आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्रीय
पुरस्कारांचं वितरण करणार आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या
वतीनं देण्यात येणारे हे पुरस्कार दिव्यांग, दिव्यांगांसाठी कार्यरत व्यक्ती, संस्थांना
प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या नऊ दिव्यांगांना यावेळी गौरवण्यात येणार
आहे. श्रवण दोष असणारा औरंगाबादचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता जलतरणपटू सागर बडवे आणि
लातूरच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती पोहेकर यांचा यामध्ये समावेश आहे.
****
कोविड प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेनं १२५ कोटी मात्रांचा टप्पा
पार केला आहे. ७९ कोटी ३२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीची पहिली मात्रा, तर ४६
कोटी ३३ लाखांपेक्षा जास्त जणांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
९४ वं अखिल भारतीय मराठी संमेलन आजपासून नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरु
होत आहे. वैज्ञानिक साहित्यिक डॉ.जयंत नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ज्येष्ठ साहित्यिक
विश्वास पाटील यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडे चार वाजता संमेलनाचं औपचारिक उद्घाटन
होणार आहे. आज सकाळी नाशिक शहरात टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून
उदंड ग्रंथदिंडी ला सुरुवात झाली.
****
परभणी महापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष प्रणीत मित्र मंडळ
पूर्ण शक्तीनिशी लढणार असल्याची माहिती, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार
डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महापालिकेत
पारदर्शी कारभार करतानाच भ्रष्टाचारमुक्त महापालिका करणार, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी महानगरपालिका हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिका
प्रशासनानं दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या संभाव्य
तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दिलेल्या सूचनांप्रमाणे
महापालिकेने नागरीकांना मास्क घालूनच फिरण्याचं आवाहन केलं आहे.
****
मराठवाड्यात काल ३७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दोन जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment