. काल ४३
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ६२१ झाली
असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार ६१६ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६४ लाख सात हजार ९३६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे.
राज्यात सध्या ३० हजार ५२५ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ८० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल २२ नवे रुग्ण आढळले,
बीड जिल्ह्यात २०, लातूर १५, उस्मानाबद १४, जालना सहा, परभणी
दोन, तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल
कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना
राज्य शासनानं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठोस मदत जाहीर केली नाही, तर उद्यापासून जिल्ह्यात
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, शेतकऱ्यांना मदत देता की जाता? हे आंदोलन करण्यात येणार
आहे. आमदार राणा राणाजगजितसिंह पाटील यांनी काल हा इशारा दिला. जिल्ह्यातल्या १२ हजार
हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान होऊन, चार लाख ५५ हजार शेतकऱ्यांना आर्थिक फटका
बसला आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग - ओबीसीला परत धोका दिल्यास, मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा
इशारा, भारतीय जनता पक्षाच्या
राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या काल औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी
जागरण अभियान मराठवाडा विभागीय मेळाव्यात बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारनं यासंदर्भातला
अध्यादेश लवकर काढायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या...
‘‘आज ओबीसी वेगवेगळ्या फ्रटनी रस्तयावर उतरलेला
आहे. मग अशा वेळेस त्यांनी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. हा अध्यादेश आधी काढला
असता तर या ज्या निवडणुका आता लागल्याय त्या निवडणुकामध्ये लागू झाला असता की नाही.
आता त्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं आरक्षण लागू नाही मग पुढच्या निवडणुकांमध्ये लोक
कोर्ट कचेऱ्या करतील की नाही ? हा अध्यादेश टीकवून धरुन कोर्टामध्ये बाजू मांडून, येणाऱ्या
निवडणुकीत परत ओबीसीला धोका देण्याचं तुमचं कुठलं षडयंत्र असेल तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर
फिरु देणार नाही. हे आम्ही आता सांगतोय’’
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्यासह
मराठवाड्यातले भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते या
मेळाव्यात उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारच्या
काळात मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात आल्याचं आरोप कराड
तसंच बागडे यांनी यावेळी केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय
वरपूडकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतल्या
प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ज्येष्ठ
नेत्यांनी या सर्वांचं स्वागत केलं.
****
औरंगाबाद
शहराजवळील जडगाव इथल्या बंधाऱ्यात काल एक चारचाकी गाडी बुडल्यानं तीन जणांचा मृत्यू
झाला. औरंगाबाद अग्निशमन दलाच्या पथकानं रात्री उशीरा तिघांचे मृतदेह बाहेर काढले.
वैजनाथ चौधरी, मंगल चौधरी आणि सुकन्या चौधरी, अशी मृतांची नावं असून, ते औरंगाबाद इथले
रहीवाशी होते.
****
सातारा
इथल्या हिरकणी रायडर ग्रुपच्या शुभांगी पवार यांचा नांदेडजवळ अर्धापूर तालुक्यातल्या
भोकरफाटा इथं काल टँकरच्या धडकेत मृत्यू झाला, त्या ३२ वर्षांच्या होत्या. हिरकणी गटाच्या
नऊ महिला सदस्य राज्यातल्या साडे तीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी एक हजार ८६८ किलोमीटरच्या
प्रवासासाठी निघाल्या होत्या. कोल्हापुरात अंबाबाई आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या
दर्शनानंतर माहूर गडावरील रेणुकामातेच्या दर्शनासाठी या सर्वजणी जात असताना, हा अपघात
झाला.
****
वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. मधुकर राठोड यांचं काल हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ५८ वर्षांचे होते.
मूळचे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातले असलेले राठोड यांनी, अनेक वर्ष जालना
इथं वैद्यकीय सेवा दिली.
****
शारदीय
नवरात्र महोत्सवात काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवीची
भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म
रक्षणासाठी तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन
भवानी तलवार दिल्याचं सांगितलं जातं. तो प्रसंग सजीव करण्यासाठी ही पूजा मांडण्यात
येते. आज तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.
****
कवच कुंडल अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात गेल्या आठ ऑक्टोबरपासून
आजपर्यंत ४९ हजार ५०४ नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यात आली. १४ तारखेपर्यंत
चालणाऱ्या या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं असं आवाहन, जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी.यांनी केलं आहे.
****
परभणी
इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे अतिरिक्त असलेली अडीच हजार हेक्टर
शेत जमीन, शेतकऱ्यांना परत देण्यात यावी अशी मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने
करण्यात आली आहे. या मागणीचं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर करण्यात आलं.
****
नैऋत्य
मौसमी पावसानं राज्याच्या निम्म्या भागातून परतीचा प्रवास पूर्ण केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य भागातून नैऋत्य मौसमी
पासून निघून गेल्यांचं हवामान विभागानं कळवलं आहे.
दरम्यान, येत्या ४८ तासांत मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, विभागात तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment