Friday, 15 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 15.10.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 October 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १५ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

आज देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये पारदर्शकता, आणि तंत्रज्ञान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सात नव्या संरक्षण कंपन्या देशाला समर्पित केल्यानंतर ते आज बोलत होते. कंपन्या भारताची ताकत बनतील असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. या कंपन्यांमुळे संरक्षण तयारीबाबत आत्मनिर्भर होण्याबरोबरच कार्यात्मक स्वायत्तता, कार्यक्षमता, नवीन कल्पना आणि वाढीसाठी मदत होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ आणि वरणगाव इथल्या आयुध निर्माणीचाही समावेश करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यावेळी उपस्थित होते.

****

विजयादशमीचा सण आज साजरा होत आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शस्त्रपूजन, सरस्वती पूजनासह पारंपारिक पद्धतीनं हा दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाचा दसरा आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरचं कोरोनाचं संकट तसंच समाजातलं अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

सर्व समाजघटकांना लागू होणारं लोकसंख्या धोरण देशासाठी अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लोकसंख्या असमतोल देशाच्या विकासात समस्या निर्माण करू शकते. देशामध्ये अवैध घुसखोरांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी तयार करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतले इस्त्राईलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही यावेळी उपस्थित होते.

****

नागपूरच्या दीक्षाभूमी वर आज ५६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बुद्धवंदना केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभुमीला भेट दिली. नवी दिल्ली इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, तसंच २६ अलीपूर रोड इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय स्थापन करून आंबेडकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

****

कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशानं ९७ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात ३० लाख २६ हजार ४८३ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ९७ कोटी १४ लाख ३८ हजार ५५३ मात्रा देण्यात आल्या आहेत.  राज्यात आतापर्यंत नऊ कोटी सहा लाख ३९ हजारापेक्षा जास्त नागरीकांना लस देण्यात आली आहे.  दरम्यान, देशात काल नव्या १६ हजार ८६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, तीन कोटी ४० लाख ३७ हजार ५९२ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, चार लाख ५१ हजार ८१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १९ हजार ३९१ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी ३३ लाख ८२ हजार १०० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख तीन हजार ६७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातल्या भट्टा धुरियन भागामध्ये काल संध्याकाळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सैन्य दलाच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह दोन सैनिक हुतात्मा झाले. या ठिकाणची चकमक अद्याप सुरू आहे.

****

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या १७ जिल्ह्यांमधले सर्व तालुके आणि उर्वरित महाराष्ट्रातले अवर्षणप्रवण तालुके, अशा एकंदर २४४ तालुक्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये आता राज्याच्या उर्वरित सर्व १०६ तालुक्यांचा समावेश केला असल्याची माहिती, कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी ८० टक्के अनुदान; तर इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान दिलं जाईल.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज दुबईत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकत्ता नाईट रायडर्स संघां दरम्यान होत आहे. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघानं आतापर्यंत तीन वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं असून कोलकत्ता नाईट रायडर्स संघानंही दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...