Wednesday, 1 December 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यातील प्राथमिक शाळा आजपासून सुरू, मात्र औरंगाबाद, नाशिक, नागपूर, मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात शाळा बंदच राहणार.

·      नांदेड जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय

·      बारा खासदारांच्या निलंबनावरुन संसदेचं कामकाज काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही बाधित

·      देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

·      मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याचं आश्वासन, महाविकास आघाडी सरकारकडून पूर्ण

·      राज्यात ६७८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ३६ बाधित

आणि

·      औरंगाबाद शहरातले जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं निधन

****

राज्य सरकारनं प्राथमिक शाळा आजपासून सुरू करायला परवानगी दिली आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू होत आहे, मात्र काही प्रमुख शहरांमध्ये शाळा आजपासून सुरू होणार नाहीत. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाची भिती, तयारीचा अभाव ही कारणं देत शहरी भागात पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात, १५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर महापालिकेनंही १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे. र नांदेड जिल्ह्यात १३ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निणर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.

उस्मानाबाद, बीड आणि सातारा जिल्ह्यात मात्र आजपासून शाळांमधले वर्ग सुरू होणार आहेत. राज्यातल्या निवासी आश्रमशाळा सुद्धा आजपासून सुरू होणार आहेत.

****

बारा खासदारांच्या निलंबनावरुन संसदेचं कामकाज काल अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसीही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, खासदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कामकाजावर बहिष्कार घातला. गदारोळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेतली, तसंच यापुढे लोकसभेचं कामकाज सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, या गदारोळातच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वेतन आणि सेवा शर्ती सुधारणा विधेयक २०२१, आणि सहायक पुर्नप्रजनन तंत्रज्ञान नियमन विधेयक २०२० लोकसभेत सादर करण्यात आलं.

राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेली मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. या मुद्यावरुन गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, निलंबित केलेल्या १२ विरोधी पक्ष सदस्यांनी त्यांच्या सभागृहातल्या वर्तनाबद्दल माफी मागितली तरच त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं आहे.

****

वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं, केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत सांगितलं. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेत असल्याचं राय यांनी सांगितलं.

****

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. ते काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. कोविड काळात आपण अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत, प्रयोगशाळाही उभारल्या आहेत. हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात असून, संशयित रुग्णांचं जिनोम सिक्वेंसिंग केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, ओमायक्रॉन च्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी, सगळ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करावी, अशा सूचना केंद्र शासनानं दिल्या आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य शासनांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं आहे. या प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवरही कडक निगराणी आवश्यक असून, संक्रमण झाल्याचं स्पष्ट झाल्यास, तातडीनं नामांकित जीनोम सिक्वन्सिंग प्रयोग शाळांमध्ये, त्यांच्या लाळेचे नमुने पाठवावेत, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. राज्य समन्वय अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या या प्रयोगशाळांशी समन्वय साधून, जिनोमिक विश्लेषणाचे निष्कर्ष तातडीनं मंत्रालयात पाठवावेत असं ही या पत्रात नमूद केलं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याचं आश्वासन, महाविकास आघाडी सरकारनं पूर्ण केलं आहे. राज्यात १० जिल्ह्यांमधले ३४ जण या आंदोलनात मृत्यूमुखी पडले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातले सहा, बीड ११, लातूर चार, पुणे आणि जालना जिल्ह्यातले प्रत्येकी तीन, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातले प्रत्येकी दोन, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. या सर्व कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रूपये मदत देण्याचं आश्वासन यापूर्वीच्या सरकारनं दिलं होतं. प्रत्यक्षात मात्र १५ कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये एवढीच मदत देण्यात आली होती. आता महाविकास आघाडी सरकारनं या १५ कुटुंबियांना उर्वरीत पाच लाख रूपये, आणि अन्य १९ कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्यासाठी, दोन कोटी ६५ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केले आहे.

****

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत एक हजार ५८४ पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

वर्ग एक ते वर्ग चार मधल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबतची आढावा बैठक काल घेण्यात आली. राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून, शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळेच ही मोठी पदभरती करणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.

****

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी राजकीय तसंच अन्य विषयांवर चर्चा झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणार नाहीत, अशी भावना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली असल्याचं, संजय राऊत यांनी सांगितलं.

बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

****

ज्येष्ठ सनदी अधिकारी देवाशिष चक्रवर्ती यांनी काल सीताराम कुंटे यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा अतिरीक्त कार्यभार स्वीकारला. कुंटे सेवानिवृत्त झाल्यामुळे पुढील आदेशापर्यंत चक्रवर्ती यांच्याकडे हा कार्यभार देण्यात आला आहे. कुंटे यापुढे मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार म्हणून कार्यरत राहतील.

****

राज्यात काल ६७८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३ हजार, ६५८ झाली आहे. काल ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४० हजार ९९७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ९४२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ८ हजार ४३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ३६ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद आठ, बीड सात, जालना सहा, उस्मानाबाद चार, तर नांदेड जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविडचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

येत्या सहा डिसेंबर - महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मुंबईत कोविडचं सावट असल्यानं चैत्यभूमीवर जमा होण्यास आणि जाहीर कार्यक्रम घेण्यास राज्य शासनानं निर्बंध घातले आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घरी राहूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकावर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या नेतेमंडळी आणि मान्यवरांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेलं असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जर जवळ लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असं यामार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद शहरातले जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड विधिज्ञ मनोहर टाकसाळ यांचं काल निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनेक वर्षे राज्य सचिव तर काही काळ राष्ट्रीय परिषदेचे ते सदस्य होते. दलित अत्याचार विरोधी संघर्ष समिती तसंच महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. भारतीय खेत मजदूर युनियनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्यांनी काही काळ काम केलं. आज सकाळी कॉम्रेड टाकसाळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात धार्मिक स्थळं आणि प्रार्थना स्थळांवर ज्येष्ठ नागरिक  आणि गरोदर महिलांना परवानगी देण्यात आली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या  अटीच्या अधिन राहून ही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शासकीय कार्यालयात आणि परीसरात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. या उपाय योजनांची जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पामल्ली करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

परभणी शहरातल्या गांधी पार्क, वसमत रोड, काळी कमान दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि पेट्रोलपंप आदी ठिकाणी जिल्हाधिकारी आंचल गोयल तसंच महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी काल सकाळी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येकाची लसीकरण प्रमाणपत्रांची तपासणी केली.

दरम्यान, शहरात सर्व पेट्रोलपंपावर लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. आजपासून कोविड लस न घेतलेल्यांना पेट्रोल पंपावर प्रवेश नाकारण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातही ५ डिसेंबरनंतर लसीकरणाचे पुरावे सादर केल्याशिवाय धान्य न देण्याचे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

No comments: