Wednesday, 22 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्य विधीमंडळाचं आजपासून हिवाळी अधिवेशन, शक्ती विधेयकासह, २६ नवीन विधेयकं सादर होणार

·      राज्यात १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी शांततेत मतदान, हिंगोली जिल्ह्यात एका मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

·      २०१८मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालातही घोटाळा, राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरेला अटक

·      उलटतपासणी घेण्यासाठी वकील गैरहजर राहिल्याच्या कारणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५० हजारांचा दंड

·      राज्यात ओमायक्रानचे नवे ११ तर कोविडचे ८२५ रुग्ण, मराठवाड्यातही २२ नवे बाधित

आणि

·      दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर, लेखी परिक्षेसाठी वाढीव वेळा दिला जाणार

****

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून  मुंबईत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची काल बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षानं उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यास राज्य सरकार तयार असल्याचं, त्यांनी सांगितलं. इतर मागासवर्गीयांच आरक्षण, स्पर्धात्मक परीक्षांमधली अनियमितता, वीज पुरवठ्याचं खंडीकरण, राज्य परीवहन महामंडळाचा संप, कोविड -१९चा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, तसंच विदेशी मद्यांवरच्या उत्पादन शुल्क कपातीबाबतच्या प्रश्नांचं उत्तर देण्यास, सरकार तयार असल्याचं, पवार म्हणाले. कोविड संसर्गाला नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रवास करू शकत नसल्यामुळे नागपूरऐवजी मुंबईत हे अधिवेशन घेतलं जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असं पवार म्हणाले.

या अधिवेशनात, महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असलेल्या शक्ती विधेयकासह, २६ नवीन विधेयकं सादर केले जातील. भारतीय जनता पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन झालं असताना, अध्यक्षांच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत बोलतांना पवार यांनी, निलंबन हे राजकीय नसून सभागृह सुरळित चालण्यासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं. महाआघाडी सरकार अल्पमतात आहे, असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल, तर सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास ते मोकळे आहेत, असं ते म्हणाले.

****

दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलतांना, इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा खंडीत करणं, पेट्रोल-डिझेलचे भाव केंद्रानं कमी केल्यानंतर राज्यानं मूल्यवर्धित कर कमी न करणं, दुसरीकडे विदेशी मद्यावरचा कर ५० टक्के कमी करणं, आदी मुद्यांवरून सरकारवर घणाघाती टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलं आहे. त्याचा जाब आम्ही अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरोग्य, गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास- म्हाडा आणि, शिक्षक पात्रता परीक्षेत घोळ आहे. परीक्षांचं रॅकेट मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. या रॅकेटचाही पर्दाफाश विरोधी पक्ष अधिवेशनात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यात इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणाऱ्या १०६ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ६७ टक्के मतदान झालं. तर मराठवाड्यात २३ नगरपंचायतींसाठी ६० टक्के मतदान झालं. १९ जानेवारीला या मतदानाची मोजणी होणार आहे. 

बीड जिल्ह्यातल्या वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर या पाच नगर पंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झालं. नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर, माहूर आणि नायगाव या तीन नगर पंचायत निवडणुकीत सरासरी ७७ पूर्णांक ५० टक्के, परभणी जिल्ह्यातल्या पालम नगरपंचायतीमध्ये ८१ पूर्णांक ६१ टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी नगरपंचायतीमध्ये ७५ पूर्णांक १६, तर हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव नगरपंचायतीमध्ये ८६ पूर्णांक ५६, आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीसाठी ७९ पूर्णांक ६२ टक्के मतदान झालं.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात औंढा इथल्या एका मतदान केंद्रावर अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जालना जिल्ह्यात बदनापूर नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाज्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदान करत असल्याचा आरोपावरून बाचाबाची आणि हाणामारीत झाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करुन केंद्राबाहेरील तणाव कमी केला.

बीड जिल्ह्यातल्या वडवणी इथं भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विरोधक एकमेकांसमोर आल्यानं वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.

****

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासादरम्यान २०१८मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालातही घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे आणि परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार याला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं काल अटक केली. शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी ५०० परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. दलांलांमार्फत तुकाराम सुपे, सुखदेव डेरे यांना ही रक्कम दिल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या गैरव्यवहारातून जमा झाली असून आरोपींनी ती वाटून घेतल्याचं उघड झालं आहे, असं पोलिसांना सांगितलं.

****

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्धच्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची समांतर चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती के. यु. चांदिवाल आयोगानं, उलटतपासणी घेण्यासाठी वकील गैरहजर राहिल्याच्या कारणावरून, देशमुख यांना ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. आयोगानं काल या प्रकरणातील साक्षीदार सचिन वाझेची उलटतपासणी ठेवली होती. यासाठी देशमुख आणि वाझे या दोघांनाही तुरूंग प्रशासनानं आयोगापुढे हजर केलं. मात्र ऐनवेळी देशमुखांचे वकीलच गैरहजर राहिल्यानं आयोगाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे आयोगाचा वेळ खर्ची पडल्याबद्दल, देशमुखांना ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

****

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही सूचना केल्या आहेत. हा विषाणू डेल्टाच्या तिप्पट संसर्गजन्य असून, त्याला वेळीच आवर घालण्यासाठी राज्यांनी गरज भासल्यास वॉर रुम्सची निर्मिती करुन रात्रीची संचारबंदी लागू करावी, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मोठ्या सभांबाबत दक्षता घेणं, लग्न आणि अंत्यसंस्कार यासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणं, जिल्हा स्तरावर पायाभूत सुविधांचा उपयोग करुन समीक्षा करणं, आदी सूचना भूषण यांनी दिल्या आहेत.

****

राज्यात काल ओमायक्रानचे नवे ११ रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतल्या आठ, तर पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबईतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे आता राज्यातली एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. यापैकी ३४ रुग्ण बरे झाले आहेत.

काल मुंबईत विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीत आढळलेल्या आठ रुग्णांपैकी केरळ, गुजरात आणि ठाण्यातला प्रत्येकी एक जण आहे, तर इतर रुग्ण मुंबईतले आहेत. या रुग्णांमध्ये दोन रुग्ण १८ वर्षांखालील आहेत. या रुग्णांपैकी दोघेजण युगांडातून दुबईमार्गे मुंबईत आले, तर चौघे इंग्लंडमधून आणि दोघे दुबईतून आले आहेत. १८ वर्षांखालील दोन रुग्ण वगळता इतर नऊ रुग्णांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

उस्मानाबादमधल्या ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णाच्या १३ वर्षीय मुलीलाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिला कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. तसंच केनियातून हैदराबादमार्गे नवी मुंबईत आलेल्या १९ वर्षीय तरुणालाही काल ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र त्यालाही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

****

राज्यात काल ८२५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५० हजार ९६५ झाली आहे. काल चौदा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ३६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ७९२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९८ हजार ८०७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ७१ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार १११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात सहा, परभणी जिल्ह्यात सात, नांदेड चार, लातूर जिल्ह्यात तीन, तर बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली. उस्मानाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही. 

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. मंडळानं जाहीर केलेलं हे वेळापत्रक फक्त माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात दिलं जाणारं वेळापत्रक हे अंतिम असेल, त्या वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या तारखांची खात्री करूनच परीक्षेला बसावं, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, यंदा बारावी आणि दहावीच्या लेखी परिक्षांना विद्यार्थ्यांना वाढीव वेळा दिला जाणार आहे. ६० गुणांपर्यंतच्या परिक्षेसाठी १५ मिनिटे तर, १०० गुणांपर्यंतच्या परिक्षसाठी अर्धा तास वेळ वाढवून मिळणार असल्याचं, मंडळानं सांगितलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात बांधकामासाठी लागणारी वाळू वैध पावती आणि परवाना असल्‍याशिवाय खरेदी करु नये, असं आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. जिल्ह्यात वाळुचा कोणताही लिलाव झालेला नसताना, मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे आढळून येत आहे. ही वाळू अवैध उत्‍खनन करून आणली असण्याची शक्यता असल्याचं इटनकर यांनी म्हटलं आहे. अशी बेकादेशिर वाळूची खरेदी केल्यास संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

****


परभणी जिल्ह्यात समृद्ध गाव आणि समृद्ध शेतकरी योजनेत प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. सोनपेठ तालुक्यातील मौजे विटा खुर्द या गावाची या योजनेसाठी निवड झाली आहे. या गावांत ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली असून, या बंधाऱ्यामध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावर साठवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...