आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. सांगली जिल्ह्यात रात्रीपासून
पाऊस सुरू आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. पालघर
जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.
मुंबई उपनगरातही पाऊस पडत आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण असून, थंडीचा कडाका वाढला आहे.
****
नोव्हेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून एकंदर एक लाख ३१
हजार ५२६ कोटी रूपयांचा महसूल संकलित झाला आहे. त्यापैकी सी जी एस टी म्हणजेच केंद्रीय
वस्तू आणि सेवा करापोटी २३ हजार ९७८ कोटी, तर एस जी एस टी म्हणजेच राज्य वस्तू आणि
सेवा करापोटी ३१ हजार १२७ कोटी रूपये जमा झाले आहेत. राज्यात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर
महिन्याच्या तुलनेत यावर्षी जी एस टी संकलनात २४ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी, धुंदलवाडी परिसरात काल दुपारी भूकंपाचे
दोन धक्के बसले. पहिला धक्का चार रिश्टर स्केल आणि दुसरा धक्का तीन पूर्णांक नऊ दशांश
रिश्टर स्केलवर होता. या दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किलोमीटर
खोलवर होता.
****
पीक विमा आणि अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा करण्याची
मागणी, भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम आणि शेतकरी संघटनेचे
जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पिक विम्याचे
कोट्यवधी रूपयांचं येणं असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार जवळील पूर्णा कालव्याच्या पूलावर दोन मोटरसायकल
आणि एक ट्रॅक्टर यांचा विचित्र अपघात होऊन, एकजण ठार तर तिघे जण जखमी झाले. काल दुपारी
हा अपघात झाला. हा अपघात अरुंद पुलावर झाल्यानं या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती.
****
ओडिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या विश्वचषक कनिष्ठ गट हॉकी स्पर्धेत
उपांत्य पूर्व लढतीत काल भारतीय संघानं बेल्जियमला एक - शून्यनं नमवत उपांत्य फेरीत
धडक मारली. एस एन तिवारीनं भारतासाठी हा एकमात्र गोल केला. भारताची उपांत्य फेरीतली
लढत जर्मनीशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment